Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवगान....

शिवगान....
MH GovtMH GOVT
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाल

शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलूख सारा
दिशादिशां भेदीत धावल्या खङगाच्या धारा
हे तूफान स्वातंत्र्याचे, ये उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला, घडाचौघडा झडे
शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे
हे रुप शक्ति-युक्तिचे
हा तेजाचा झोत उफाळून, सृष्टितून आला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाल

गंगा सिंधू, यमुना गोदा कलशातून आल्या
शिवरायाला स्नान घालूनी धन्य धन्य झाल्या
धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातूनी उमटला हर्षे जयजयकार

प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज

शिवछत्रपतींचा जय हो, श्रीजगदंबेचा जय हो
ह्या भरतभूमीचा जय हो
जयजयकारातूनी उजळल्या शतकांच्या माला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi