Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘रशियाचा युरोपमध्ये मोठं युद्ध छेडण्याचा डाव’ : युक्रेन

‘रशियाचा युरोपमध्ये मोठं युद्ध छेडण्याचा डाव’ : युक्रेन
, गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (08:42 IST)
युक्रेनवर रशियानं आक्रमण केल्यास युरोपात एका मोठ्या युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
 
मात्र, रशियाच्या आक्रमणाला आम्ही पाठ दाखवणार नाही. आम्ही आमचं संरक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचंही झेलेन्सकी यांनी म्हटलं आहे.
 
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं याबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं आहे. रात्री उशिरा न्यूयॉर्कमध्ये ही बैठक होणार आहे. युक्रेननं तातडीनं ही बैठक घेण्याची मागणी केली होती.
 
दरम्यान, युक्रेनमधीन दोनेत्स्क आणि लुहान्स्क या बंडखोर प्रदेशांनी रशियाकडे संरक्षणाची मागणी केल्यानंतर, रशियाला मोठ्या प्रमाणात सैन्य घुसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन भागांकडून रशियाला मदतीसाठी पत्र मिळाल्यानं रशियातील माध्यमांमध्ये म्हटलं आहे.
 
तर या संपूर्ण संकटाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये 30 दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियानं जवळपास 2 लाख सैन्य तैनात केल्याचंही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे.
 
आम्हाला शांतता हवी-झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी पत्रकार परिषद घेतली.
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी चर्चेच्या आमंत्रणाला उत्तरही दिलं नसल्याचंही त्यानी म्हटलं. रशियानं युक्रेनच्या सीमेवर 2 लाख सैनिक आणि अनेक युद्ध वाहनं सज्ज ठेवली असल्याचंही ते म्हणाले.
 
या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी रशियातील नागरिकांनाही विनंती केली. रशियन भाषेचा वापर करत त्यांनी रशियन नागरिकांचा युक्रेनचे नागरिक असा उल्लेख केला. युक्रेनचे नागरिक आणि अधिकारी सर्वांना शांतता हवी असल्याचंही ते म्हणाले.
 
युक्रेनच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचा उल्लेख करतानाच रशियानं सैनिकांना पुढं सरकण्याचे आदेश दिले असल्याचा दावाही केला आहे.
 
"रशियानं सैनिकांना दुसऱ्या देशाच्या हद्दीत घुसण्याचे आदेश दिले आहेत. पण या पावलामुळं युरोपात एका मोठ्या युद्धाची सुरुवात होईल," असा इशाराही झेलेन्स्की यांनी भाषणात दिला.
 
रशियाच्या अधिकाऱ्यांनी पूर्व युक्रेनचा प्रदेश असलेल्या दॉनबस प्रांतात आक्रमण करण्याचा युक्रेन आदेश देऊ शकतं असा दावा केला होता. तोही झेलेन्स्की यांनी फेटाळला आहे.
 
पाठ दाखवणार नाही, युक्रेनचा इशारा
वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी शांतता हवी असल्याचं सांगतानाच रशियाला इशाराही दिला आहे.
 
"जर त्यांनी हल्ला केला आणि आमच्या देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, आमचे आमच्या देशातील नागरिक, चिमुकल्यांचे प्राण हिरावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही स्वतःचं संरक्षण नक्कीच करू. तुम्ही हल्ला केला तर आम्हीही तुम्हाला पाठ दाखवून पळणार नाही," असं झेलेन्सकी म्हणाले.
 
झेलेन्स्की यांनी रशियातील नागरिकांना केलेली विनंती, त्यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना युद्ध थांबवण्याची विनंती करावी या दिशेनं उचलेलं अखेरचं पाऊल होतं, असं बीबीसीच्या पूर्व युरोपातील प्रतिनिधी सारा रेन्सफोर्ड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.
 
हे युद्ध होण्याची शक्यता असली तर युक्रेनमधील कोणालाही ते व्हावं असं वाटत नाही. मात्र तसं असलं तरी त्यांची रात्रीची झोप उडालेली आहे.
 
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची रात्री उशिरा बैठक होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या या बैठकीमध्ये युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे.
 
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी सुरक्षा परिषदेची तातडीनं बैठक बोलवण्याची मागणी केली होती. युक्रेनच्या बंडखोर प्रांतांनी रशियाकडे मदतीची मागणी केल्यानंतर कुलेबा यांनी तातडीनं बैठक बोलावणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.
 
संयुक्त राष्ट्रांचे सचिव अँटोनियो गुटेरस यांनी युक्रेनबाबत घेतलेल्या आमसभेमध्ये हा संपूर्ण जगासाठी धोक्याचा क्षण असल्याचं म्हटलं होतं. पूर्व युक्रेनमध्ये तातडीनं शस्त्रसंधी करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
 
सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका, युके, रशिया, चीन आणि फ्रान्स हे पाच कायमस्वरुपी सदस्य आहेत. तर इतर 10 देशांचा त्यात अस्थायी समावेश आहे.
 
रशिया पुढं सरकल्यास आम्हीही सरकणार-अमेरिका
"दुर्दैवानं रशियानं सीमेवर सैन्य सज्ज केलं आहे. ते युक्रेनवर हल्ला करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचं चित्र आहे," असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी म्हटलं.
 
मात्र, हे सर्व थांबवणं अजूनही शक्य असल्याचं मतही त्यांनी मांडलं. दोन्ही देश एकमेंकांविरोधात भिडण्याच्या अंतिम टप्प्यात असले तरी त्यांना थांबवण्याची संधी आहे, असं वाटत असल्याचं ब्लिंकन म्हणाले.
 
"आम्ही भूमिका अगदी स्पष्ट केली आहे. रशिया पुढं सरकत राहिला तर आम्हीही तेच करू. त्यामुळं आता त्यांना काय करायचं आहे, याचा विचार त्यांनी करावा."
 
"शेवटी यानंतरही पुतीन थांबले नाहीत तर आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांसह हे स्पष्ट करू इच्छितो की, याचे गंभीर आणि मोठे परिणाम होती. रशियाला याची दीर्घकाळ मोठी किंमत मोजावी लागेल," असंही ब्लिंकन म्हणाले.
 
बंडखोरांची मदतीसाठी विनंती-रशिया
दुसरीकडे युक्रेनमधील बंडखोर प्रांत दोनेत्स्क आणि लुहान्स्क मधील नेत्यांनी रशियाकडे मदतीची विनंती केली असल्याचं क्रेमलिनने म्हटलं आहे. त्यामुळं रशियाच्या सैनिकांचा या भागात प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जात आहे.
 
या दोन प्रांतांच्या नेत्यांनी 22 फेब्रुवारीला मदतीची मागणी करणारी पत्रं पाठवली असल्याचं रशियाच्या माध्यमांनी म्हटलं आहे. पुतीन यांनी या प्रांतांना स्वतंत्र देश जाहीर केल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे.
 
या दोन्ही प्रांतांमधील काही भाग हा अजूनही युक्रेनच्या ताब्यात आहे. रशिया तिथे युक्रेनच्या सैन्याविरोधात कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
दरम्यान, युक्रेनच्या लष्करानं या प्रांतातून शस्त्रास्त्रांसह माघार घ्यायला हवी, असा सल्ला या प्रांतातील रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावादी नेत्यांनी दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विवाहित प्रेमीयुगुलाची धारदार चायना चाकूने गळा चिरत, पोटात वार करून आत्महत्या