Article Shravan Marathi %e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80 110082000016_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रावणी सोमवार - आरती

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

श्रावणी सोमवार आरती
MHNEWS
श्रावण महिना सर्वत्र विशेष पवित्र मानला जातो. या महिन्यात ठिकठिकाणी अनेकविध धर्मकृत्यांचे आयोजन भक्तिभावपूर्वक केले जाते. महाराष्ट्रात श्रावणी सोमवारचे व्रत श्रध्देने आचरले जाते. शिवशंकराच्या नावाचा जप, शिवकवचाचे पाठ, शिवलीलामृताचे, विशेषत: शिवलीलामृतातील अकराव्या अध्यायाचे वाचन अशा विविध प्रकारांनी श्रावणी सोमवार हा शिवाच्या स्मरण-पूजन-उपासनेचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

आपण समर्थांनी लिहिलेली श्रीशिवशंकराची आणखी एक आरती पाहाणार आहोत.

गौरीवर गंगाधर तनु कर्पुर ऐशी । गजव्याघ्राची चर्मे पांघुरसी ।। कंठी कपाळा माळा भाळी दिव्यशशी । अनिलाशन भूषण हर शोभत कैलासी । जय देव जय देव जय रतिपतिदहना । मंगल आरती करितो छेदी अघविपिना ।।त्रिपुरासुर अतिदुस्तर प्रबळ तो जाला । तृणवत मानित वासव विधि आणि हरिला ।। तेव्हा निर्जर भावे स्मरताती तुजला । होउनी सकृप त्यांवरि मारिसी त्रिपुराला ।। जे तव भक्तिपुरस्सर जप तप स्तव करिती । त्यांते अष्टहि सिद्धीस्वबलानें वरिती ।। शिव शिव या उच्चारें जे प्राणी मरती । चारीमुक्ती येउनि त्यांचा कर धरती ।। वृषभारुढा, मूंढां लावी तव भजना । भवसिंधु दुस्तर तो करी गा सुलभ जनां ।। होवो सुलभ मला तव मायेची रचना । दास म्हणे ताराया दे सकृप वचना ।।

ही आरती थोडीशी प्रौढ भाषेत आहे. हे गौरीपती, गंगाधरा, शंकरा, तू कर्पूरवर्ण शुभ्र धवल असा आहेस. गजचर्म आणि व्याघ्रचर्म तू पांघरले आहेस. तुझ्या भाळावर चंद्रकोर विराजत आहे. तू 'पंचतुंड नरमुंड माळधर' असा आहेस. तुझ्या हातात दाहक अग्नीचे पात्र आहे. शिवाय हलाहलासारखे जहाल विषही तू लीलया भक्षण केले आहेस. रतिपतीचे म्हणजे मदनाचे दहन करणार्‍या शंकरा, आम्ही जे पापाच्या जंगलात सापडलो आहोत ते जंगल तोडून टाक, आमची पापापासून मुक्तता कर. त्रिपुरासुर जेव्हा खूप प्रबल झाला, उन्मत्त झाला तेव्हा तुझे सर्वांनी भक्तिभावाने स्मरण केले आणि तू त्रिपूरासुराचा वध केलास. जे लोक तुझी भक्ती, तुझ्या नावाचा जप, तुझ्यासाठी तप, तसेच तुझी स्तुती करतात त्यांना तू सर्व प्रकारची सुखसमृद्धी आणि सिद्धी देतोस. अंतकाळी कोणी तुझे नाव घेतले, तर त्याला साक्षात् मुक्तीच मोक्षपदाला घेऊन जाते. हे नंदीबैलावर बसणार्‍या शिवशंकरा, ज्यांना स्वहित कळत नाही त्यांच्या ठिकाणी तुझ्या भजनाची गोडी निर्माण कर. हा संसार-सागर मोठा दुस्तर आहे ही गोष्ट खरीच, पण तो तुझ्या कृपेने त्यांना सुकर होऊ दे. हे विश्व म्हणजे तुझी मायाच आहे. जे दिसते तो सर्व भ्रम आहे, असत्य आहे. हे शिवशंकरा, तू माझी त्यापासून मुक्तता कर आणि मला सत्याचा मार्ग दाखव. मदनाचे दहन करणार्‍या शिवशंकरा, पापांच्या निबिड जंगलात सापडलेल्या माझी सुटका करण्यासाठी त्या जंगलाचे छेदन कर. ते जंगल तोडून टाक.

Share this Story:

Follow Webdunia marathi