सुपरहिट चित्रपट: या वर्षातील दोन्ही सुपरहिट चित्रपट शाहरूख खानच्या नावावर आहेत. ‘चक दे इंडिया’ फार चालेल असे प्रदर्शित होण्यापूर्वी कुणालाही वाटत नव्हते. कारण चित्रपटात शाहरुख खानशिवाय दुसरा कोणताही सुपरस्टार नव्हता. त्याला नायिकाही नव्हती. ही भूमिकादेखिल शाहरुखच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा फारच वेगळी होती. त्यामुळे ही भूमिका करणे हा धोकाही होता. तरीही त्याने ती भूमिका अगदी झोकात केली. खेळांवर आधारीत चित्रपट फारसे चालत नाहीत. चक दे... त्याला सणसणीत अपवाद ठरला.दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘ओम शांती ओम’ ने जोरदार यश मिळविले. सत्तरच्या दशकातील बॉलिवूडच्या पार्श्वभूमीवर फराह खानने तयार केलेल्या या चित्रपटाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. हिट चित्रपट: गायक हिमेश रेशमियाला नायक म्हणून सादर करणारा ‘आपका सुरूर’ हा चित्रपट आश्चर्यकारकरित्या चालला आणि हिटच्या यादीत जाऊन बसला. हिमेशच्या अभिनयाचे हसू आले, तरी चित्रपट चालल्याने हिमेशच्या चेहऱ्यावर हसू फुटले नसते तरच नवल. विनोदाच्या रंगात रंगलेले ‘हे बेबी’, ‘भूलभुलैया’ आणि ‘पार्टनर’ या चित्रपटांनीदेखील चांगला व्यवसाय केला. या चित्रपटांच्या यशावरून प्रेक्षकांना जास्त डोकं लावावे लागणारे चित्रपट आवडत नाहीत, असा निष्कर्ष काढता येईल. या चित्रपटांसाठी अक्षय कुमारला सर्वांत जास्त पसंती दिली गेली. ‘हे बेबी’ साजिद खानने (फराह खानचा भाऊ) दिग्दर्शित केला होता. सरासरी : मणिरत्नमच्या ‘गुरु’ ला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. पण या चित्रपटाला यशस्वी मानण्याइतका त्याने व्यवसाय केला. ‘भेजा फ्राय’ च्या यशस्वीतेने बॉलिवुडवाल्यांचे भेजे चालेनासे झाले. अतिशय चांगली पटकथा आणि सादरीकरण असलेला हा चित्रपट तसा चाकोरीबाह्य होता. विशेष म्हणजे त्यात एकही स्टार, नायिका नव्हती. तरीही आश्चर्यकारक यश त्याला मिळाले. या चित्रपटाने अनेक निर्मात्यांना प्रेरणा दिली. ’नमस्ते लंडन’ क्रिकेट विश्वकरंडकादरम्यान प्रदर्शित झाला होता. भारतीय क्रिकेट संघाने विश्वकरंडकात नांगी टाकल्यानंतर वैतागलेल्या प्रेक्षकांनी या चित्रपटाला जाऊन डोक्याचा त्रास कमी केला. हॉलिवूडचा ‘हॅरी पॉटर एंड द ऑर्डर ऑफ फिनिक्स’ किंवा ‘स्पायडरमॅन’ या चित्रपटानेदेखील यश मिळविले. वैशिष्ट्य म्हणजे यंदा ‘स्पायडरमॅन’ भोजपुरी भाषेत बोलला.इंद्र कुमारचा नायिकेशिवाय असलेला ‘धमाल’ काहीसा चालला. तो लहान मुलांना खूप आवडला. शाहीद कपूर-करीनाचा ‘जब वुई मेट’ च्या निर्मात्याला चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी जास्त पैसा खर्च करावा लागला नाही. कारण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही दिवस अगोदर दोघांत ब्रेकअप झाला. यामुळे चित्रपटांची खूप चर्चा झाली आणि तो चालला. नरम, गरम : या श्रेणीत काही यशस्वी ठिकाणी चाललेले व इतरत्र आपटलेले असे चित्रपट आहेत. ‘चीनी कम’ केवळ मोठ्या शहरांत चालला. लहान शहरातील प्रेक्षकांना विषयच आवडला नाही. ‘अपने’ हा चित्रपट उत्तर भारतात चांगला चालला. कारण तेथे देओल कुटुंब फेमस आहे. ‘शूट आऊट एट लोखंडवाला’ मुंबईत चालला. ‘मेट्रो’ लाही महानगरी प्रेक्षकांनी पसंती दिली. फ्लॉप : या वर्षात अनेक चित्रपट फ्लॉप झाले, पण ज्यांच्यापासून खूप अपेक्षा होत्या त्याच चित्रपटांचा समावेश आहे. या यादीत ‘रामगोपाल वर्मा की आग’ सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे. रामूने हा चित्रपट तयार करून आयुष्यातील सर्वांत मोठी चूक केली. ‘नि:शब्द’, ‘गो’, ‘डार्लिंग’ सारखे चित्रपट करून त्याने काय साध्य केले त्या एका रामूलाच माहित.यशराज फिल्म्सच्या हाती यावर्षी यश लागलेच नाही. ‘झूम बराबर झूम’, ‘आजा नच ले’ आणि ‘लागा चुनरी में दाग’ या चित्रपटांनी या बॅनवरवर अपयशाचाच डाग लावला. ‘सलाम-ए-इश्क’ ला प्रेक्षकांनी नाकारले.
संजय लीला भन्साळीच्या ‘सावरीया’ ला ‘ओम शांती ओम’ चा जोरदार फटका बसला. एकाचवेळी दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. सांवरीयावाले चित्रपट हिट आहे, असे ओरडून सांगत होते. पण आकडेवारी दुसरेच काहीतरी सांगत होती. अब्बास-मस्तानची ‘नकाब’ ची कथा कोणालाही आवडली नाही. अनुभव सिन्हाच्या ‘कॅश’ ने निर्मात्यांचाच खिसा रिकामा केला. ‘नो स्मोकींग’ ला प्रेक्षकांनी न जाणेच पसंत केले.