Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nag Panchami 2023 Katha : कहाणी नागीण आणि शेतकऱ्याची

Nag Panchami 2023 Katha : कहाणी नागीण आणि शेतकऱ्याची
, सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (12:09 IST)
आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता, त्याच्या शेतांत एक नागाचं वारूळ होतं.श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणं नांगर घेऊन शेतांत गेला. नांगरतां नांगरतां काय झालं? वारूळांत जीं नागांची नागकुळां होतीं, त्यांना नांगराचा फाळ लागला. आणि ती मरण पावली.
 
कांहीं वेळानं नागीण आली, आपलं वारुळांकडे  पाहूं लागली, तिथं वारूळ नाहीं आणि पिलंही नाहींत.विचार करत ती इकडे तिकडे शोधू  लागली, तेव्हां तिनं रक्तानं माखलेलं नांगर बघितलं. तिने विचार केला, ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझीं पिलं मेलीं. तो रोष मनांत ठेवला. शेतकर्‍याचा निर्वंश करावा असं मनांत आणलं. फोफावतच शेतकर्‍याच्या घरी गेली. मुलांबाळांना, लेकीसुनांना, शेतकर्‍याला व त्याच्या बायकोला दंश केला.ते सर्वजणं मरून पडली.
 
पुढं तिला असं समजलं कीं, ह्यांची एक मुलगी परगांवीं आहे, तिला देखील जाऊन दंशा करावा म्हणून ती निघाली. ज्या गांवी मुलगीं दिली होती त्या ठिकाणी आली, ती त्या मुलीच्या घरी आल्यावर तिने बघितले की  घरीं बाईनं पाटावर नागनागीण, नऊ नागकुळं काढलीं आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. फुटाणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनांत आनंदानं लोळली. इकडे शेतकऱ्याची लेक तिची प्रार्थना आपली डोळे मिटून करत होती. .
 
इतक्यांत नागीण उभी राहिली. तिला म्हणूं लागली, “बाई बाई तूं कोण आहेत? तुझी आईबापं कुठं आहेत?” इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहाते तों प्रत्यक्ष नागीण दृष्टीस पडली. मुलगी घाबरली. नागीण म्हणाली. ” मुली भिऊं नको, घाबरूं नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे.” तिनं आपली सर्व हकीकत सांगितली, ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटलं. ती मनांत म्हणाली, ‘ही आपल्याला इतक्या भक्तीनें पुजते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनांत आणलं  हें चांगलं नाहीं.” तिला फार वाईट वाटलं. नागिणीने तिच्या वडिलांच्या घरी काय घडलं ते सर्व सांगितलं. आपली आई आणि इतर कुटुंबीय जगात नाही हे ऐकून तिला फार दुःख झालं. तिनं नागिणीला आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला.
 
नागिणीने तिला अमृत दिलं, ते घेऊन त्याच पावलीं ती माहेरीं आली. सगळ्या माणसांच्या तोंडांत अमृत घातलं. सगळीं माणसं जिवंत झालीं. सगळ्यांना आनंद झाला.
 
बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हां बापानं विचारलं, ” हें व्रत कसं करावं?” मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटीं सांगितलं कीं, ” इतकं कांहीं झालं नाहीं तर नागपंचमीचे दिवशी जमीन खणूं नये. भाज्या चिरूं नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊं नये. नागोबाला नमस्कार करावा.” असं सांगितलं, तेव्हापासून तो नागपंचमी पाळूं लागला.निदान इतकं तरी पाळावं.
 
ज्या प्रकारे  नागीण तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
 
 
 





Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपंचमी आरती Nag Panchami Aarti