याशिवाय वालवला, कुणकेश्वरासारखी प्रसिद्ध देवस्थाने आणि आंबा, फणस, काजू, जांभळे असा रानमेवा, शिवाय फणसवडी, आंबावडी, काजूवडी, भात, माशांचं कालवण, मालवणी मटण अशी चविष्ट खाद्यसंस्कृती ही देखिल येथील वैशिष्ट्ये आहेत. दशावतार, चित्रकथीसारख्या प्राचीन लोककला, सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी, माका-तुकाची मालवणी बोली अशा अगणित गोष्टींनी सिंधुदुर्ग समृद्ध आहे. पूर्वेला सह्याद्रीचे उत्तुंग कडे, पश्चिमेला अथांग अरबी समुद्र आणि दक्षिणेला गोवा ही जिल्ह्याची भौगोलिक रचना आहे.या जिल्ह्यात यायचे असल्यास कोकण रेल्वे अजिबात टाळू नका. हा प्रवास तर संस्मरणीय आहे. धुक्यात हरवलेली कौलारू घरे पाहताना सिंधुदुर्गच्या प्रेमात न पडले तर नवलच.
पर्यावरणाला कोणताही धक्का न लागता येथील वाहतूक व्यवस्था जपली आहे. फलोत्पादन, नर्सरी व्यवसाय व पर्यटन या माध्यमातून हा जिल्हा पर्यटकांचे स्वागत करतो.
कधी काळी मुंबईकडे पळणारा तरुणवर्ग आता सिंधुदुर्गातच व्यवसायाच्या संधी शोधतो आहे. पर्यटकांना आकर्षित करणार्या कित्येक बाबी आता सहज उपलब्ध झाल्याने निव्वळ मुंबईच्या मनिऑर्डरवर जगणारा जिल्हा म्हणून झालेली हेटाळणी दूर होऊन हा जिल्हा परकीय चलन मिळवून देण्यास सिद्ध झाला आहे. मग आता वाट कसली पाहता येवा सिंदुधुर्ग आपलाच असा.