साहित्य - २ वाटय़ा चिरलेले केळफूल, २ बटाटे, २ कांदे लसूण, १ इंच आले, ७,८ मिरच्या, २ टोमॅटो, ४ स्लाईस ब्रेड, २ चमचे मटणाचा मसाला, अर्धी वाटी रवा, १ इंच दालचिनी, ४,५ लवंगा.
कृती - केळफूल बारीक चिरुन घ्यावे व पाण्यात टाकावे म्हणजे सर्व राप (काळे पाणी) निघून जाईल. कांदा बारीक चिरुन घ्यावा. बटाटे उकडून साले काढून कुस्करुन घ्यावे. लसूण, आले, मिरच्या बारीक वाटून घ्यावे व ते केळफुलाला लावून ठेवावे.
२ चमचे डालडामध्ये कांदा फोडणीला टाकावा. चांगला गुलाबीसर झाल्यावर त्यावर चिरलेले केळफूल टाकावे. टोमॅटो चिरुन टाकावे. मंद आचेवर चांगले शिजल्यावर त्यावर मटणाचा मसाला, मीठ टाकून अगदी सुके होईपर्यंत शिजवून घ्यावे.
गार झाल्यावर त्यात कुस्करलेला बटाटा, ब्रेडचे स्लाईस (पाण्यात भिजवून पिळून काढावे) घालून चांगले मळून घ्यावे. लहान लहान गोळे करुन हाताने जरा चपटे करुन रव्यावर घोळवावे आणि तव्यावर तेल टाकून मंद आचेवर तळून काढावे.