गेली 20 वर्ष सतत धावांचा पाऊस पाडणारा सचिन रमेश तेंडुलकर याची प्रत्येक खेळी एक नवीन विक्रमास जन्म देते. विक्रम हा त्याच्या आयुष्याचा एक भाग आहे. यामुळे सचिन आणि विक्रम हे समीकरणही घट्ट जमले आहे. विक्रमादित्य सचिनने गुरुवारी (ता.पाच नोव्हेंबर) पुन्हा एक विक्रम केला. 17 हजार धावा पूर्ण करुन त्याने आपल्या विक्रमात पुन्हा एकाने भर घातली. 17 हजार धावा करताना 175 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी तो खेळला. क्रिकेटमधील असा फटका नव्हतो जो सचिनने या खेळी दरम्यान मारला नव्हता.
सचिनने 18 डिसेंबर 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्या एक हजार धावा त्याने 1992 मध्ये 36 व्या सामन्यातच पूर्ण केल्या. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. मजल, दलमजल करीत 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने दहा हजार धावा पूर्ण केल्या. त्यानंतर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. त्या विक्रमापासून इतर फलंदाज खूप लांब आहे. आता तो विक्रमांचा एव्हरेस्टवर उभा राहिला आहे. भविष्यातही कोणत्याही खेळाडूंना त्याचा विक्रमाचा एव्हरेस्ट सर करणे अवघडच नाही तर अशक्य होणार आहे. सचिनच्या नावावर आज एकदिवसीय सामन्यात 45 तर कसोटी सामन्यात 42 शतके मिळून 87 शतके आहेत. एकूण 144 अर्धशतके त्याने केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17,168 धावा झाल्या आहेत. तर कसोटीत 159 सामन्यात त्याने 12,773 धावा केल्या आहेत.एकूण 29,951 धावांवर तो नाबाद आहे. त्याच्या या विक्रमांपासून इतर खेळाडू खूप लांब आहेत. गुरुवारी हैदराबादमध्ये खेळताना तो दणक्यात खेळला. त्याचा फटक्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. परंतु त्याच्या विक्रमाबरोबर भारत सामना जिंकला असता तर दुधात केशर पडल्याचा आनंद त्याच्यासह सर्वांना झाला असता. सतरा हजाराच्या या टप्प्याने सचिनला याआधीही अनेकदा हुलकावणी दिली होती. चॅंपियन्स चषक स्पर्धेत पाकविरुद्धच्या सामन्यात सचिन लवकर बाद झाला नसता, तर त्या वेळीच हा पल्ला त्याला गाठता आला असता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पुढील सामना पावसामुळे रद्द झाला, तर वेस्ट विंडीजविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो हॉटेलच्या खोलीत कोसळल्याने सामना खेळू शकला नव्हता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरल्याची टीका होण्यापूर्वी त्याने आपल्या बॅटने उत्तर दिले. कारण यापूर्वी त्याची खेळी 18 (बडोदा), 4 (नागपूर) 32 (दिल्ली) 40 (मोहाली) अशी झाली होती. दिल्लीच्या सामन्यात तो धावचित झाला होतो तर मोहालीत पंच अशोक डिसिल्व्हाच्या चुकीच्या निर्णयाचा तो बळी ठरला. (डिसिल्व्हा आणि बकनर हे सचिन मागे लागलेले शनीच आहे.) नाहीतर 17 हजाराचा टप्पा त्याने मोहालीत पार केला असता. विक्रमादित्य सचिन आजही तसाच नम्र आहे, जसा तो 20 वर्षांपूर्वी होतो. त्याच्या डोक्यात हवा गेली नाही. त्याचे पाय कायम जमिनीवर असतात. त्याच्या बोलण्यात वा वागण्यात उद्धटपणा आला नाही किंवा अहंभाव आला नाही. आपल्यावर केलेल्या टीकेला तो स्वत: कधीही उत्तर देत नाही. परंतु आपल्या बॅटनेच टीकाकारांना त्याच्याकडून उत्तरे मिळत असतात. मैदानावर असूनही त्याच्याबद्दल कोणताही प्रवाद उठला नाही. यामुळे क्रिकेटचा तो दैवत झाला आहे. त्याची लोकप्रियता भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. सर डॉन ब्रॅडमनपासून ब्रायन लारापर्यंत सर्वच खेळाडूंनी त्याचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे.सचिन बॅड पॅचमध्ये आला की त्याला निवृत्तीचे सल्ले देणार्या सल्लागारांचे पीक काँग्रेस गवतासारखे उगवते. परंतु चांगल्या खेळीने तो त्यांना उत्तर देतो. आपणास क्रिकेटचा आनंद लुटायचा असल्याचे सांगून तो सर्वांना टोलवून लावतो. भारतासाठी खेळत राहून धावांची भूक अशीच कायम ठेवण्याचे त्याचे स्वप्न आहे. देशाला विश्वकरंडक जिंकून देण्याची त्याची महत्वाकांक्षा आहे.