महाराष्ट्राची 'प्रतिभा' झळाळली
महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून २००७ या वर्षाने काय दिले असेल तर या देशाचे सर्वोच्च पद. यापेक्षा दुसरी कुठली मोठी घटना असूच शकत नाही. दिल्लीच्या तख्तावर मराठी जरीपटका फडकवायची स्वप्ने खूप पाहिली गेली. त्यासाठी अगदी पाकिस्तानातल्या अटकेपर्यंत धडक मारण्याचा
पराक्रमही करून झाला. पण दिल्लीचे सिंहासन मराठी माणसापासून कायम दूरच राहिले. पंतप्रधानपदही महाराष्ट्राला कधी मिळू शकले नाही. नाही म्हणायला यशवंतराव चव्हाणांना औटघटकेचे उपपंतप्रधानपद तेवढे मिळाले. पण दिल्लीच्या बाबतीत मराठा गडी अपयशाचा धनी ठरला. पण २००७ या वर्षाने मराठी माणसाला एक अनपेक्षित व चांगली भेट दिली, ती प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपतिपदाच्या रूपाने. त्यासाठी आलेले अडथळे अगदी विनासायास बाजूला झाला. एवढेच काय पण मराठी माणूस राष्ट्रपती होतोय म्हटल्यानंतर शिवसेनेनेही विरोध न करता पाठींबा देऊन मराठी अस्मिता जपली. पण देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ झालेल्या प्रतिभाताईंनी ही वाटचाल केली तरी कशी याचाच हा मागोवा....
प्रतिभाताईंचे व्यक्तित्व सौम्य, ऋजू आणि पारदर्शी आहे. कपाळावर ठसठशीत कुंकू, आणि डोक्यावरचा पदर...भारतीय पारंपरिक, आदर्श स्त्री म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. राजकारणात राहूनही साधनशुचिता जपलेली जी काही थोडी व्यक्तिमत्वे आहेत, त्यात प्रतिभाताईंचे नाव घेता येईल. चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही वादाचा शिंतोडाही न उडालेल्या प्रतिभाताईंवर विरोधकांनी गेल्या महिनाभर जे आरोप केले, त्यातले कुठलेच टिकले नाहीत, पण यामुळे प्रतिभाताईंपेक्षा विरोधकांचे मात्र हसे झाले.
ताईंचा जन्म खान्देशातील जळगावात १९ डिसेंबर १९३४ मध्ये झाला. त्यांचे वडिल सरकारी वकिल होते. एमए करत असतानाच त्यांची पावले राजकारणाकडे पडली. त्याला कारण ठरले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यांच्या एका कार्यक्रमाला प्रतिभाताई उपस्थित होत्या. महिलांनी राजकारणात यायला हवे. राजकारण स्वच्छ रहाण्यासाठी महिलांची उपस्थिती गरजेची आहे, अशा आशयाचे भाषण तेव्हा चव्हाणांनी केले होते. ते ऐकून प्रभावित झालेल्या प्रतिभाताई राजकारणात उतरल्या. पण राजकारणा उतरायचे तर काही लक्ष्य समोर हवे, असे नव्हते. योगायोगाने त्यांच्या तोपर्यंतच्या कामाची पावती आणि धडाडी पाहून त्यांन जळगाव मतदारसंघातून आमदारकीचे तिकिट मिळाले. आश्चर्य म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्या आमदार झाल्या. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे पंचवीस.
त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी आमदारकी भूषवली. आमदार असतानाच त्या वकिल झाल्या. याच काळात त्यांचा विवाह झाला देवीसिंह शेखावत यांच्याशी. जळगावनंतर प्रतिभाताईंनी मतदारसंघ बदलला आणि त्या एदलाबाद (सध्याचा मुक्ताईनगर) मधून सलग पाचवेळा निवडणूक जिंकल्या.
विधानसभेत प्रतिभाताईंनी अनेक पदांवर संधी मिळाली. त्यांचे त्यांनी सोने केले. 1967 ते 77 या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर 1978 ते 1980 या कालावधीत शरद पवार पुलोदचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले. शरद पवारांसारखा नेता समोर असताना विरोधी पक्षनेतेपदी प्रतिभा पाटील असणे खरे तर यातच त्यांची क्षमता दिसून येते. कारण पवार यानी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचे सरकार बनविले होते. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने त्यांना या पदावर नेमले, याचाच अर्थ त्यांच्यावर असलेला पक्षाचा विश्वासही मोठा होता, हे दर्शविणारा आहे
कॉंग्रेसवरील निष्ठा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन 1980 मध्ये प्रतिभाताईंना मुख्यमंत्री बनविण्याचे कॉंग्रेसचे डावपेच होते. मात्र, ऐनवेळी अब्दुल रेहमान अंतुले यांनी बाजी मारली आणि पाटील यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. मात्र, पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. पण पक्षानेही त्यांच्या योग्यतेचा विचार करून राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली.
तेथे त्यांची ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेऊन उपसभापती म्हणून निवड झाली. 1986 ते 88 या कालावधीत त्यांनी उपसभापतीपद भूषविले. पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत 1991 साली त्या अमरावतीतून सहजपणे लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यासारखी परिस्थिती होती.
पण तरीही त्या कॉंग्रेसशी एकनिष्ठ होत्या. पक्ष सोडून जायचा असे त्यांच्या मनात कधीही आले नाही. अंतुलेंनी मुख्यमंत्रीपद हिरावून घेतले तेव्हाही नाही. त्यामुळेच पक्षाचा त्यांच्यावर विश्वास होता. म्हणूनच तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपविली गेली. इतकी वर्षे कॉंग्रेस पक्षाच्या विचारांशी ठेवलेल्या बांधिलकीने त्यांना राज्यपाल बनविले.
या काळातही कुठला वाद त्यांना शिवला नाही. पण म्हणून मेणाहून मऊ अशीही त्यांची प्रतिमा नव्हती. राजस्थान सरकारने धर्मांतरबंदी करणारे विधेयक त्यांच्याकडे सहीसाठी पाठविले. पण त्यांनी त्यावर सही करण्याचे नाकारून ते राष्ट्रपतींकडे पाठविले. त्यांच्यातील कर्तव्यकठोर स्त्री दिसली ती या प्रकरणातून.
आता त्या राष्ट्रपती झाल्या आहेत. जळगावची एक कन्या देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ झाली आहे. दिल्लीत मराठी पंतप्रधान कधी होईल तेव्हा होईल, पण निदान आता देशाचे सर्वोच्चपद तरी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे.