Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजमाता जिजाऊ जयंती 2022: मातृशक्ती जिजाऊ- आदर्श माता

राजमाता जिजाऊ जयंती 2022: मातृशक्ती जिजाऊ- आदर्श माता
, शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (08:42 IST)
माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील महेकर तालुक्यातील शिंधखेड गावातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात12
जानेवारी 1598 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांना चार मोठे भाऊ होते. माहेरी त्यांनी त्यांनी राजनीती, युद्धकलेत प्रावीण्य मिळवले. याचा उपयोग पुढे शिवरायांना शिक्षण देण्यासाठी कामास आला.
 
प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम करणारे शहाजीराजे यांची पत्नी जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. 1630 मध्ये शिवाजींना जन्माला घातले. जिजाबाईंचे पाच पुत्र मृत्युमुखी पडले होते. शेवटी एकटे शिवाजी जगले आणि त्यांनी त्या पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार केले. त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे.
पुण्याची जहागीर मिळाली, तेव्हा राजे अवघे 14 वर्षांचे होते. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तेव्हा पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्यासोबत पुणे शहराचा पुनर्विकास केला. शिवाजीराजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. राष्ट्र आणि धर्म हे संस्कार करण्यासाठी जिजाऊ त्यांना महाभारत आणि रामायण यांतील कथा सांगत असे. न्यायनिवाडा करण्याचे धडे महाराजांना मातेकडून प्राप्त झाले. जिजाबाई शिवाजीमहाराजांच्या आद्यगुरू होत्या.
शिवरायांचे आठ विवाह करण्यामागे देखील विखुरलेल्या मराठा समाजाला एक करणे हाच उद्देश्य होता. महाराज आग्रात कैद होते तेव्हा देखील स्वराज्याची सूत्रे जिजाऊमातेंच्या हाती होती.
 
शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच वर्ष 1674 मध्ये त्यांनी देह ठेवला. अशा जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
 
जिजाऊ खरोखर आदर्श माता आहे. आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचा सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं. स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Garuda Purana: हे 10 नरक मानले जातात खूप त्रासदायक, जाणून घ्या कोणत्या कृतीची कोणती शिक्षा