भारतीय क्रिकेटच्या इतिहासात रविवार दि. 6 जानेवारी 2008 हा दिवस काळ्या अक्षराने लिहिला जाईल. कारण, यादिवशी सिडनीत भारतीय क्रिकेटच्या संदर्भात जे काही घडले आणि त्यानंतर सोमवारी देशातील क्रिकेटप्रेमी व माध्यमांत उमटलेल्या प्रतिक्रिया ऐकून म्हणावेसे वाटते की.... इंझमाम तुला सलाम!! हे वाचून आश्चर्य वाटले असेल. पण जर 20 ऑगस्ट 2007 चा दिवस आठवून पाहा. ओव्हलच्या मैदानावर इंग्लंडविरूद्ध पाकिस्तान यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंझमाम-उल-हकने आपला संघ मैदानावर उतरविण्यास नकार दिला. कारण होते पंच डॅरेल हेअरने त्याच्या संघावर चेंडू कुरतडल्याचा ठेवलेला आरोप. त्याविरूद्ध इंझमामने उठविलेला आवाज अगदी योग्य व रीतसर होता.
क्रिकेटच्या मैदानावर अगदी सूक्ष्म हालचाली टिपणारे कॅमेरे असतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान असूनही चेंडू कुरतडल्याचा एकही पुरावा मिळाला नाही. तरीही पंच डॅरेल हेअर यांनी पाक संघाला दोषी ठरविले होते. त्याचे कारण मात्र अजूनही समजू शकले नाही. त्यानंतरच्या घडामोडीनंतर तो कसोटी सामना रद्द करावा लागला होता. विशेष म्हणजे, तेव्हा पाकिस्तान सामना जिंकण्याच्या स्थितीत होते. मात्र, इंझमामला त्याक्षणी आपला संघ व देशाभिमान महत्त्वाचा वाटला... आणि म्हणूनच इंझमामच्या या स्वाभिमानाला सलाम करावासा वाटतो.
शंभर कोटीची जनता असलेल्या या देशात क्रिकेटला धर्मासारखे महत्त्व दिले जाते. विविध जाती-धर्मातील लोक ऊठता-बसता क्रिकेटच्या गप्पा मारतात. अशा लोकांच्या क्रिकेट प्रेमाने क्रिकेटला कार्पोरेट बनविले आहे. तरीही येथील क्रिकेट मंडळ केवळ पत्रांद्वारे प्रश्नोत्तरांचा खेळ खेळत आहे. सध्या ऑस्ट्रेलियात असलेले खेळाडू व अधिकारी मैदानावर विरोध किंवा देशाप्रती स्वाभिमान व्यक्त न करता भारतातून येणार्या निर्णयाची वाट पहात बसले आहेत. या सर्वांना सामना रद्द झाला तर प्रायोजकांकडून मिळणारे कोट्यावधी रूपयांचे उत्पन्न व मॅच फी बुडण्याची भीती वाटत असावी बहुतेक.
हरभजनसिंगवरील अन्याय सहन करणे म्हणजे वर्णद्वेषाचा लांच्छनास्पद आरोप कायमस्वरूपी भाळी बाळगण्यासारखे आहे. याच भारतीयांनी खेळाडूंना व भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) कोटीत-अब्जांत खेळायची संधी दिली. आपण या आरोपांचा विरोध केला नाही तर भज्जीवर लावलेले आरोप खरे असल्याचे समजले जाईल. महत्त्वाचे म्हणजे, ज्या देशात सर्वधर्मसमभावाची भावना आहे आणि विविध जाती-धर्मातील खेळाडू संघात एकत्र खेळतात, त्या संघासाठी ही सर्वांत दु:खाची बाब असेल. ज्याने आरोप ठेवला आहे त्याची अवस्था, 'सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को' अशी आहे.
ज्या देशाला वर्णभेद व जातीच्या आधारे भेदभाव करण्याचा मोठा इतिहास आहे, त्या देशातील सर्वजण मिळून एका भारतीय खेळाडूवर खोटा आरोप ठेवत आहेत. यापेक्षा दुसरे काहीही हास्यास्पद असू शकत नाही. पण हे कळत नाही, की बीसीसीआय याप्रकरणी कठोर भूमिका का घेत नाहीये. ज्या लोकांना चेंडू व बॅट हातात नीट धरता येत नाही ते लोक आज बीसीसीआयचे उच्चपदस्थ अधिकारी आहेत. क्रिकेट क्षेत्रातील उच्च पदावर बसून हे लोक आपले राजकीय हितसंबंध जोपासून देशातील सर्वाच्च पदावर जाण्याचे स्वप्न पाहत आहे्त. हे सर्व पाहून मनात काही प्रश्न निर्माण होतात.
बीसीसीआयसाठी पहिल्यांदा आपले कार्पोरेट हित आहे की देशाभिमान? हे सर्व लोक क्रिकेट अधिक समजतात की राजकारण?
भारतीय क्रिकेटसंदर्भात निर्णय घेण्याचा नैतिक अधिकार यांना आहे का? त्यामुळेच आता इंडियन क्रिकेट लीग स्थापन झाली ते योग्य असे वाटू लागले आहे. त्यांनी उठविलेला प्रश्नही योग्य वाटतो, तो म्हणजे बीसीसीआयला भारतीय संघाची निवड करण्याचा काहीही अधिकार नाही. कारण ती एक स्वतंत्र सस्था आहे.
खरे म्हणजे, ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत झालेला मानहानीकारक पराभव अजूनही ऑस्ट्रेलिया विसरू शकला नाही. त्या दु:खावर नवनवीन उपाय शोधून मलम लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत. हरभजनसिंगकडून सलग तीन वेळा बाद झाल्यानंतर रिकी पॉंटींगने हरभजनला मैदानाबाहेर बसविण्याचा कट रचला.
आज भारताला स्वत:च्या शक्तीचा अंदाज नाही. संपूर्ण जगात क्रिक्रेटला पुढे घेऊन जाण्याचे काम भारताने केले आहे. कोणताही देश भारताच्या हिताकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मग आता पाहूया बीसीसीआय आपल्या हितांचे संरक्षण करते की देशहित जोपासते.