॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
साईमहाराज कृपासागर । साक्षात् ईश्वरी अवतार । पूर्णब्रम्हा महान् योगेश्वर । साष्टांग नमस्कार तयांसी ॥१॥
जयजयाजी संतललामा । मंगलधामा आत्मारामा । साईसमर्था भक्तविश्रामा । पूर्णकामा तुज नमो ॥२॥
पूर्वाध्यायीं निरूपण । थट्टाविनोदपरिशीलन । परी हा साई भक्तभावन । भक्तरंजन नित्य करी ॥३॥
साई परम दयामूर्ति । एक पाहिजे अनन्य भक्ति । भक्त श्रद्धाळू आणि भावार्थी । इच्छितार्थीं ना न्यून ॥४॥
सद्नुरु तोचि माझी मूर्ति । कृष्ण बोले उद्धवाप्रती । ऐसा सद्नुरु भजावा प्रीतीं । अनन्य भक्ति या नांव ॥५॥
अंतरीं उदेला मनोरथ । ल्याहावें श्रीसाईचरित । लीलाश्रवणार्ह अत्यद्भुत । लिहवूनि निश्चित मज केलें ॥६॥
नसतां अधिकार - ज्ञानव्युत्पत्ति । मज पामरा स्फुरविली स्फूर्ति । ग्रंथ लिहविला माझिये हातीं । द्यावया जागृति निजभक्तां ॥७॥
दप्तर ठेवीं ऐसी अनुज्ञा । जेव्हां जाहली मजसम अज्ञा । तेव्हांच माझी अल्प प्रज्ञा । धैर्यविज्ञानसंपन्न ॥८॥
तेव्हांच मज आला धीर । कीं हा साई गुणगंभीर । ठेवूनि घेणार आपुलें दप्तर । निजभक्तोद्धाराकारणें ॥९॥
नातरी हा वाग्विलास । होतें काय मज हें साहस । संतचरण - प्रसाद पायस । चरितसुधारस हा ऐसा ॥१०॥
ही श्रीसाईचरितरूपा । भक्तार्थ साईकथामृतप्रपा । यथेच्छ सेवा साईकृपा । भवदवतापा निवारा ॥११॥
चरित नव्हे हा सोमकांत । साईकथा चंद्रामृत स्रवत । भक्त चकोर तृषाकुलित । होवोत तृप्त मनसोक्त ॥१२॥
आतां प्रेमळ श्रोतेजन । संकोचरहित एकाग्र मन । परिसोत या कलिमलदहन । कथा पावन साईंच्या ॥१३॥
जड्ली एकदां अनन्य निष्ठा । कीं त्या भक्ताच्या सकळ अनिष्टा । वारूनि अर्पितो तया अभीष्टा । तयाचे कष्टा निवारी ॥१४॥
ये अर्थींची एक वार्ता । दावी ल साईंची भक्तवत्सलता । श्रोतीं परिसतां ती सादरता । आनंद चित्ता होईल ॥१५॥
तरी लावूनियां जीव । कथा ऐका हे अभिनव । पटेल मनास अनुभव । कैसी दयार्णव गुरुमाय ॥१६॥
कथा जरी ही बहु तोकडी । अर्थावबोधें अति चोखडी । अवधान दीजे एक घडी । सरतील सांकडीं बाजूला ॥१७॥
सहमदनगरचे सुखवस्त । कासार एक धनवंत । दामूअण्णा नामें भक्त । पदीं जे अनुरक्त साईंच्या ॥१८॥
तया परम भक्ताची कथा । आनंद होइल श्रवण करितां । भक्तरक्षणतत्परता । दिसेल प्रत्यक्षता साईंची ॥१९॥
रामनवमी - वार्षिकोत्सवीं । मोठीं दोन निशाणें नवीं । निघती मिरवीत शिर्डी गांवीं । आहेत ठावीं तत्रस्थां ॥२०॥
त्यांतील एक निमोणकरांचें । दुसरें या दामूअण्णांचें । नेम हे त्यांचे कैक वर्षांचे । भक्तिप्रेमाचे अव्याहत ॥२१॥
दोन स्त्रिया दामूअण्णांस । पुत्रसंतति नव्हती त्यांस । लाधूनि साईंच्या आशीर्वादास । पुत्ररत्नास पावले ॥२२॥
केला निशाणाचा नवस । रामनवमीच्या उत्सवास । आरंभ झाला मिरवणुकीस । निशाण वर्षास तेथून ॥२३॥
कोंडया सुताराच्या घरीं । होते मिरवणुकीची तयारी । तेथूनि मग वाद्यांचे गजरीं । निशाण मिरवीत नेतात ॥२४॥
मशिदीचिया दोनी टोंकां । बांधिती तैं दीर्घ पताका । समारंभेंसी महोत्सव निका । करिती विलोका प्रतिवर्षीं ॥२५॥
तैसेंच तेथें जे फकीर येती । तयांस यथेष्ट जेवॄं घालिती । रामनवमी ऐसिये रीती । प्रतिपाळिती हे शेट ॥२६॥
त्या या दामूअण्णांची कथा । श्रवणार्थियां निवेदितों आतां । श्रवण करितां सावधानता । साईसमर्थता प्रकटेल ॥२७॥
मुंबानगरीचा तयांची स्नेही । मुंबईहूनि पत्र लिही । दो लाख निव्वल नफा होई । ऐसी किफाईत करूं कीं ॥२८॥
तुम्हां आम्हां भागी देख । कमावूं प्रत्येकीं लाख लाक । उत्तर धाडा करा चलाख । धंदाही चोख निर्भय कीं ॥२९॥
खरेदूं कापूस ये वक्तीं । भाव चढेल हातोहातीं । सौदा न साधिती वेळेवरती । मग ते पस्तावती मागाहून ॥३०॥
दवडूं न द्यावी ऐसी वेळ । उडाली अण्णांचे मनाची खळबळ । भरंवसा त्या स्नेह्यावरी सबळ । विचार निश्चळ सुचेना ॥३१॥
धंदा करावा वा न करावा । विचार पडला अण्णांचे जीवा । काय होईल कैसें देवा । गोवा पडला मनाला ॥३२॥
दामूअण्णाही गुरुपुत्र । बाबांस लिहिते झाले पत्र । आम्हां न बुद्धि स्वतंत्र । आपणचि छत्र आमहांतें ॥३३॥
व्यापार हा तों सकृद्दर्शनीं । करावा ऐसें येतें मनीं । परी होईल लाभ कीं हानी । कृपा करोनि सांगा जी ॥३४॥
पत्र लिहिलें माधवरावा । कीं हें बाबांस वाचूनि दावा । आज्ञा होईल तैसें कळवा । उद्यम बरवा वाटतो ॥३५॥
दुसरे दिवशीं तिसरे प्रहरीं । पत्र पडलें माधवरावकरीं । तेणें नेऊनि मशिदीभीतरीं । चरणांवरी घातलें ॥३६॥
“काय शामा काय घाई । कागुद कसला लावितो पायीं” । बाबा तो नगरचा दामूशेट कांहीं । विचारं पाही आपणांतें ॥३७॥
“कां बरें तो काय लिहितो । काय कसले बेत करतो । वाटे आभाळा हात लावितो । देव देतो तें नको ॥३८॥
वाच वाच पत्र त्याचें” । शामा म्हणे जें वदतां वाचे । तेच अर्थाचें पत्र साचें । दामूअण्णांचें अक्षरश: ॥३९॥
देवा, आपण बसतां निश्चळ । उडवितां भक्तांची खळबळ । मग होतां मनाची तळमळ । पायाजवळ आणितां ॥४०॥
कोणास स्वयें ओढून आणितां । कोणालागीं पत्रें लिहवितां । अंत:स्थ आशय आधींच सांगतां । मग वाचवितां किमर्थ ॥४१॥
“अरे शामा वाच वाच । माझे काय मानितो साच । मी तंव आपुला आहें असाच । बोलें उगाच माने तें” ॥४२॥
मग माधवराव पत्र वाचिती । बाबा लक्ष लावूनि ऐकती । कळकळूनि मग बाबा वदती । “चळली मती शेटीची ॥४३॥
सांग कीं तयास प्रत्युत्तरीं । काय उणें तुज असतां घरीं । पुरे आपुली अर्धी भाकरी । लाखाचे भरी पडूं नको” ॥४४॥
प्रत्युत्तराची क्षणक्षणा । वाटचि पाहत दामूअण्णा । उत्तर येतांचि तत्क्षणा । दामूअण्णा वाचिती ॥४५॥
ऐकूनि त्या प्रत्युत्तराला । दामूशेटीचा विरस झाला । मनोरथाचा दुर्गचि ढांसळला । वृक्ष उन्मळला आशेचा ॥४६॥
आतां एक लाख कमावूं । अर्धा लाख व्याजीं लावूं । तात्काळ लाखे सावकार होऊं । आनंदें राहूं नगरांत ॥४७॥
मनोराज्य होतें जें केलें । जागचे जागींच तें विरघळलें । दामूअण्णा अत्यंत हिरमुसले । हें काय केलें बाबांनीं ॥४८॥
पत्र लिहिलें येथेंच फसलें । आपुलें आपण अनहित केलें । देखत देखत वाडिलेलें । ताट लाथाडिलें आपणचि ॥४९॥
असो त्या पत्रांत दामू आण्णांतें । ऐसेंही ध्वनित केलें होतें । कानाडोळ्यांचें अंतर असतें । यावें कीं येथें समक्ष ॥५०॥
ऐसें माधवरावांचें सूचित । समक्ष जावें वाटलें उचित । न जाणों असेल त्यांतही हित । कदाचित अनुमत देतील ॥५१॥
ऐसा विचार करूनि मनीं । अण्णा आले शिर्डीलागूनी । बैसले बाबांचे सन्निधानीं । लोटांगणीं येऊन ॥५२॥
हळू हळू पाय दाबिती । विचारावया नाहीं धृती । अंतर्यामीं उठली वृत्ती । बाबांची पाती ठेवावी ॥५३॥
मनांत म्हणती साईनाथा । कराल जरी या व्यापारा साह्यता । नफ्याचा कांहीं भागमी अर्पिता । पायावरता होईन ॥५४॥
मस्तकीं धरिले साईचरण । दामूअण्णा बैसले क्षण । संकल्प - विकल्प मनाचें लक्षण । व्यापार आंतून चालले ॥५५॥
भक्तीं करावे मनोरथ । ते न जाणती खरा स्वार्थ । गुरु एक जाणे शिष्याचें हित । भावी - भूत - वर्तमान ॥५६॥
निजमनींचें मनोगत । कोणी कितीही ठेवो गुप्त । साई समर्थ सर्वगत । अंतर्वृत्त जाणे तो ॥५७॥
जेव्हां कोणी मनींचें ह्रद्नत । साईचरणीं प्रेमें निवेदित । पूर्ण विश्वासें अनुज्ञा प्रार्थित । दावित सत्पथ साई त्यां ॥५८॥
हें तों तयांचें निजव्रत । जाणती हें भक्त समस्त । जो जो अनन्य शरणागत । आपदा वारीत तयांच्या ॥५९॥
गुरुचि सत्य माता - पिताअ । अनेका जन्मींचा पाता - त्राता । तोचि हरिहर आणि विधाता । कर्ता - करविता तो एक ॥६०॥
बाळ मागतां गोडधडू । माता पाजी बोळकडू । बाळ तडफडू वा रडू । प्रेमनिवाडू हा ऐसा ॥६१॥
बोळाचा तो कडूपणा । योग्य काळें चढणार गुणा । बाळ काय जाणे त्या लक्षणा । मातेच्या खुणा मातेस ॥६२॥
अण्णा जरी ठेविती पाती । बाबा काय तेणें भुलती । लाभेंवीण तयांची प्रीती । निजभक्तहितीं तत्पर ॥६३॥
धन - कनक जयां माती । किंपदार्थ तयांतें पाती । केवळ दीनजनोद्धरणार्थी । जगीं अवतरती हे संत ॥६४॥
यमनियमशमदमसंपन्न । मायामात्सर्यदोषविहीन । केवळ परानुग्रह - प्रयोजन । जयाचें जीवन तो संत ॥६५॥
दामूअण्णांची ही पाती । मनींचे मनींचे मनीं गुप्त होती । बाबा प्रकट उत्तर देती । सादरवृत्तीं परिसावें ॥६६॥
जीवमात्राचें मनोगत । बाबांस सकळ अवगत । वर्तमान - भविष्य - भूत । जैसा करतलग - आमलक ॥६७॥
निजभक्ताची भावी स्थिती । समस्त ठावी बाबांप्रती । कैसे वेळेवर सावध करिती । ती स्पष्टोक्ती परिसावी ॥६८॥
“आपण नाहीं रे बापू किसमें” । बाबा देती सूचना प्रेमें । व्यापार बरवा साईस न गमे । अण्णा शरमे मनांत ॥६९॥
ऐकूनि हें बाबांचें वचन । दामूअण्णांस पटली खूण । दिधला मनाचा संकल्प सोडून । बैसले अधोवदन उगा ॥७०॥
पुनश्च मनीं उठला विचार । करूं काय दुसरा व्यापार । तांदूळ गहूं भुसार । परिसा प्रत्युत्तर बाबांचें ॥७१॥
पांच शेर तूं घेसील । सातशेर ओपिसील । परिसूनि हे बाबांचे बोल । अंतरीं खजील अण्णा तैं ॥७२॥
ऐसें कोठें कांहींही न घडे । जें साईंच्या द्दष्टीस न पडे । खालीं वरती जिकडे तिकडे । सर्वत्र उघडें तयांस ॥७३॥
येरीकडे त्यांचा स्नेही । विचारगहनीं पडला पाहीं । काय करावें सुचेना कांहीं । उत्तरही नाहीं अण्णांचें ॥७४॥
तों ते शेट पत्र लिहीत । वृत्तांत घडलेला कळवीत । वाचूनि स्नेही विस्मित होत । म्हणती कर्मगत विचित्र ॥७५॥
काय सौदा चालूनि आला । स्वयेंच कां ना विचार केला । किमर्थ फकीराचे नादीं लागला । व्यर्थ मुकला लाभाला ॥७६॥
देव देतो कर्म नेतें । होणार्यासारखी बुद्धि होते । ऐसा चोखा धंदा जेथें । फकीर तेथें कां व्हावा ॥७७॥
व्यवहारावर देऊनि पाणी । दारोदार वेडयावाणी । पोट भरिती तुकडे मागुनी । ते काय सांगूनि सांगती ॥७८॥
असो नाहीं तयाचे दैवीं । तेणेंच ऐसी त्या बुद्धि व्हावी । दुसरी कोणी पाती पहावी । यदभावि न तद्भावि तें ॥७९॥
झालें, अण्णा स्वस्थ बैसले । होतें जयांचें कर्म ओढवलें । तेच त्या स्नेह्याचे पातीदार झाले । आलें तपेलें गळ्य़ांत ॥८०॥
करावया गेले सट्टा । परी तयांचा दिवस उलटा । ठोकर लागली झाला तोटा । कैसा सोटा फकीराचा ॥८१॥
काय माझा दामूअण्णा । नशीबाचा, मोठा शहाणा । खरा त्याचा साईदाणा । भक्तकरुणा केवढी ॥८२॥
स्नेही म्हणूनि माझे फंदीं । पडतां नागवता स्वच्छंदीं । तरला बिचारा फकीराचे नादीं । काय द्दढबुद्धि तयाची ॥८३॥
थट्टा त्याचे वेडेपणाची । घमंड माझे शहाणपणाची । व्यर्थ व्यर्थ जहाली साची । अनुभव हाचि लाधलों ॥८४॥
उगीच त्या फकीराची निंदा । न करितां लागतों त्याचे नादा । मजलाही तो वेळेवर जागा । करिता न दगा होता हा ॥८५॥
आतां आणीक एक वार्ता । सांगूनि आवरूं अण्णाच्या ग्रंथा । आनंद होईल श्रोतियां चित्ता । वाटेल आश्चर्यता बाबांची ॥८६॥
पहा एकदां ऐसें वर्तलें । गोव्याहूनि पार्सल आलें । आंबे नामांकित कोणी धाडिले । मामलेदार राळे या नांवें ॥८७॥
माधवरावांच्या नांवावर । बाबांच्या पायीं व्हावें सादर । म्हणूनि कोपरगांवीं स्वीकार । होऊनि शिरडीवर तें आलें ॥८८॥
मशिदींत बाबांसमोर । उघडतां आंबे निघाले सुंदर । होते एकंदर तीनशेंवर । फळें तीं मधुर घमघमित ॥८९॥
बाबांनीं तीं अवघीं पाहिलीं । माधवरावांपाशीं दिधलीं । तयांनीं चार कोळंब्यांत टाकिलीं । उरलीं तीं नेलीं बरोबर ॥९०॥
फळें पडतां कोळंब्यांत । बाबा मुखें काय उद्नारत । “फळें तीं दामुअण्णाप्रीत्यर्थ । असूं दे तेथ पडलेलीं” ॥९१॥
यावर जातां दोन तास । आले पूजा करावयास । दामूअण्णा मशिदीस । पुष्पसंभारास घेऊनी ॥९२॥
तयां न पूर्ववृत्त तें कळलें । बाबा मोठयानें बोलूं लागले । आंबे दाम्याचे न ते आपुले । खावया टपले लोक जरी ॥९३॥
ज्याचे आंबे त्यानेंच घ्यावे । किमर्थ आपणां कोणाचे व्हावे । ज्याचे असतील त्यानेंचि खावे । मरूनि जावें खावोनी” ॥९४॥
प्रसादचि हा ऐसिया भावें । अण्णा स्वीकारिती स्वभावें । विपरीतार्थालागीं न भ्यावें । पूर्ण हें ठावें अण्णास ॥९५॥
पूजा सारोनि अण्णा गेले । पुनश्च येऊनि पुसूं लागले । मोठीस कीं धाकटीस हीं फळें । अर्पूं न कळे कोणास ॥९६॥
बाबा वदती धाकटीला । दे आठ मुलें होतील तिजला । चार मुलगे चार मुलींला । ही आमलीला प्रसवेल ॥९७॥
पोटीं नाहीं पुत्रसंतान । म्हणूनि करावे बहु प्रयत्न । साधुसंतांचें करावें भजन । कृपाशीर्वचन मिळवावें ॥९८॥
यदर्थ साधुसंतांचा नाद । मिळवावया ग्रहप्रसाद । ज्योतिर्विद्येचा लागला छंद । जाहले ज्योतिर्विद स्वयमेव ॥९९॥
नशिबीं नाहीं संतान । हेंचि ज्योतिर्विद्येचें निदान । अण्णा होते पूर्ण जाणून । निराश होऊन बसलेले ॥१००॥
तथापि हें आश्वासन । साईसंतमुखींचें वचन । पुनश्च आशा झाली उत्पन्न । समर्थ प्रसन्न होतांचि ॥१०१॥
असो पुढें कालांतरें । सफल झालीं बाबांचीं अक्षरें । संतप्रसादाम्रांकुरें । संतति - फलभरें प्रसवलीं ॥१०२॥
जैसे बोलले तैसेंच घडलें । आपुलें ज्योतिष निष्फल झालें । साईंचे बोल अमोघ ठरले । जाहलीं मुलें वचनोक्त ॥१०३॥
असो ही तों बाबांची वैखरी । बाबा असतां देहधारी । परी पुढेंही देहत्यागानंतरी । स्वयें निर्धारी निजमहिमा ॥१०४॥
“झालों जरी गतप्राण । वाक्य माझें माना प्रमाण । माझीं हाडें तुर्वतीमधून । देतील आश्वासन तुम्हांस ॥१०५॥
मी काय पण माझी तुर्वत । राहील तुम्हांसवें बोलत । जो तीस अनन्य शरणागत । राहील डोलत तयासवें ॥१०६॥
डोळ्याआड होईन ही चिंता । करूं नका तुम्ही मजकरितां । माझीं हाडें ऐकाल बोलतां । हितगुज करितां तुम्हांसवें ॥१०७॥
मात्र माझें करा स्मरण । विश्वासयुक्त अंत:करण । ठेवा करा निष्कामभजन । कृतकल्याण पावाल” ॥१०८॥
हे भक्तकामकल्पतरो । समर्थ साई श्रीसद्नुरो । हेमाड तुझिया चरणा न अंतरो । भाकी परोपरी हे करुणा ॥१०९॥
धांव पाव गा गुरुवरा । भक्तजनकरुणाकरा । उसंत नाहीं या संसारा । येरझारा पुरे आतां ॥११०॥
आम्हां स्वभावप्रवृत्तिपरां । बाम्हाविषयालोचनतत्परां । विषयभोगांपासाव आवरा । वृत्तीसी करा अंतर्मुख ॥१११॥
लाटेसरसे सैरा वाहत । चाललों आम्ही भवसागरांत । देऊनियां प्रसंगीं हात । भवनिर्मुक्त करा कीं ॥११२॥
इंद्रियें वाहती सैरावैरा । प्रवृत्त होती दुराचारा । बांधा उच्छृंखल नदीस बंधारा । फिरवा माघारा इंद्रियगण ॥११३॥
इंद्रियें न जों अंतर्मुख । आत्मा न कदा होई सन्मुख । त्यावीण कैंचें आत्यंतिक सुख । जन्म निरर्थक होईल ॥११४॥
कलत्र - पुत्र - मित्रपंक्ति । कोणीही कामा येती न अंतीं । तूंचि एक अखेरचा साथी । सुख - निर्मुक्तिदायक तूं ॥११५॥
उकलूनि कर्माकर्मांचें जाळें । करीं एकवेळ दु:खावेगळें । उद्धरीं हे दीनदुबळे । कृपाबळें महाराजा ॥११६॥
वादाबादी इतर अवकळा । कृपाबळें समूळ निर्दळा । रसनेस लागो नामाचा चाळा । सुनिर्मळा साईराया ॥११७॥
ऐसें देईं प्रेम मना । घालवीं संकल्पविकल्यांना । विसरवीं देहगेहभाना । माझा मीपणाही दवडीं ॥११८॥
घडो तुझें नामस्मरण । व्हावी न इतर आठवण । यावें मनासी निश्चलपण । चंचलपण नातळो ॥११९॥
त्वां आम्हां धरितां पोटाशीं । मावळेल अज्ञानतमनिशी । सुखें नांदूं तुझिया प्रकाशीं । उणें आम्हांसी कायसें ॥१२०॥
तुवां हें जें आम्हांप्रत । पाजिलें निजचरितामृत । थापटोनि जें केलें जागृत । हें काय सुकृत सामान्य ॥१२१॥
पुढील अध्याय याहूनि गोड । पुरेल श्रवणार्थियांचें कोड । वाढेल साईचरणीं आवड । श्रद्धाही सुद्दढ केलें ॥१२३॥
तैसेच एक दुसरे गृहस्थ । श्रीमंत परी विपद्ग्रस्त । आले पुत्रकलत्रसहित । दर्शनार्थ साईंच्या ॥१२४॥
कैसा तयांचा पुरविला हेत । कैसा पुत्र अपस्मारव्यथित । केला दर्शनें व्याधिनिर्मुक्त । पूर्वदष्टांत स्मरवुनी ॥१२५॥
म्हणोनि हेमाड साईंस शरण । करी श्रोतयां आदरें विनवण । होऊनि साईकथाप्रवण । करा जी श्रवणसार्थक्य ॥१२६॥
सस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । भक्ताभीष्टसंपादनं नाम पंचतुर्विंशतितमोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥