Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रावणी शनिवार: अश्र्वत्थ-मारुती आणि नृसिंह पूजन विधी आणि महत्त्व

श्रावणी शनिवार: अश्र्वत्थ-मारुती आणि नृसिंह पूजन विधी आणि महत्त्व
, शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (09:28 IST)
चातुर्मासातील व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सवांची रेलचेल असलेला महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. 
 
सोमवार हा शिवशंकरांचा वार मानला जात असल्यामुळे श्रावणी सोमवारी केलेले शिवपूजन अधिक शुभ मानले जाते. श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा यांनंतर प्रत्येक श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन आणि नृसिंह पूजन करण्याची परंपरा आहे. 
 
श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे. 
 
यामागील एक कथा देखील आहे-
एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे ह्या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले. त्यांनी धनंजयाला ‘तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत’ असे सांगितले. ते ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरविले. त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी धनंजयांला रोज अश्र्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्र्वत्थाची पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये ‘अश्र्वत्थ सर्ववृक्षाणामू‘  (वृक्षांमध्ये जो अश्र्वत्थ तो मी होय.) असे म्हटले आहे. 
 
श्रावणातीलच नव्हे, तर इतर शनिवारीही सूर्योदयापूर्वी अश्र्वत्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान श्रावणातील शनिवारी तरी ही पूजा आणि प्रदक्षिणा करण्याची प्रथा रूढ झाली. ह्याबरोबरच श्रावणातील कृष्णपक्षात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावास्या ह्या तीन दिवशी पितरांची तहान शमावी ह्या श्रद्धाभावनेने पिंपळाच्या बुंध्याजवळ पाणी घातले जाते.
 
पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करावी. शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुती तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. 
 
आता जाणून घ्या नृसिंह पूजन करण्याबद्दल-
श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर किंवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे. त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे. त्यानंतर साधी हळद, आंबेहळद, चंदन, लाल आणि निळी किंवा पिवळी फुले वाहून त्या नृसिंहाची पूजा करावी. कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी, असा नैवेद्य दाखवावा. प्रल्हादासाठी देवाने नृसिंह अवतार घेतला. त्यावेळी तो खांबातून प्रगटला. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही, वाचा मजेदार कथा