Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साइनाची यशस्वी घोडदौड...

साइनाची यशस्वी घोडदौड...

संदीप पारोळेकर

, शुक्रवार, 25 डिसेंबर 2009 (13:16 IST)
PR
PR
गतवर्षी बीजिंग ऑलिंपिकमध्ये चिनी खेळाडूंना हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठणारी.... जागतिक सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीत धडक देणारी... चायनीज ग्रॉ प्री स्पर्धेत जेतेपद मिळवणारी... जागतिक ज्युनियर विजेतेपदाला गवसणी घालणारी... भारतीय स्टार बॅडमिंटनपटू साइना नेहवालचा 2009 वर्षांतील प्रवासही थक्क करणारा आहे. 2009 वर्ष हे भारतीय बॅडमिंटनबरोबर सायनासाठी अविस्मरणीय ठरले. साइना नेहवालने चायनीज खेळाडूंवर वर्चस्व कायम ठेवले असून भारतीय बॅडमिंटनला जागतिक स्तरावर पोहचवून दिले आहे.

बीजिंग ऑलिंपिकमधील अनुभवाचा साइनाने फायदा करून घेत आपल्या खेळात बरीच सुधारणा करून घेतली आहे. यात तिची जिद्द व मेहनत वाखाणण्याजोगी आहे. तिचे प्रशिक्षक पी गोपीचंद यांनी तिच्यासाठी घेतलेले परिश्रम व तिला सर्व प्रकारे सहकार्य
करण्यात आंध्र प्रदेश सरकारचा मोठा वाटा आहे. गतवर्षी चिनी ताइपैसारख्या पुरस्कारांना गवसणी घालणाऱ्या साइनाची यंदाही यशस्वी घोडदौड सुरूच होती.

सुपर सिरीज पुरस्कार जिंकणारी हैदराबादची 19 वर्षीय साइना ही पहिली भारतीय खेळाडू आहे. जून 2009 मध्ये इंडोनेशिया ओपन पुरस्कारावर तिने नाव कोरले होते. यंदाचा 'अर्जुन' पुरस्कार देऊन तिला गौरविण्यात आले तर तिचे गुरू पी. गोपीचंद हे 'द्रोणाचार्य'
पुरस्काराचे मानकरी ठरले.
webdunia
PR
PR


साइनाने मलेशिया सुपर सिरीज, स्विस ओपन व इंडियन ओपनच्या क्वार्टर फायनल गाठली. तिच्या शानदार कामगिरीमुळे भारत सुदीरमन चषकात ग्रुप दोनपर्यंत मजल मारता आली. मात्र जूनमध्ये सिंगापूर ओपनमध्ये अंतिम आठमध्ये वांग लिनकडून साइनाला पराभव पचवावा लागला होता. मात्र इंडोनेशियामध्ये चायनीज प्रतिद्वंद्वीला धूळ चाखवत तिने पहिला सुपर सिरीज पुरस्कारावर नाव कोरले.

भारतीय अधिकारी व विश्व बॅडमिंटन महासंघाच्या 'कोल्ड वार'ची झळ मात्र साइनाला पोहचली व चीन मास्टर्स स्पर्धा तिला मुकावी लागली. त्यानंतर डेनमार्क व फ्रान्समध्ये झालेल्या सुपर सिरीजच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहचून तिने ऑक्टोबरमध्ये विश्व
मानांकनात सहावे स्थान पटकावले होते.

वर्षाच्या शेवटी साइनाने विश्व सुपर सिरीज मास्टर्सच्या सेमीफायनल गाठली होती. महिला एकेरी वर्गात तिने तिरंगा फडकविला तर मिश्र दुहेरीत ज्वाला व दीजू या जोडीने जेतेपद मिळविले.

वर्षाच्या शेवटी साइनाने लखनऊ येथे सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्यामुळे पुण्याच्या अदिती मुटाटकरला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. याशिवाय साइना यंदाच्या सीएनएन-आयबीएन 'स्पोर्ट्स पर्सन ऑफ द
इयर' ह्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

webdunia
PR
PR
खेळ कुठलाही असो त्यात शारीरिक क्षमता व मनाचा कणखरपणा आवश्यक असतो. हे दोनही गुण साइनाच्या अंगी आहेत. ती दररोज सकाळी सहा वाजता बॅडमिंटनच्या कोर्टवर न चुकता हजर राहते. दुपारी थोडी विश्रांती घेतल्यानंतर साडेतीनला ती पुन्हा कोर्टवर हजर आहेच. साइनाचे सर्व कुटुंब शाकाहारी आहे. परंतु जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या दृष्टीने तिच्यात स्टॅमिना यावा म्हणून तिने किमान अंडी तरी खावीत, असा सल्ला तिला तिच्या गुरुजींनी दिला होता. पण गंमतीचा विषय असा की, मांसाहाराची तिला अशी चटक लागली की, स्पर्धेसाठी ती एखाद्या शहरात गेली की, नॉनव्हेज खाणेच ती पसंत करते.

ऑगस्ट 09 मध्ये साइनाच्या अंगावर कांजण्या (चिकन पाक्स) उठल्या होत्या. त्यामुळे तिला काही काळ विश्रांती घ्यावी लागली. अशा लहान-सहाण समस्या वगळता साइनासाठी 2009 हे वर्ष मस्तच गेलं... साइनाला 'वर्ल्ड नंबर वन'ची बॅडमिंटनपटू बनायचे आहे.
त्यादृष्टीने ती मेहनत घेत असून तिची घोडदौड सुरू आहे. तिला तिच्या इच्छेप्रमाणे यश मिळो... हीच तिला नववर्षानिमित्त सदिच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi