॥ श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
गतकथेचें अनुसंधान । बाबांचें अरुंद फळीवर शयन । अलक्ष्य आरोहण अवतरण । अकळ विंदान तयांचें ॥१॥
असो हिंदु वा यवन । उभयतांसी समसमान । जाहलें आयुर्दाय - पर्यालोचन । तें हें देवार्चन शिरडीचें ॥२॥
आतां हा अध्याय अकरावा । गोड गुरुकथेचा सुहावा । वाटलें साईचरणीं वहावा । द्दढ भावा धरूनि ॥३॥
घडेल येणें सगुणध्यान । हें एकादशरुद्रावर्तन । पंचभूतांवर । सत्ता प्रमाण । बबांचें महिमान कळेल ॥४॥
कैसे इंद्र अग्नि वरुण । बाबांच्या वचनास देती मान । आतां करूं तयाचें दिग्दर्शन । श्रोतां अवधान देइंजे ॥५॥
पूर्ण विरक्तीची विरक्ति । ऐसी साईंची सगुण मूर्ति । अन्यभक्तां निजविश्रांति । आठवूं चित्तीं सप्रेम ॥६॥
गुरुवाक्यैक - विश्वासन । हेंचि बैसाया देऊं आसन । सर्वसंकल्पसंन्यासन । करूं पूजन या संकल्पें ॥७॥
प्रतिमा स्थंडिल अग्नि तेज । सूर्यमंडळ उदक द्विज । या सातांहीवरी गुरुराज । अनन्य पूजन करूं कीं ॥८॥
चरण धरितां अनन्यभावें । गुरुचि काय परब्रम्हा हेलावे । ऐसे गुरुपूजेचे नवलावे । अनुभवावे गुरुभक्तें ॥९॥
पूजक जेथवर साकारू । देहधारीच आवश्यक गुरु । निराकारास निराकारू । हा निर्धारू शास्त्राचा ॥१०॥
न करितां सगुणाचे ध्याना । भक्तिभाव कदा प्रकटेना । आणि सप्रेम जंव भक्ति घडेना । कळी उघडेना मनाची ॥११॥
तें उमलल्याविण कांहीं । केवळ कर्णिक्सेस गंध नाहीं । ना मकरंद ना भ्रमर पाहीं । तेथ राहील क्षणभरी ॥१२॥
सगुण तेंचि साकार । निर्गुण तें निराकार । भिन्न नाहीं परस्पर । साकार निराकार एकचि ॥१३॥
थिजलें तरी तें घृत्तचि संचलें । विघुरलें तेंही घृतचि म्हणितलें । सगुण निर्गुण एकचि भरलें । समरसलें विश्वरूपें ॥१४॥
डोळे भरूनि जें पाहूं येई । पदीं ज्याच्या ये ठेवितां डोई । जेथ ज्ञानाची लागे सोई । आवडी होई ते ठायीं ॥१५॥
जयाचिये संगती । प्रेमवार्ता करूं येती । जयासी पूजूं ये गंधाक्षतीं । म्हणूनि आकृति पाहिजे ॥१६॥
निर्गुणाहूनि सगुणाचें । आकलन बहु सुकर साचें । द्दढावल्या प्रेम सगुणाचें । निर्गुणाचें बोधन तें ॥१७॥
भक्तां निर्गुण ठायीं पडावें । बाबांनीं अनंत उपाय । योजावे । अधिकारानुरूप दूर बसवावें । दर्शन वर्जावें बहुकाळ ॥१८॥
एकास देशांतरा पाठवावें । एकास शिरडींत एकांतीं कोंडावें । एकास वाडयांत अडकवावें । नेम द्यावे पोथीचे ॥१९॥
वर्षानुवर्ष हा अभ्यास । होतां वाढेल निर्गुणध्यास । आसनीं शयनीं भोजनीं मनास । जडेल सहवास बाबांचा ॥२०॥
देह तरी हा नाशिवंत । कधीं तरी होणार अंत । म्हणूनि भक्तीं न करावी खंत । अनाद्यनंत लक्षावें ॥२१॥
हा बहुविध द्दश्य पसारा । सकल अव्यक्ताचा सारा । अव्यक्तांतूनि आला आकारा । जाणार माघारा अव्यक्तीं ॥२२॥
ही आब्रम्हास्तंब सृष्टी । व्यष्टीं जैसी तैसी समष्टी । उपजली ज्या अव्यक्तापोटीं । तेथेंच शेवटीं समरसे ॥२३॥
म्हणवूनि कोणासही ना मरण । मग तें बाबांस तरी कोठून । नित्य शुद्धबुद्धनिरंजन । निर्मरण श्रीसाई ॥२४॥
कोणी म्हणोत भगवद्भक्त । कोणी म्हणोत महाभागवत । परी आम्हांसी ते साक्षात भगवंत । मूर्तिमंत वाटले ॥२५॥
गंगा समुद्रा भेटूं जाते । वाटेनें तापार्ता शीतल करिते । तीरींचे तरूंसी जीवन देते । तृषा हरिते सकळांची ॥२६॥
तैसीच संतांची अवतारस्थिति । प्रकट होती आणि जाती । परी तयांची आचरिती रीती । पावन करिती जगातें ॥२७॥
कमालीची क्षमाशीलता । नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता । ऋजुता मुदुता सोशिकता । तैसीच संतुष्टता निरुपम ॥२८॥
दिसाया जरी देहधारी । तरी तो निर्गुण निर्विकारी । नि:संग निर्मुक्त निज अंतरीं । प्रपंचीं जरी विचरला ॥२९॥
कृष्ण स्वयें जो परमात्मा । तोही म्हणे संत मदात्मा । संत माझी सजीव प्रतिमा । संत - सप्रेमा तो मीच ॥३०॥
प्रतिमारूपही संतां न साजे । संत निश्चळ स्वरूप माझें । म्हणवूनि मद्भक्तांचें ओझें । तयांचें लाजें मी वाहें ॥३१॥
संतांसी जो अनन्यशरण । मीही वंदीं तयाचे चरण । ऐसें वदला उद्धवा आपण । संतमहिमान श्रीकृष्ण ॥३२॥
सगुणांतल जो सगुण । निर्गुणांतला जो निर्गुण । गुणवंतांतील जो अनुत्तम गुण । गुणियांचा गुणिया गुणिराजा ॥३३॥
पर्याप्तकाम जो कृतकृत्य । सदा यद्दच्छालाभतृप्त । जो अनवरत आत्मनिरत । सुखदु:खातीत जो ॥३४॥
आत्मानंदाचें जो वैभव । कोणा वर्णवेल तें गौरव । अनिर्वाच्य सर्वथैव । ब्रम्हा दैवत मूर्त जो ॥३५॥
कीं ही अनिर्वचनीय शक्ति । द्दश्यरूपें अवतरली क्षितीं । सच्चित्सुखानंदाची मूर्ति । ज्ञानसंवित्ति तीच ती ॥३६॥
ब्रम्हाकारांत:करणमूर्ति । झाली जयाची प्रपंचीं निवृत्ती । नित्य निष्प्रपंच ब्रम्हात्म्यैक्यस्थिति । आनंदमूर्ति केवळ ती ॥३७॥
आनंदो ब्रम्होति श्रुति । श्रोते नित्य श्रवण करिती । पुस्तकज्ञानी पोथींत वाचिती । भाविकां प्रतीती शिरडींत ॥३८॥
धर्माधर्मादि ज्याचें लक्षण । तो हा संसार अति विलक्षण । अनात्मज्ञांसी क्षणोक्षण । करणें रक्षण प्राप्त कीं ॥३९॥
परी हा न आत्मज्ञांचा विषय । तयांसी आत्मस्वरूपींच आश्रय । ते नित्यमुक्त आनंदमय । सदा चिन्मयरूप जे ॥४०॥
बाबाच सर्वांचें अधिष्ठान । तयांसी केउतें आसन । त्याहीवरी रौप्य सिंहासन । भक्तभावन परी बाबा ॥४१॥
बहुतां दिसांची जुनी बैठक । गोणत्याचा तुकडा एक । त्यावरी घालिती भक्त भाविक । गादी सुरेख बैसाया ॥४२॥
मागील टेकायाची भिंत । तेथें तक्या ठेविती भक्त । जैसें भक्तांचें मनोगत । बाबाही वागत तैसेच ॥४३॥
वास्तव्य दिसे शिरडींत । तरी ते होते सर्वगत । हा अनुभव निजभक्तांप्रत । साई नित्य दाखवीत ॥४४॥
स्वयें जरी निर्विकार । अंगिकारीत पूजा - उपचार । भक्तभावार्थानुसार । प्रकार सर्व स्वीकारीत ॥४५॥
कोणी करीत चामरांदोलन । कोणी तलावृन्त - परिवीजन । सनया चौघडे मंगल वादन । कोणी समर्पण पूजेचें ॥४६॥
कोणी हस्त - पादप्रक्षालन । कोणी अत्तर - गंधार्चन । कोणी त्रयोदशगुणी तांबूलदान । निवेदन महानैवेद्या ॥४७॥
कोणी दुबोटी आडवें गंध । शिवलिंगा तैसें चर्चिती सलंग । कोणी कस्तूरीमिश्रित सुगंध । तैसेंचि चंदन चर्चीत ॥४८॥
एकदां तात्यासाहेब नूलकरांचे । स्नेही डॉक्टर पंडित नांवाचे । घ्यावया दर्शन साईबाबांचें । आले एकदांच शिरडींत ॥४९॥
पाऊल ठेवितां शिरडींत । आरंभीं गेले मशिदींत । करूनि बाबांसी प्रणिपता । बैसले निवांत क्षणभरी ॥५०॥
बाबा मग वदती तयांतें । “जाईं दादाभटाच्या येथें । जा असे जा” म्हणूनि बोटें हातें । लाविती मार्गातें तयांस ॥५१॥
पंडित दादांकडे गेले । दादांनीं योग्य स्वागत केलें । मग दादा बाबांचे पूजेस निघाले । येतां का विचारिले तयांसी ॥५२॥
दादांसमवेत पंडित गेले । दादांनीं बाबांचें पूजन केलें । कोणीही न तोंवर लावाया धजलें । गंधाचे टिळे बाबांस ॥५३॥
कोणी कसाही येवो भक्ता । कपाळीं गंध लावूं न देत । मात्र म्हाळसापती गळ्यासी फांसीत । इतर ते लावीत पायांतें ॥५४॥
परी हें पंडित भोळे भाविक । दादांची तबकडी केली हस्तक । धरूनियां श्रीसाईंचें मस्त । रेखिला सुरेख त्रिपुंड्र ॥५५॥
पाहूनि हें तयांचें साहस । दादांचे मनीं धासधूस । चढतील बाबा परम कोपास । काय हें धाडस म्हणावें ॥५६॥
ऐसें अघडतें जरी घडलें । बाबा एकही न अक्षर वदले । किंबहुना वृत्तीनें प्रसन्न दिसले । मुळीं न कोपले तयांवर ॥५७॥
असो ती वेळ जाऊं दिली । दादांचे मनीं रुखरुख राहिली । मग तेचि दिनीं सायंकाळीं । बाबांसी विचारिली ती गोश्ट ॥५८॥
आम्ही गंधाचा उलासा टिळा । लावूं जातां आपुलिया निढळा । स्पर्श करूं द्या ना कपाळा । आणि हें सकाळा काय घडलें ॥५९॥
आमुच्या टिळ्याचा कंटाळा । पंडितांच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा । हा काय नवलाचा सोहळा । बसेना ताळा सुसंगत ॥६०॥
तंव सस्मितवदन प्रीतीं । साई दादांलागीं वदती । परिसावी ती मधुर उरक्ती । सादर चित्तीं सकळिकीं ॥६१॥
“दादा तयाचा गुरु बामण । हा जातीचा मुसलमान । तरी मी तोचि ऐसें मानून । केलें गुरुपूजन तयानें ॥६२॥
आपण मोठे पवित्र ब्राम्हाण । हा जातीचा अपवित्र यवन । कैसें करूं त्याचें पूजन । ऐसें न तन्मन शंकलें ॥६३॥
ऐसें मज त्यानें फसविलें । तेथें माझे उपाय हरले । नको म्हणणें जागींच राहिलें । आधीन केलें मज तेणें” ॥६४॥
ऐसें जरी उत्तर परिसिलें । वाटलें केवळ विनोदें भरलें । परी तयांतील इंगित कळलें । माघारा परतले जैं दादा ॥६५॥
ही बाबांची विसंगतता । दादांच्या फारचि लागली चित्ता । परी पंडितांसवें वार्ता करितां । कळली सुसंगतता तात्काळ ॥६६॥
धोपेश्वरींचे रघुनाथ सिद्धा । काका पुराणिक नामें प्रसिद्ध । पंडित तयांचे पदीं सन्नद्ध । ऋणानुबंध शिष्यत्वें ॥६७॥
त्यांनीं घातला काकांचा ठाव । तयांसी तैसाच आला अनुभव । जया मनीं जैसा भाव । भक्तिप्रभावही तैसाच ॥६८॥
असो हे सर्वोपचार करवूनि घेती । केवळ तयांच्या आलिया चित्तीं । ना तों पूजेचीं ताटें भिरकाविती । रूप प्रकटिती नरसिंह ॥६९॥
हें रूप कां जैं प्रकटिजेल । कोण धीराचा पाशीं ठाकेल । जो तो जीवाभेणें पळेल । वृत्ति खवळेल ती जेव्हां ॥७०॥
कधीं अवचित क्रोधवृत्ति । भक्तांवरी आग पाखडिती । कधीं मेणाहूनि मऊ भासती । पुतळा शांतिक्षमेचा ॥७१॥
कधीं काळाग्निरूप भासती । भक्तांसी खङ्गाचे धारेवरी धरिती । कधीं लोण्याहूनि मवाळ होती । आनंदवृत्ति विलसती ॥७२॥
जरी क्रोधें कांपले थरथरां । डोळे जरी फिरविले गरगरां । तरी पोटीं कारुण्याचा झरा । माता लेंकुरा तैसा हा ॥७३॥
क्षणांत वृत्तीवरी येतां । हांका मारूनि बाहती भक्तां । म्हणती “मी कोणावरीही रागावतां । ठावें न चित्ता माझिया ॥७४॥
माय हाणी लेंकुरा लाता । समुद्रा करी नदियां परता । तरीच मी होय तुम्हां अव्हेरिता । करीन अहिता तुमचिया ॥७५॥
मी माझिया भक्तांचा अंकिला । आहें पासींच उभा ठाकला । प्रेमाचा मी सदा भुकेला । हांक हांकेला देतसें” ॥७६॥
हा कथाभाग लिहितां लिहितां । ओघानें आठवली समर्पक कथा । उदाहरणार्थ कथितों श्रोतां । सादरचित्ता परिसिजे ॥७७॥
आला कल्याणवासी एक यवन । सिदीक फाळके नामाभिधान । मक्का - मदीन यात्रा करून । शिरडीलागून पातला ॥७८॥
उररला तो वृद्ध हाजी । उत्तराभिमुख चावडीमाजी । प्रथम नऊ मास इतराजी । बाबा न राजी तयातें ॥७९॥
आला नाहीं तयाचा होरा । व्यर्थ जाहल्या येरझारा । केल्या तयानें नाना तर्हा । नजरानजर होईना ॥८०॥
मशीद मुक्तद्वार अवघ्यांसी । कोणासही ना पडदपोशी । परी न आज्ञा त्या फळक्यासी । चढावयासी मशीदीं ॥८१॥
फाळके अंतरीं खिन्न झाले । काय तरी हें कर्म वहिलें । मशिदीस न लागती पाउलें । काय म्यां केलें पाप कीं ॥८२॥
कवण्या योगें प्रसन्न होती । आतां बाबा मजवर पुढती । हाच विचार दिवसरातीं । ह्रद्रोग चित्तीं फाळक्यांचे ॥८३॥
तितक्यांत कोणी कळविलें तयांस । होऊं नका ऐसे उदास । धरा माधवरावांची कास । पुरेल आस मनींची ॥८४॥
आधीं न घेतां नंदीचें दर्शन । शंकर होईल काय प्रसन्न । तयासी याच मार्गाचें अवलंबन । गमलें साधन तें बरवें ॥८५॥
सकृद्दर्शनीं ही अतिशयोक्ति । ऐसें वाटेल श्रोतयां चित्तीं । परी हा अनुभव दर्शनवक्तीं । भक्तांप्रती शिरडींत ॥८६॥
जया मनीं बाबांचे सवें । संथपणें संभाषण व्हावें । तयाचिया समवेत जावें । माधवरावें आरंभीं ॥८७॥
आले हे कोण कोठूनि किमर्थ । गोड शब्दें कळवावा कार्यार्थ । सूतोवाच होतांच समर्थ । होत मग उद्युक्त बोलाया ॥८८॥
ऐकोनियां तें हाजीनें सकळ । माधवरावांस घातली गळ । म्हणाले एकदां ही माझी तळमळ । घालवा, दुर्मिळ मिळवूनि द्या ॥८९॥
पडतां माधवरावांस भीड । केल मनाचा निश्चय द्दढ । असो वा नसो कार्य अवघड । पाहूं कीं दगड टाकुनी ॥९०॥
गेले मशिदीस केला धीर । गोष्ट काढिली अतिहळुवार । “बाबा तो म्हातारा कष्टी फार । कराना उपकार तयावरी ॥९१॥
हाजी तो करूनि मक्का - मदीना । शिरडीस आला आपुले दर्शना । तयाची कैसी येईना करुणा । येऊंच द्याना मशीदीं ॥९२॥
जन येती असंख्यात । जाऊनि मशिदींत दर्शन घेत । हातोहात चालले जात । हाच खिचपत पडला कां ॥९३॥
करा कीं एकदां कृपाद्दष्टी । होवो तयासी मशिदींत भेटी । जाईल मग तोही उठाउठी । पुसूनि गोष्टी मनींची ”॥९४॥
“शाम्या तुझ्या ओठांचा जार । अजून नाहीं वाळला तिळभर । नसतां अल्लाची खुदरत तयारवर । मी काय करणार तयासी ॥९५॥
नसतां अल्लमियाचा ऋणी । चढेल काय या मशिदीं कुणी । अघटित येथील फकीराची करणी । नाहीं मी धणी तयाचा ॥९६॥
असो बारवीपलीकडे थेट । आहे जी एक पाऊलवाट । चालूनि येसील काय तूं नीट । विचार जा स्पष्ट तयातें” ॥९७॥
हाजी वदे कितीही बिकट । असेना ती मी चालेन नीट । परी मज द्यावी प्रत्यक्ष भेट । चरणानिकट बैसूं द्या ॥९८॥
परिसूनि शामाकरवीं हें उत्तर । बाबा वदती आणीक विचार । “चार वेळांतीं चाळीस हजार । रुयपे तूं देणार काय मज” ॥९९॥
माधवराव हा निरोप सांगतां । हाजी म्हणाले हें काय पुसतां । देईन चाळीस लाखही मागतां । हजारांची कथा काय ॥१००॥
परिसोनि बाबा वदती त्या पूस । “आज बोकड कापावयाचा मानस । आहे आमुचा मशिदीस । तुज काय गोस पाहिजे ॥१०१॥
किंवा पाहिजे तुवर अस्थी । किंवा वृषणवासना चित्तीं । जा विचार त्या म्हातार्याप्रती । काय निश्चित वांछी तो” ॥१०२॥
माधवरावें समग्र कथिलें । हाजीप्रती बाबा जें वदले । हाजी निक्षून वदते झाले । “नलगे त्यांतलें एकही मज ॥१०३॥
द्यावें मज कांहीं असेल चित्ता । तरी मज आहे एकचि आस्था । कोळंब्यांतील तुकडा लाभतां । कृतकल्याणता पावेन” ॥१०४॥
हाजीचा हा निरोप घेऊन । माधवराव आले परतोन । करितांच बाबांस तो निवेदन । बाबा जे तत्क्षण खवळले ॥१०५॥
कोळंबा आणि पाण्याच्या घागरी । स्वयें उचलूनि मरकाविल्या द्वारीं । हात चावोनियां करकरी । आले शेजारीं हाजीच्या ॥१०६॥
धरूनि आपुली कफनी दों करीं । हाजीसन्मुख उचलूनि वरी । म्हणती “तूं काय समजलास अंतरीं । करिसी फुशारी मजपुढें ॥१०७॥
बुढ्ढेपणाचा तोरा दाविसी । ऐसेंचि काय तूं कुराण पढसी । मक्का केल्याचा ताठा वाहसी । परी न जाणसी तूं मातें” ॥१०८॥
ऐसें तयासी निर्भर्त्सिलें । अवाच्य शब्दप्रहार केले । हाजी बहु गांगरूनि गेले । बाबा परतले माघारा ॥१०९॥
मशिदीचे आंगणीं शिरतां । माळिणी देखिल्या आंबे विकितां । खरेदिल्या त्या पाटया समस्ता । पाठविल्या तत्त्वता हाजीस ॥११०॥
तैसेचि तात्काळ मागें परतले । पुन्हां त्या फाळक्यापाशीं गेले । रुपये पंचावन्न खिशांतूनि काढिले । हातावर मोजिले तयाचे ॥१११॥
तेथूनि पुढें मग प्रेम जडलें । हाजीस जेवावया निमंत्रिलें । दोघेही जणूं अवघें विसरले । हाजी समरसले निजरंगीं ॥११२॥
पुढें मग ते गेले आले । यथेच्छ बाबांचे प्रेमीं रंगले । नंतरही बाबांनीं वेळोवेळे । रुपये दिधले तयास ॥११३॥
असो एकदां साईसमर्था । मेघावरीही जयाची सत्ता । तया इंद्रासी पाहिलें प्रार्थितां । आश्चर्य चित्ता दाटलें ॥११४॥
अति भयंकर होता समय । नभ समग्र भरलें तमोमय । पशुपक्षियां उद्भवलें भय । झंजा वायु सूटला ॥११५॥
झाला सूर्यास्त सायंकाळ । उठली एकाएकीं वावटळ । सुटला वार्याचा सोसाटा प्रबळ । उडाली खळबळ दुर्धर ॥११६॥
त्यांतचि मेघांचा गडगडाट । विद्युल्लतांचा कडकडात । वार्याचा भयंकर सोसाट । वर्षाव घनदाट जोराचा ॥११७॥
मेघ वर्षल मुसळधारा । वाजूं लागल्या फटफट गारा । ग्रामस्थांसी सुटला भेदरा । गुरांढोरां आकांत ॥११८॥
मशिदीच्या वळचणीखालीं । भणंगभिकारी निवार्या आलीं । गुरेंढोरें वासरें एकत्र मिळालीं । भीड झाली मशीदीं ॥११९॥
पाणीच पाणी चौफेर झालें । गवत सारें वाहूनि गेलें । पीकही खळ्यांतील सर्व मिजलें । लोक गबजले मानसीं ॥१२०॥
अवघे ग्रामस्थ घाबरले । सभामंडपीं येऊनि भरले । कोणी मशिदीचे वळचणीस राहिले । गार्हाणें घातलें बाबांना ॥१२१॥
जोगाई जाखाई मरीआई । शनि शंकर अंबाबाई । मारुति खंडोबा म्हाळसाई । ठायीं ठायीं शिरडींत ॥१२२॥
परी अवघड प्रसंग येतां । कामीं पडेना एकही ग्रामस्था । तयांचा तो चालता बोलता धांवता । संकटीं पावता एक साई ॥१२३॥
नलगे तयासी बोकड कोंबडा । नलगे तयासी टका दोकडा । एका भावाचा भुकेला रोकडा । करी झाडा संकटांचा ॥१२४॥
पाहूनि ऐसे लोक भ्याले । महाराज फारचि हेलावले । गादी सोडुनी पुढें आले । उभे राहिले धारेवर ॥१२५॥
मेघनिनादें भरल्या नभा । कडाडती विजा चमकती प्रभा । त्यांतचि साईमहाराज उभा । आकंठ बोभाय उच्चस्वरें ॥१२६॥
निज जीवाहूनि निजभक्ता । देवास आवडती साधुसंत । देव तयांचे बोलांत वर्तत । अवतार घेत त्यालागीं ॥१२७॥
परिसोनि भक्तांचा धावा । देवासी लागे कैवार घ्यावा । वरचेवरी शब्द झेलावा । भक्त - भावा स्मरोनि ॥१२८॥
चालली आरोळीवर आरोळी । नाद दुमदुमला निराळीं । वाटे मशीद डळमळली । कांटाळी बैसली सकळांची ॥१२९॥
त्या गिरागजर तारस्वरें । दुमदुमलीं मशीद - मंदिरें । तंव मेघ निजगर्जना आवरे । वर्षाव थारे धारांचा ॥१३०॥
उदंड बाबांची आरोळी । अवघा सभामंडप डंडळी । जगबजली भक्तमंडळी । तटस्थ ठेली ठायींच ॥१३१॥
अतर्क्य बाबांचें विंदान । जाहलें वर्षावा आकर्षण । वायूही आवरला तत्क्षण । धुई विच्छिन्न जाहली ॥१३२॥
हळू हळू पाऊस उगवला । सोसाटाही मंदावला । नक्षत्रगण दिसूं लागला । तम निरसला ते काळीं ॥१३३॥
पाऊस पुढें पूर्ण उगवला । सोसाटयाचा पवनही विरमला । चंद्र गगनीं दिसूं लागला । आनंद झाला सकळांतें ॥१३४॥
वाटे इंद्रास दया आली । पाहिजे संतांची वाणी राखली । ढगें बारा टावा फांकलीं । शांत झाली वावटळ ॥१३५॥
पाऊस सर्वस्वी नरमला । वाराही मंद वाहूं लागला । गडगडाट जागींच जिराला । धीर आला पशुपक्ष्यां ॥१३६॥
सोडूनियां घरांच्या वळचणी । गुरें वासरें बाहेर पडुनी । वावरूं लागलीं निर्भय मनीं । पक्षीही गगनीं उडाले ॥१३७॥
पाहूनि पूर्वील भयंकर प्रकार । मानूनियां बाबांचे उपकार । जन सर्व गेले घरोघर । गुरेंही सुस्थिर फरकलीं ॥१३८॥
ऐसा हा साई दयेचा पुतळा । तयासी भक्तांचा अति जिव्हाळा । लेंकुरां जैसा आईचा कळवळा । किती मी प्रेमळा गाऊं त्या ॥१३९॥
अग्नीवरीही ऐसीच सत्ता । ये अर्थीची संक्षिप्त कथा । श्रोतां परिसिजे सादर चित्ता । कळेल अपूर्वता शक्तीची ॥१०४॥
एकदां माध्यान्हीची वेळ । धुनीनें पेट घेतला सबळ । कोण राहील तेथ जवळ । ज्वाळाकल्लोळ ऊठला ॥१४१॥
प्रचंड वाढला ज्वाळामाळी । तक्तपोशीला शिखा भिडली । वाटे होते मशिदीची होळी । राखरांगोळी क्षणांत ॥१४२॥
तरी बाबा मनीं स्वस्थ । सकळ लोक चिंताग्रस्त । तोंडांत बोटें घालीत समस्त । काय ही शिकस्त बाबांची ॥१४३॥
एक म्हणे आणा कीं पाणी । दुजा म्हणे घालावें कोणीं । घालितां माथां सटका हाणी । कोण त्या ठिकाणीं जाईल ॥१४४॥
मनीं जरी सर्व अधीर । विचारावया नाहीं धीर । बाबाच तंव होऊनि अस्थिर । सटक्यावर कर टाकियला ॥१४५॥
पाहोनि ज्वाळांचा भडका । हातीं घेऊनियां सटका । हाणिती फटक्यावरी फटका । म्हणती हट का माघारा ॥१४६॥
धुनीपासाव एक हात । स्तंभावरी करिती आघात । ज्वाळांकडे पहात पहात । सबूर सबूर वदत ते ॥१४७॥
फटक्या-फटक्यास खालीं खालीं । ज्वाला नरम पडूं लागली । भीति समूळ उडूनि गेली । शांत झाली तैं धुनी ॥१४८॥
तो हा साई संतवर । ईश्वराचा दुजा अवतार । डोई तयाच्या पायांवर । ठेवितां कृपाकर ठेवील ॥१४९॥
होऊनि श्रद्धा - भक्तियुक्त । करील जो या अध्यायाचें नित्य । पारायण होऊनि स्वस्थचित्त । आपदानिर्मुक्त होईल ॥१५०॥
फार अकाय करुं मी कथन । शुद्ध करोनियां अंत:करण । नेमनिष्ठ व्हा साईपरायण । ब्रम्हा सनातन पावाल ॥१५१॥
पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंतीं पूर्ण निष्काम । पावाल दुर्लभ साजुज्यधाम । अखंड राम लाधाल ॥१५२॥
असो जया भक्तांच्या चित्तीं । भोगावी परमार्थसुखसंवित्ती । तेणें ये अध्यायानुवृत्तीं । आदरवृत्ति ठेवावी ॥१५३॥
शुद्ध होईल चित्तवृत्ति । कथासेवनीं परमार्थप्रवृत्ति । इष्टप्राप्ति अनिष्टनिवृत्ति । पहावी प्रचीति बाबांची ॥१५४॥
हेमाडपंत साईंस शरण । पुढील अध्याय अतिपावन । गुरुशिष्यांचें तें महिमान । घोलप - दर्शन गुरुपुत्रा ॥१५५॥
शिष्यास कैसाही प्रसंग येवो । तेणें न त्यजावा निज गुरुदेवो । साई तयाचा प्रत्यक्ष अनुभवो । दावी द्दढ भावो वाढवी ॥१५६॥
जे जे भक्त पायीं । प्रत्येका दर्शनाची नवाई । कोणास कांहीं कोणास कांहीं । देऊनि ठायींच द्दढ केलें ॥१५७॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । श्रीसाईमहिमावर्णनंनाम एकादशोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥