Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव

शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव
MH News
MHNEWS
शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक हुडकून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसर्‍यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला 'दक्षिण कैलास' असे म्हणतात.

सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.

महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात.

शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला. या मंदिराविषयी आणखी एक की, जीजाबाईंना शिवनेरीवर सोडून चिंताक्रांत शहाजीराजे परतत असतांना या मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेव्हा त्यांना दृष्टांत मिळून सारे काही ठीक होईल असे शंकरांनी सांगितले. या गोष्टीची आठवण म्हणून जरी पटक्याबरोबर भगवा झेंडाही लावण्याचे त्यांनी ठरवले.

या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.

या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.

असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही!
(महान्यूज)

Share this Story:

Follow Webdunia marathi