रशिया आणि युक्रेनमधील युद्धात आता अण्वस्त्रांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन याविषयी सातत्याने इशारे देत आहेत. बुधवारीच रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांनीही आपले भारतीय समकक्ष राजनाथ सिंह यांच्याशी या विषयावर चर्चा केली. आता बातम्या येत आहेत की या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियाला भेट देणार आहेत. रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
जयशंकर 8 नोव्हेंबर रोजी मॉस्को येथे त्यांचे समकक्ष सर्गेई लावरोव यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे वृत्त आहे. या काळात ते रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करण्याची ऑफर देखील देऊ शकतात. तसेच रशियाकडून आयात-निर्यात करण्याबाबत चर्चा होऊ शकते.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या बैठकीबाबत एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "दोन्ही मंत्री द्विपक्षीय संबंधांची सद्यस्थिती आणि आंतरराष्ट्रीय अजेंडा यावर चर्चा करतील." तथापि, जयशंकर यांच्या या प्रस्तावित दौऱ्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.