बिलियर्डस् या खेळात गीत सेठी आणि पंकज अडवाणी यांचे नाव सर्वपरिचीत झाले आहे. क्रिकेटमध्ये भारतात आणि जागतिक पातळीवर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांना जे स्थान हे तेच स्थान बिलियर्डस् गीत सेठी आणि पंकज अडवाणी यांना आहे. जागतिक व्यावसायिक बिलियर्डस् स्पर्धेचे विजेतेपद पटकवून पंकजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बिलियर्डस् 139 वर्षांचा इतिहासात हा पराक्रम करणारा तो दुसराच भारतीय खेळाडू आहे. यावरुन या विजेतेपदाचे महत्व स्पष्ट होते. वयाच्या 24 व्या वर्षी अनेक पुरस्कार, सन्मान त्याला मिळाले आहेत.
पंकजचे लहानपण भारतात आणि कुवेतमध्ये गेले. त्याचे आई, वडील कुवेतला स्थायिक झाले होते. परंतु पंकजला भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी त्याची आई डिलेव्हरीसाठी पुण्यात आली. 24 जुलै 1985 रोजी पंकजचा पुण्यात जन्म झाला. जन्मानंतरचे पाच वर्ष पंकजने कुवेतमध्ये घालवली. जून 1990 साली पंकजचे आई, वडील सुट्या घालविण्यासाठी अमेरिकेत गेले होते. त्यावेळी कुवेत आणि इराक युद्धाची ठिणगी पेटली. यामुळे पंकजच्या आई, वडिलांनी कुवेतमध्ये परत न जाण्याचा निर्णय घेतला.पंकजचे आई, वडील भारतात आले. बंगळुरुमध्ये पंकजच्या आत्या राहत होत्या. त्यामुळे त्यांनी बंगळुरुमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. बंगळुरमधील दिवस मजेत चालले असताना अचानक पंकजचा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 1992 साली त्याच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले. त्यावेळी पंकज सहा वर्षांचा तर मोठा भाऊ श्री हा 14 वर्षांचा होता. त्यानंतर पंकजची आई काजल हिने कुटुंबाची जबाबदारी घेतली. पंकज दहा वर्षांचा असताना त्याने स्नूकर खेळण्यास प्रारंभ केला. सुरवातीला भाऊ श्री बरोबर जावून तो स्नूकरचे निरीक्षण करु लागला. हळूहळू या खेळातले बारकावे त्याच्या लक्षात आले. त्याला स्वत:बद्दल आत्मविश्वास वाटू लागल्यावर प्रत्यक्ष खेळण्यास त्याने सुरवात केली. त्याने जेव्हा शॉट मारणे सुरु केले तेव्हा सर्वच जण स्तब्ध झाले. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याच्या खेळातील प्रगती पाहून कर्नाटक स्नूकर आणि बिलियडर्स असोसिएशनने त्याला अल्प शुल्कात सदस्यत्व बहाल केले. मग सुट्यांमध्ये दिवसातील दहा, दहा तास तो क्लबमध्ये सरावासाठी घालवू लागला. त्याचे जेवण, नास्ता, चहा सर्व काही क्लबमध्येच होवू लागले. पंकज बारा वर्षांचा असताना बी.एस.समपथ स्पर्धेत विजेतेपद पटकविले. त्याच्या आयुष्यातील ते पहिले विजेतेपद होते. स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याने आपला मोठा भाऊ श्री याचा पराभव केला. त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर अनेक नवीन विक्रम त्याने प्रस्थापित केले. त्याच वर्षी टी.ए.सेलवराज मेमोरियल बिलियडर्स चॅम्पियनशीप, कर्नाटक राज्य कनिष्ठ चॅम्पियनशीपमध्ये विजेतेपद त्याला मिळाले. वयाच्या पंधराव्या वर्षी कनिष्ठ गटातील राष्ट्रीय विजेतेपद त्याने पटकविले. एक, दोन नव्हे तर तब्बल सात वेळा तो राष्ट्रीय विजेता राहिला आहे. सन 2003 पासून सलग चार वर्ष त्याने भारतीय स्नूकर चॅम्पियनशीपमध्ये विजेतेपद मिळविले आहे. 19 वर्षांचा असताना वरिष्ठ गटातील विजेतेपद पटकवून सर्वात कमी वयाचा राष्ट्रीय विजेता होण्याचा मान मिळविला. देशपातळीवर अनेक स्पर्धा गाजविल्यानंतर पंकजने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या खेळाची चुणूक दाखवण्यास सुरवात केली. सन 2003 मध्ये जागतिक स्नूकर चॅम्पियनशीपमध्ये विजेतेपद त्याने पटकविले. सन 2005 हे वर्ष पंकजसाठी खूप यशदायी ठरले. या वर्षी सहा विजेतेपद त्याला मिळाले. जागतिक बिलियडर्स चॅम्पियनशीपमध्ये पाईंट आणि टाईममध्ये त्याने विजेतेपद मिळविले. दोन्ही प्रकारात विजेतेपद मिळविणारा तो पहिलाच खेळाडू आहे. तसेच यावर्षी अशियाई स्नूकर चॅम्पियनशीप आणि राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने विजेतेपद पटकविले. दोहा आशियाई गेममध्ये सन 2006 मध्ये सुवर्णपदक त्याला मिळाले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन बिलियडर्स स्पर्धा जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. सन 2009 मध्ये जागतिक व्यावसायिक बिलियर्डस् स्पर्धेचे जागतिक पटकवून त्याने या क्षेत्रातील सर्वच पुरस्कारांवर आपले नाव कोरले. त्याच्या क्रीडा क्षेत्रीतील कामगिरीमुळे देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सन 2006 देवून गौरविण्यात आले आहे. तसेच अर्जुन पुरस्कारासह देशपातळीवरील अनेक क्रीडा पुरस्कार त्याला मिळाले आहे. भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देवूनही त्याचा गौरव केला आहे.