Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवरायांची युध्दनीती

शिवरायांची युध्दनीती
आपल्या प्रिय भारतमातेच्या अंगावरती चारही बाजूंनी सुलतानी सत्ता थयथया नाचत असताना त्या सर्वाशी टक्कर घेत स्वराज्याचं अनमोल रत्न खेचून आणणारा आणि भविष्यातील ‘पेशावर ते तंजावर’ अशा विशाल हिंदवी साम्राज्याचे बीजारोपण करणारा तेजस्वी महापुरुष म्हणजे छत्रपती शिवराय! महापुरुष तेच जे मोठी स्वप्ने पाहातात. पण नुसती स्वप्ने पाहून भागत नाही; तर ती सत्यात उतरवण्यासाठी साधनांचा विचार करावा लागतो. स्वातंत्र्याचे ध्येय जर मूर्त स्वरूपात यायचे असेल तर शत्रूशी सशस्त्र संग्राम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. परिस्थिती पूर्णपणे प्रतिकूल होती. शत्रू शतपटीने प्रबळ होता. त्याच्याकडे अनुभवी प्रशिक्षित सैन्य होते.
 
सत्ता, संपत्ती, शस्त्रास्त्रे, सैनिक या कशाचीही त्यांना कमतरता नव्हती. अशा वेळी हाती शून्य असताना स्वातंर्त्याचा ध्यास घेणे म्हणजे मृगजळाच्या मागे धावणे ठरले असते. मात्र राजांनी आपल्या प्रभावी युद्धतंत्राने महत्त्वाकांक्षेचे उत्तुंग शिखर सर केले. त्यांनी हे कसे साधले हे जाणण्यासाठी त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास करायला हवा.
 
उत्तम संघटन : त्याकाळी सारेच नामवंत सरदार आपापल्या मुलांसकट कुठल्या तरी बादशहाच्या दरबारात लाचार होण्यात धन्यता मानणारे. मग राजे त्यांचे मन वळवत बसले नाहीत. त्यांनी बारा मावळातली अठरा पगड जातीची मंडळी गोळा केली. पण ते काटक, चपळ, चिवट, जिद्दी, शूर, निष्ठावान आणि जिवाला जीव देणारे होते. शिवरायांनी त्यांच्यातील पराक्रम जागा केला. देशभक्तीचा निखारा फुलवला आणि सामान्यांकडून असामान्य इतिहास घडवून दाखवला. शिवाय ही माणसं राजांच्या तालमीत तयार झालेली असल्याने त्यांच्या मतांचे दडपण राजांवर राहाणार नव्हते. उलट आपल्या राजाला काय आवडतं आणि काय आवडत नाही याचा विचार करून ते कृती करणार होते.
 
भूगोलाचा सुयोग्य वापर : राजांकडे असलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजस्त्र सह्याद्री, इथले उत्तुंग डोंगर, अवघड घाटवाटा, घनदाट जंगले. याचा त्यांनी नेमका उपयोग करून घेतला. अफजलखान प्रकरणात त्यांनी जावळीचे जंगल रणांगण म्हणून निवडले. प्रतापगड आणि महाबळेश्वर या दोन डोंगरांच्या मधे आल्यामुळे खानाच्या सैन्याची अवस्था कात्रीत सापडलेल्या कागदासारखी झाली आणि राजांनी काही तासात त्यांच्या प्रचंड सैन्याचा पूर्ण पराभव केला. असेच दुसरे उदाहरण कारतलब खानाचे. तीस हजार सैन्य घेऊन तो कोकणात उतरला होता. उंबरखिंडीतील  गर्द जंगलात त्याला गाठून राजांनी त्याची जबरदस्त कोंडी केली व पुन्हा माघारी हाकलून दिले. पन्हाळगडातून विशाळगडाकडे जाताना शत्रुसैन्य थोपवण्यासाठी राजांनी घोडखिंडी अरूंद वाटेचा अचूक उपयोग करून घेतला. अशी अनेक उदाहरणे एखादा सेनापती भौगोलिक रचनेचा कसा उपयोग करून घेऊ शकतो याची साक्ष देतात.
 
गनिमी कावा : राजांच्या या नव्या तंत्राने पुढील शंभर वर्षे धुमाकूळ माजवला. या तंत्राची वैशिष्टय़े म्हणजे शत्रूला बेसावध ठेवणे, कमीतकमी सैन्य वापरणे, कमीत कमी वेळात काम पूर्ण करणे, आपल्या धक्का तंत्राने शत्रूच्या मानसिकतेवर आघात करणे, पूर्ण यश मिळवणे किंवा अपयशाची शक्यता वाटल्यास निघून जाणे ही आहेत. शाहिस्तेखानावर केलेला हल्ला हा या गनिमी काव्याच्या तंत्राचा विलक्षण आविष्कार होता. यामध्ये गुप्तता, नियोजन, वेळेचं भान, शत्रूच्या सवयी, सण, मानसिक आणि शारीरिक स्थिती याचा अभ्यास, निर्णयक्षमता, शत्रूला चकवणे, निवडक धाडसी, चतुर व विश्वासू लोकांकडून घडवून आणलेली धडक कारवाई या अनेक गुणांचं दर्शन घडतं. दोराच्या साहाय्याने चढून तानाजीने सिंहगड घेणे किंवा अवघ्या साठ मावळ्यांसह कोंडाजी फजर्ंदने पन्हाळा जिंकणे ही गनिमी काव्याची उत्तम उदाहरणे आहेत.
 
मानसशास्त्रीय तंत्र : शिवरायांनी आपल्या समाजाच्या व शत्रूच्या मनाचा बारकाईने अभ्यास केला होता. उदा. अफजलखानासारख्या गर्विष्ठ सरदारासमोर ‘मी घाबरलो आहे’, असं नाटक करणं आणि त्याला जावळीत येण्याचा चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडणं किंवा अफजल आक्रमणाने आपला समाज घाबरलेला आहे तेव्हा ‘भवानी मातेनं मला दृष्टांन्त दिला आहे,’ अस सांगणं, सिद्दी जौहरचा वेढा सैल पडावा म्हणून ‘मी थोडय़ाच दिवसात शरण येणार आहे’ असा निरोप पाठवणं अशा प्रकारे राजांनी आपल्याला हवी तशी वातावरण निर्मिती केली.
 
दुर्ग जाळे : राजांनी सैन्याप्रमाणे लष्करी ठाणी असलेल्या दुर्गानाही तितकेच महत्त्व दिले. त्यासाठी स्वत:चे असे दुर्गव्यवस्थापन तंत्र विकसित केले. काही किल्ले शत्रूंकडून जिंकले तर काही स्वत: बांधले. जंजिरा किल्ला मिळाला नाही म्हणून अडून न रहाता ‘कुरटं’ बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला. तमिळनाडूत वेल्लोरचा किल्ला मिळत नाही पाहिल्यावर तिथल्या डोंगरावर साजरा आणि गोजरा हे किल्ले बांधले. त्यामुळे जिंकलेल्या भूमीवर वर्चस्व ठेवून दक्षिणेत मराठय़ांचा दरारा निर्माण करता आला.
 
बलवंत आरमार : राजांनी समुद्राचं महत्त्व ओळखून उत्तम नौदल निर्माण केलं. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, उंदेरी हे किल्ले निर्माण केले. सिद्दी, इंग्रज आणि पोतरुगिजांच्या वर्चस्वाला आव्हान दिले. स्वत:ची लढाऊ जहाजे आणि नौका उभ्या केल्या. बसतुर येथे आरमारी मोहीम केली. परकीय व्यापारावर वचक बसवला. म्हणून तर भारतीय आरमाराचे जनक म्हणून राजांचे नाव आदराने घेतले जाते.
 
नवे प्रयोग : राजांनी बांधकामात नवे नवे प्रयोग केले. उदा. तटबंदी गडाच्या माथ्यावर करण्याऐवजी मध्यावर करणे, प्रवेशमार्ग उजवीकडून ठेवणे, गोमुखी दरवाजे, चिलखती बुरूज, दुहेरी तटबंदी, संकटकाळासाठी चोरवाटा, पाण्याची भरपूर टाकी हे पाहायला मिळते. जलदुर्ग बांधताना चुन्याऐवजी शिश्याच्या रसात बांधकाम केले. विजयदुर्ग जवळील समुद्राच्या तळाशी असलेली अर्धा किलोमीटर लांबीची ¨भत त्यांच्याच काळातील असण्याची शक्यता आहे. आरमारात संगमेश्वरी नावाच्या नौका बांधल्या. युद्ध करतानाही त्यांनी प्रत्येकवेळी नवे नवे तंत्र अंमलात आणले. 
 
प्रभावी हेरखाते : राजांचे हेरखाते उत्तम दर्जाचे होते, हे अनेक उदाहरणांवरून सांगता येते. शहाजहान बादशहा आजारी पडल्याची बातमी राजांना मिळाली तेव्हा आता दक्षिणेतील औरंगजेब उत्तरेत जाण्याच्या गडबडीत असणार. मग त्यांचे इकडचे किल्ले घ्यायला हरकत नाही हे राजांनी ओळखले. सुरत ही मोगलांची बाजारपेठ राजांनी दोन वेळा लुटली ती हेरखात्याच्या आधारावर. शाहिस्तेखानावरील त्यांचा हल्ला यशस्वी झाला कारण त्यांना लाल महालातील बातम्या वेळोवळी मिळत होत्या म्हणूनच. 
 
सैन्यावर प्रेम : शिवाजीराजे करारी आणि पराक्रमी सेनापती होते. त्यांची शिस्त कडक होती. चूक झाल्यास ते कोणाचाही मुलाहिजा राखत नसत. मात्र ते सैनिकांवर विलक्षण प्रेमही करत. प्रतापराव गुजरांचं बलिदान राजांच्या मनाला चटका लावून गेलं. म्हणून राजांनी त्यांची मुलगी आपली सून बनवली. बाजीप्रभूंच्या बलिदानानंतर कान्होजीच्या घराला दिलेलं मानाचं पान त्यांनी बाजीप्रभूंच्या घराण्याला दिलं. कान्होजींना सुरक्षिततेसाठी आपला कुटुंबकबिला तळेगावला हलवण्यास सांगितले. या छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून राजे सैनिकांची कशी काळजी घेत होते आणि राजांच्या शब्दासाठी मावळे हसत जान कुर्बान करण्यास तयार असत हे दिसून येते.
 
राजे पराक्रमी होते. स्वराज्य संस्थापक होते. युद्ध हे त्यांचे साधन होते. पण तरी ते युद्धखोर नव्हते. ते राष्ट्रनिर्माते होते. ‘युद्ध’ हे त्यांचे साधन होते साध्य नव्हे. त्यांच्या संघर्षाला मानवीमूल्यांचे अधिष्ठान होते. संतसज्जनांचं रक्षण आणि सद्धर्माची स्थापना करण्यासाठीच त्यांनी हाती तलवार घेऊन दुष्टांचं निर्दालन केले. चौदाव्या वर्षी कामाला सुरुवात करून चव्वेचाळीसाव्या वर्षी स्वत:ला राज्याभिषेक करून घेतला. अमंगलाचा नाश करण्यासाठी शिव आणि शक्ती या दोन्हींचा संगम आवश्यक आहे हा त्यांचा उपदेश आजही सर्व भारतीयांनी आचरणात आणणे आवश्यक आहे.
 
प्रा. मोहन शेटे  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यंदा दोन दिवस गुढीपाडवा