21 वर्षांपूर्वी पेशावर येथे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यातील आठवणी पाकिस्तानचा माजी कसोटीपटू आणि पाक निवड समितीचे माजी अध्यक्ष अब्दुल कादीर यांना आजही जशाच्या तशा आठवतात. 16 वर्षांच्या चिमुरडा सचिनने मारलेले लागोपाठ तीन षटकार आपण आजही विसरलेलो नाही, अशी कबुली अब्दुल कादीरने दिली.
पाकिस्तान संघाचे माजी फिरकीपटू कादीर म्हणाले, की श्रीकांतला एक षटक मी निर्धाव टाकले होते. त्यावेळी दुसर्या बाजूला उभा असलेल्या सचिनला म्हणालो की, 'हिंमत असेल तर मला षटकार मारुन दाखव' आणि मी क्षेत्ररक्षणासाठी गेलो. त्यानंतर एका षटकारानंतर मी पुन्हा गोलंदाजीला आलो. त्यावेळी माझा टोमणा तो विसरला नव्हता. त्याने माझ्या पहिल्याच चेंडूला स्टेडियमबाहेर भिरकावून दिले. त्यानंतर अजून दोन षटकार मारले. माझ्या त्या षटकात 28 धावा गेल्या. तुम्हाला वाटेल 'बच्चा' खेळत असेल म्हणून मी लॅलिपॉट चेंडू टाकले असतील. परंतु, हे सत्य नाही. मी माझा सर्व अनुभव पणाला लावून गोलंदाजी केली होती. त्यावेळी मला सचिनमधील ती गुणवत्ता थक्क करुन गेली होती. आजही सचिनने विक्रमाचे एव्हरेस्ट सर केले असले तरी मला त्याने मारलेले ते तीन षटकार कायम आठवितात.