आता टाटांनी या प्रकरणी प्रथमच गंभीर दखल घेत सिंगुरमध्ये असाच विरोध कायम राहिला तर अन्यत्र जागा पाहण्यात येईल असा इशारा दिला. त्यांचा हा इशारा गंभीर मानला जात गेला. त्यांच्या समर्थनात त्यांचे प्रतिस्पर्धी मुकेश अंबानीही उतरले आहेत. टाटांनी हा प्रकल्प पश्चिम बंगाल बाहेर नेल्याने राज्यातील इतर उद्योग अडचणीत आल्याचे मत मुकेश यांनी व्यक्त केले होते. आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर काही परकीय कंपन्यांनीही आपल्या यादीतून कोलकाता हे नावही वगळले आहे. 24
ऑगस्ट 2008 पासून तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी नॅनो प्रकल्पासमोरच सत्याग्रह आंदोलन केले. टाटांनी या प्रकल्पासाठी जी एक हजार एकरची जमीन घेतली आहे, त्यापैकी 400 एकर जमीन शेतकर्यांना परत देण्याच्या आपल्या मागणीवर त्या ठाम आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने आणि टाटांनी स्वतः: त्यांच्याशी चर्चा करण्याची विनंती केली. परंतु, ममतांनी चर्चेलाही नकार दिला.
ममतांचे कार्यकर्ते या प्रकल्पाबाहेर असे काही सज्ज होते, की त्यांच्यापुढे पोलिसही हतबल असल्याचे बोलले जाते. याची प्रचितीही अनेकांना आली असून तीन दिवसांपूर्वी नॅनो प्रकल्पात जाणार्या कर्मचार्यांना या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर तेथील काम ठप्प पडले होते.
भारतीय बाजारात नॅनो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत उतरवण्याचे टाटांचे स्वप्न नॅनोचे काम रखडल्याने धुळीस मिळाले. टाटांसाठी आम्ही पायघड्या घालू असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी म्हटले होते.
महाराष्ट्रातील वीज संकट पाहता नॅनो महाराष्ट्राच्या वाट्याला येणं अवघडच असल्याचे मत राज्यातील अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. एकंदर नॅनो मात्र या सार्या प्रकारामुळे राजकीय चिखलात अडकली आहे हे मात्र निश्चित.