Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकचे सुंदरनारायण मंदिर

किर्ती मोहरील

नाशिकचे सुंदरनारायण मंदिर

वेबदुनिया

रामाचा 14 वर्षे वनवास आठवला की, महाराष्ट्रीयन लोकांना सर्वप्रथम आठवते ते नाशिक. रामाने वनवासाची काही वर्षे इथल्या तपोभूमीमध्ये घालवली असे म्हणतात. त्यामुळे नाशिकचे महत्त्व आपल्याला काशी एवढेच!

नाशिक शहराला मंद‍िरांचे शहरही म्हटले जाते. येथे प्रसिद्ध मंदिरं आहेत. यापैकीच एक म्हणजे सुंदरनारायण मंदिर. गोदावरी तीरावर वसलेले सुंदरनारायण मंदिर स्थापत्यशैलीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. सुंदरनारायण मंदिरासमोरच कपालेश्वर मंदिर आहे. या परिसरात असं सांगितलं जातं की नाशिकला येणार्‍या यात्रेकरुंनी कपालेश्वराचे दर्शन घेतलेच पाहिजे. त्यामुळे नाशिकला येणारा प्रत्येक माणूस कपालेश्वराचे दर्शन घेतोच आणि तसाच तो वळतो सुंदरनारायण मंदिराकडे.

सुंदरनारायण मंदिर हे 1756 साली सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांच्या पुढाकाराने बांधण्यात आले. पुरातन सुंदरनारायणाचे मंदिर मुस्लीम राजवटीत नष्ट झाले होते. त्यानंतर 1756 साली पेशव्यांच्या सहकार्याने याचे बांधकाम करण्यात आले.

सुंदरनारायण मंदिर पुर्वाभिमुख आहे. चौथर्‍यावर हे मंदिर वसले आहे. 20 मीटर उंचीवर वसलेले मंदिराचे शिखर दुरुनही लक्ष वेधून घेते. या शिखराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य कलशाच्या खालच्या बाजूला अनेक उपशिखरं उतरत्या क्रमाने रचली आहेत. सभामंडपाचा घुमटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. उभ्या आणि आडव्या रेषांनी सजवलेला हा घुमट आकर्षक दिसतो. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपाच्या बाजूने असलेल्या मोकळ्या जागेत तिन्ही बाजूंना ह्या छत्र्या आहेत. ह्या छत्र्यांवर सुंदर नक्षीकाम केले आहे. मंदिरामध्ये विष्णूची मुर्ती मध्यभागी असून त्याच्या आजूबाजूला वृंदा आणि लक्ष्मी यांच्या मुर्ती आहेत. या मंदिराविषयी कथा सांगितली जाते की वृंदा ही जालंधर नावाच्या दैत्याची पतिव्रता पत्नी होती. वृंदेच्या पतिव्रत्येमुळे जालंधर दैत्य अजिंक्य झाला होता. विष्णूंनी जालंधराचा वध करण्यासाठी वृंदेचे पतिव्रत्य भंग केले. जेव्हा हे तिला कळले तेव्हा तिने विष्णूला मन:शांती नष्ट होण्याचा शाप दिला. या शापातून नष्ट होण्यासाठी श्री विष्णू नाशिकला बद्रिकाश्रमात आले. तिथल्या तीर्थावर स्नान करुन शापमुक्त झाले. त्याच ठिकाणी हे सुंदरनारायणाचे मंदिर बांधण्यात आले.

कपालेश्वर आणि सुंदरनारायण ही मंदिरे अशा पद्धतीने समोरासमोर बांधली आहेत की एका मंदिरातून दुसर्‍या मंदिरातल्या देवाचे दर्शन घेता येते. या मंदिरावर सुंदर कोरीव नक्षी आहे. दिशासाधन करुन हे मंदिर बांधण्यात आले असल्यामुळे विषुवदिनाच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण सुंदरनारायणाच्या पायाशी पडतात.

कार्तिक पौर्णिमेला मंदिरात दिव्यांची आरास करण्यात येते. नदीकडे उतरणार्‍या पायर्‍या आणि मंदिरावर लुकलुकणारे असंख्य दिवे बघतांना मन हरखून जाते. दिव्यांची ही आरास पेशव्यांच्या काळापासून अखंडपणे सुरु आहे. स्थापत्यशैलीचा आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले सुंदरनारायण मंदिर नाशिकला भेट दिली तर आवर्जून बघितले पाहिजे असेच आहे!

Share this Story:

Follow Webdunia marathi