Pola 2024 बैल पोळा 2024 या वर्षी श्रावण अमावस्या 2 रोजी साजरा केला जाणार आहे.
श्रावण महिन्यात सणांची सुरुवात असते. या महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्या साजरा करण्यात येत तर शेतकर्यांचा मोठा सण म्हणजे 'पोळा' देखील श्रावण अमावास्या या दिवशी उत्साहाने साजरा केला जातो.
शेतकरी वर्गात पोळ्याचे फार महत्त्व आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. पोळा या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही. या दिवशी बैलाचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर घेऊन जातात, त्यांना आंघोळ घालतात, त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात तसेच शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली जाते. त्यांच्या गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधले जातात. अशा नाना तर्हेने बैलांना सजविण्यात येते.
शेतकर्याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्यांची वाट पाहत असतात. तर त्यांच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो. मग खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी कुटुंबासह वाजत गाजत जातात त्यांना घरी आणतात. घरातील सवाष्ण बाई बैलांची विधीवत पूजा करते त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य केला जातो. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडले जातात. या रोजी गावातील इतर घरातून ही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केलं जातं. शेतकर्याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते.
राज्यातील अनेक गावांमध्ये या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन केले जातात आणि तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते. तसेच शेतकर्याच्या डोक्यावर फेटा बांधून सन्मान केला जातो. या नंतर गावातून बैलांची मिरवणूक काढली जाते. अशा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्याचा जिव्हाळ्याचा सण पारंपारिक पोळा साजरा केला जातो.
तसेच या दिवशी पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया व्रत करतात. सायंकाळी चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा केली जाते. घरातील मुलांना खीर-पुरीचे जेवण दिलं जातं. आई पुरणपोळी, साटोर्या, खीर, पुरी आणि त्यावर दिवा लावून खांद्यावरून मागे नेत 'अतित कोण?' असा प्रश्न विचारते. मुलं आपली नाव सांगत उत्तर देतात. याला वाण देणे असे म्हणतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे तसचे मुलं-बाळांची रक्षा व्हावी यासाठी पिठोरी अमावस्येला स्त्रिया हे व्रत मनोभावे करतात.