वयाच्या सोळाव्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावर झळाळणार्या सचिनने पस्तिसाव्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून आपले नाव सुवर्णाक्षरात कोरले आहे.
दुखापतींमुळे एवढ्यातल्या दोन तीन वर्षात तो त्याच्या ख्यातीप्रमाणे खेळ करू शकत नसल्याने एरवी त्याच्यासाठी सहज वाटणारा विक्रमाचा टप्पा गाठण्यासाठी त्याला काही अंशी संघर्ष करावा लागला. मात्र अर्नेस्ट हेमिंग्वेच्या 'द ओल्ड मॅन अँड द सी' मधील सँटीएगो या पात्राप्रमाणे त्याने निश्चय सोडला नाही. त्याने आपले लक्ष्य साध्य केलेच.
दुखापतींमुळे सचिनला मधल्या काळात कित्येकदा संघाबाहेर राहावे लागले, त्यावेळी सचिन संपल्याच्या आरोळ्याही उठल्या. मात्र, सचिनने प्रत्येकवेळी बॅट हातात घेऊन या सगळ्या आरोळ्या जिरवून टाकल्या. आपल्या तडाखेबंद आणि शैलीदार फलंदाजीने दुसरा `तेंडल्या` होणे नव्हे, हेच सिद्ध केले आहे. जगभरातील चाहते त्याच्या विक्रमाची प्रतीक्षा करत होते. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल १९ वर्षांपासून आपल्या जादुई खेळाने तो जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आनंद देत आहे.
सर ब्रॅडमननंतर सचिनच
सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर क्रिकेटमध्ये देवत्व प्राप्त झालेला तो एकमेव क्रिकेटपटू आहे. खुद्द सर ब्रॅडमन यांनीच सचिन अगदी माझ्यासारखाच खेळतो, असे प्रशंसोद्गार काढून त्याची महतीच अधोरेखीत केली होती.
सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर क्रिकेटमध्ये देवत्व प्राप्त झालेला तो एकमेव क्रिकेटपटू आहे. खुद्द सर ब्रॅडमन यांनीच सचिन अगदी माझ्यासारखाच खेळतो, असे प्रशंसोद्गार काढून त्याची महतीच अधोरेखित केली होती. भल्याभल्या फलंदाजांची झोप उडवणार्या शेन वॉर्नसारख्या दादा गोलंदाजांलाही स्पप्नात सचिन दिसू लागला होता यातच काय ते समजा. अर्थात वॉर्न त्याचा चांगला मित्रही आहे. पण महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ, डोनाल्ड यांनाही त्याने आपल्या बॅटचे पाणी पाजून आपण खरोखरच 'मास्टर- ब्लास्टर' असल्याचे मान्य करायला लावले होते.
सचिनपेक्षाही निर्दयीपणे गोलंदाजांना बदडून काढणारे अनेक फलंदाज आहेत. मात्र, त्यात गुणात्मक फरक आहे. ते गोलंदाजांना अक्षरशः: धोपटून काढतात किंवा महेंद्रसिंग धोनीसारखे 'धोनी पछाड' करतात. पण सचिनच्या बॅटमधून असा फटका निघतो की गोलंदाजाला दिलेला काव्यात्मक न्यायच ठरावा. बहुदा हेच कारण असावे की डोनाल्ड, मॅकग्राथ, अक्रम पासून शेन वॉर्न, ब्रेट ली पर्यंत तमाम महान गोलंदाज 'तेंडल्या'च्या फलंदाजीवर फिदा असतात
ND
ND
एकोणिस वर्षाहून अधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द म्हणजे 'जोक' नव्हे. तब्बल एवढी वर्षे जगभरातील क्रिकेट रसिक, चाहते, तज्ज्ञ, विश्लेषक, महान क्रिकेटपटूंच्या गळ्यातील ताईत बनून राहण्याचे अशक्यप्राय आव्हानही त्याने अर्जुनाने द्रौपदी स्वयंवरातील धनुष्य पेलले तेवढे सहजगत्या पेलले आहे.
जगभरातील सर्वच देशांत, हवामानात आणि कौशल्य, तंत्र आणि संयमाची परीक्षा घेणार्या अतिवेगवान खेळपट्ट्यांवरही त्याने तेवढ्याच सहजतेने फलंदाजी करून आपण साधासुधा फलंदाज नसल्याचे सिद्ध केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने सोळा हजाराहून अधिक धावा जमवून 'तेंडल्या' म्हणजे साधेसुधे रसायन नसल्याचेच स्पष्ट केले आहे.
लारा आणि सचिन वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा सचिनचा समकालीनच. त्यानेही इंग्लंडविरूद्ध त्रिशतक झळकवून आपल्या आगमनाचा शंखनाद केला होता. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावर झळकायला सुरूवात केल्यानंतर त्याची तुलना व्हायला लागली ती अर्थातच लाराशी. दोघेही 'दादा' गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणारे धडाकेबाज तेवढेच आकर्षक फलंदाज. यामुळे तुलना होणे स्वाभाविकच.
किंबहुना लारा सचिनपेक्षा काकणभर सरसच. मात्र दोघांमध्ये फरक एवढाच की सचिन अधिक नम्र, शांत, आणि सातत्याचा ध्यास असणारा क्रिकेटच्या पंढरीचा वारकरी, तर लारा वळवाच्या पावसाप्रमाणे लहरीपणाने कोसळणारा पाऊस.
किंबहुना लारा सचिनपेक्षा काकणभर सरसच. मात्र दोघांमध्ये फरक एवढाच की सचिन अधिक नम्र, शांत, आणि सातत्याचा ध्यास असणारा क्रिकेटच्या पंढरीचा वारकरी, तर लारा वळवाच्या पावसाप्रमाणे लहरीपणाने कोसळणारा पाऊस. दोघात क्षमतेच्या दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास लारा एकदा खेळायला लागल्यानंतर त्रिशतक झाल्यानंतरही थांबायचे नाव न घेणारा तर सचिन थोडा अल्पसंतुष्ट शतक झाले की समाधान मानणारा.
'ट्रूली' जिनियस! सचिनने आंतरराष्ट्रीय पदार्पणात पाकिस्तानच्या अक्रम, वकार, कादिर या त्रिकुटाच्या तोंडचे पाणी पळवण्याअगोदर रणजी करंडक, दुलिप करंडक, आणि इराणी करंडकातही पर्दापणात शतके झळकवून आपल्या प्रतिभेने सर्वांना अवाक् केले होते. मुंबईत स्थानिक स्पर्धात तर त्याने चौदा वर्षाच्या वयात तब्बल ५४ दिवस सलग सामने खेळून आपले क्रिकेटवेडच सिद्ध केले होते.
ऑस्ट्रेलियाच्या दौर्यात १९९२ मध्ये भारतीय संघाचे पानिपत झाले असताना वाका येथील जगातील सर्वात वेगवान आणि उसळी घेणार्या खेळपट्टीवर त्याने शानदार शतक झळकवून एक महान क्रिकेटपटू अवतरल्याची हाकाटी दिली होती. फलंदाज आणि त्याच्या तंत्राची क्षणोक्षणी कसोटी पाहणार्या या खेळपट्टीवरील खेळीने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज बॉर्डरसुद्धा सचिनच्या प्रभावातून सुटले नव्हते.
विक्रमादित्य
ND
ND
सचिनच्या सुरूवातीच्या कारकीर्दीकडे बघितल्यास बाद होण्याची भीती न बाळगता चेंडू हवेतून टोलवण्याकडे त्याचा अधिक भर असायचा. यामुळे सुरूवातीस तो ७८ सामन्यांपर्यंत शतकी खेळी करू शकला नाही. मात्र एकदा त्याने शतकी खेळ्यांना सुरूवात केल्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकवणारा विक्रमादित्य ठरला.
सचिन कसोटीत १२,००० हजार धावांचा मनसबदार कसा ठरला, हे पाहिल्यास त्याने जवळजवळ प्रत्येकवर्षी १००० धावा केल्या आहेत. एकोणिसाव्या वर्षी पहिल्या एक हजार कसोटी धावा केल्यानंतर २०, २३, २४, २५, २६, २८, २९, ३०, ३१, ३३ आणि पस्तिसाव्या वर्षीच्या टप्प्यात १२,००० धावा करेपर्यंत त्याने प्रत्येक वर्षी एक हजार धावा केल्या आहेत.
कोणत्याही क्रिकेटपटूसाठी ही अनन्यसाधारण कामगिरी आहे. लाराने २००६ मध्ये एडिलेड ओव्हल येथे एलन बॉर्डर यांचा सर्वाधिक १११७४ धावांचा विक्रम मोडित काढला होता. कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा युगपुरूष म्हणून त्याच्या नावे तब्बल २ वर्षे ११ महिने एवढ्या कालावधीपर्यंत हा विक्रम होता.
क्रिकेटमधील आजच्या युगातील स्पर्धा बघता हा कालावधी खूप झाला. सचिन या शिखरावर किती दिवस राहणार हे तो आणखी या लयीत किती दिवस खेळणार यावर अवलंबून राहिल. कारण रिकी पॉटींगची झपाट्याची घोडदौड बघता आणि तो अजूनही भरात असल्याने हे आव्हानच ठरेल. सचिनचे ३९ कसोटी शतकं आहेत तर पॉटींगच्या ३६ शतकांसहित १०२३९ धावा आहेत, म्हणजे सचिनच्या आसपासच. क्रिकेटमध्ये देवत्व प्राप्त झाल्यानंतरही तेवढाच नम्र आहे, क्रिकेटच्या पंढरीतील सच्चा भक्त आहे. म्हणूनच तो महान आहे. आपल्या विक्रमादित्याला मन:पूर्वक शुभेच्छा!