Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॉकी संघाने लाज काढली!

हॉकी संघाने लाज काढली!

अभिनय कुलकर्णी

यशाला सीमा असते, अधःपाताला मात्र सीमा नसते, हे भारतीय हॉकी संघाने दाखवून दिले आहे. ऑलिंपिक पात्रता फेरीच्या सामन्यात बाद होऊन भारतीय हॉकी संघाने देशाची लाज काढली आहे. नामुष्की हा शब्दही इथे थिटा पडतो. कारण हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, हे कोणत्या तोंडाने सांगणार? आठ ऑलिंपिक विजेतीपदे मिळविलेल्या भारताच्या कोणत्याही संघाने गेल्या ८० वर्षात पात्रता फेरीत बाद होण्याची दुर्देवी वेळ आणली नव्हती. या संघाने तो 'पराक्रम'ही करून दाखवला.

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. साठीच्या दशकापर्यंत हे निर्विवाद सिद्ध करणारी अशीच भारतीय हॉकी संघाची कामगिरी होती. १९२८ ते ५६ हा तर हॉकीतील भारतीयांच्या दादागिरीचा काळ होता. या काळात भारताने रांगेत सहा ऑलिंपिक विजेतीपदे पटकावली होती. त्यानंतर स्थिती खालावली तरी अगदीच काही गयेगुजरे असे स्थान नव्हते. नंतरच्या काळात संघाने आणखी दोन ऑलिंपिक विजेतीपदे पटकावली होती. ऑलिंपिकमध्ये आठ अजिंक्यपदे, एकदा रौप्यपदक, दोनदा ब्रॉंझ, वर्ल्ड कपमध्ये एकदा विजेतेपद, एकदा रौप्य व ब्रॉंझ, आशियाई खेळात दोनदा सुवर्णपदक, नऊवेळा रौप्य आणि एकदा ब्रॉंझ आणि आशिया करंडकात दोनदा सुवर्ण, चारदा रौप्य आणि एकदा ब्रॉंझ अशी भारतीयांची आतापर्यंतची कामगिरी आहे.

पण गेल्या काही वर्षांपासून हॉकीत भारतीयांची जी घसरण सुरू होती, त्याचा आज तळ गाठला असे म्हणता येईल. कारण १९८० नंतर भारताने ऑलिंपिकमध्ये एकही सुवर्णपदक पटकावले नाही. वर्ल्ड कपमध्येही १९७५ नंतर कधीच सुवर्णपदक मिळाले नाही. २००६ मध्ये तर भारताचे स्थान अकरावे होते. चॅंपियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारताला कधीच मिळालेले नाही. आशियाई खेळात १९६६ आणि ९८ मध्ये मिळालेले विजेतेपद सोडले तर बाकी आनंद आहे. ०६ मध्ये तर भारताचे स्थान सहावे होते. आशिया करंडकात तेवढी गेल्या काही वर्षात भारताची कामगिरी बरी आहे. गेल्या वर्षी दक्षिण कोरीयाला हरवून भारताला अजिंक्यपद मिळाले होते. चॅंपियन्स चॅलेंज स्पर्धेतही मग अपयशाचीच री ओढलेली आहे.

हॉकीतील राजकारणही या सार्‍याला कारणीभूत आहे. आयपीएस गिल यांचा एककल्ली कारभार, कोच नावाचे बाहुले सतत बदलायचे, निवड समितीची मनमानी, चांगले खेळणार्‍या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविणे या 'राजकारणी' चाली हॉकीत गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. गिल यांचे अजब फतवे तर खेळाडूंचे मनौधैर्य खच्ची करणारे ठरले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी एक फतवा काढला होता, गोल केल्यास बक्षिस आणि आपल्यावर गोल झाल्यास खेळाडूंचे पैसे कापून घेणार. अशा परिस्थितीत खेळणार्‍या खेळाडूंची अवस्था ती काय होणार?

एवढे होऊनही गिल खुर्ची सोडायला तयार नाही. प्रशिक्षक कार्व्होलो यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांनाही जबाबदारी झटकता येणार नाही. मुख्य म्हणजे गिल यांच्या एकाधिकारशाहीविरोधात आता, वरिष्ठ खेळाडूंनीही आवाज उठवला आहे. गिल यांच्या एककल्ली कारभाराचा फटका बसलेला ज्येष्ठ खेळाडू धनराज पिल्ले याने संपूर्ण हॉकी व्यवस्थाच बदलायला हवी अशी प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या निराशाजनक कामगिरीने धनराज रात्री झोपलादेखिल नव्हता. हॉकीसंदर्भात एवढी कळकळ असणारे खेळाडू बाहेर आहेत आणि खुर्च्या उबवण्यात व अधिकार गाजविण्यात रस असणारे गिल यांच्यासारखे लोक मात्र हॉकी संघटनेत आहेत, हे चित्र अतिशय दुर्देवी आहे. ए. बी. सुभाष, के. ज्योतिकुमारन या ज्येष्ठ खेळाडूंनीही गिल यांच्याविरोधात आवाज उठवला आहे.

आता या यासंदर्भात कठोर पावले उचलायला हवी. हॉकी फेडरेशनची खुर्ची उबवत बसलेल्या पदाधिकार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवून खरोखरच हॉकीतील ज्यांना काही कळते, असेच लोक आणायला पाहिजे. प्रशिक्षकाचा संगीत खुर्चीचा खेळ थांबवून चांगला प्रशिक्षक नेमला पाहिजे व त्याला पुरेसे स्वातंत्र्य द्यायला हवे. खेळाडूंनाही स्थैर्य देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. तरच भारताच्या संघाचे हॉकीत पुनरूज्जीवन होऊ शकेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi