इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने तिसरा सामना ज्या जिद्दीने जिंकला तो पाहता टीम इंडिया आता नेटवेस्ट मालिका आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाली आहे, याचे प्रत्यंतर मिळते. इंग्लंडचे कडवे आव्हान आणि संघातील खेळाडूंच्या मागील पानांवरून पुढे सुरू असलेल्या चुका पाहता हा संघ या सामन्यात हरणार असेच वाटत होते. पण ज्या जिद्दीने आणि सकारात्मक मानसिकतेने भारतीय खेळाडूंनी खेळ केला त्याला सलामच ठोकावासा वाटतोय. नव्याजुन्या खेळाडूंचा योग्य ताळमेळ हाही भारताच्या विजयासाठी पुरक ठरला. त्यामुळे शनिवारी होणार्या नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने चक दे इंडिया करावे हीच अपेक्षा.
खूप दिवसांनी सचिन तेंडूलकर आणि सौरभ गांगुली ही भारताची सलामीची जोडी छान खेळली. विजयाची पायाभरणी या जोडीनेच केली. त्यामुळे जुने दिवस आठवले. त्यानंतर संघातली तरूण तुर्कांनीही त्यांच्यावरची जबाबदारी योग्य रितीने पार पाडली. रॉबिन उत्थप्पाने भारताच्या विजयाची नौका खर्या अर्थाने पार लावली. भारताला विजयी करण्याचा आत्मविश्वास त्याच्या हालचालींमध्येही जाणवत होता. त्यामुळेच एकीकडे विकेट पडत असतानाही तो अविचल राहिला. स्ट्राईक आपल्याकडेच ठेवत त्याने चेंडू आणि धावांतील अंतर कमी करत आणले आणि विजयी फटकाही मारला.
या विजयाचा आनंद युवराजसिंगला सर्वाधिक झाला असावा. मस्करहान्सकडून सलग पाच षटकार खाल्ल्लानंतर आणि पुन्हा त्याच्याच गोलंदाजीवर त्याच्याचकडे झेल दिल्यानंतर युवराजला तोंड दाखवायलाही जागा उरली नव्हती. पण भारत विजयी झाल्यानंतर मात्र त्याच्या जीवात जीव आला. शेवटी पराभवानंतर कुणी बळीचा बकरा बनला तर काय होते हे चेतन शर्मा आणि विनोद कांबळी यांच्या उदाहरणावरून त्यालाही माहित आहे.
शेवटच्या सामन्यात एक बाब दिसून आली ती म्हणजे भारतीय खेळाडूंमध्ये जिंकण्याचे स्पिरीट दिसले. त्यामुळे सर्वजण कसून खेळताना दिसले. नव्या जुन्यांचा योग्य संयम दिसला. प्रत्येक जण आपले काही तरी योगदान देण्याच्या मनस्थिती होता. ही बाब फार महत्त्वाची आहे. त्यामुळचे की काय एरवी आपल्या प्रतिक्रिया अतिशय गंभीरपणे देणार्या कर्णधार राहूल द्रविडच्या चेहर्यावरचा आनंद विजयानंतर मावत नव्हता. केबिनमधून खाली येऊन त्याने खेळाडूंचे विजयाबद्दल अभिनंदन केले. त्याची देहबोलीच त्याचा आनंद सांगत होती.
शनिवारी इंग्लंडविरूद्ध अंतिम सामना खेळतानाही हेच स्पिरीट दिसावे ही अपेक्षा आहे. सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली लॉर्डसवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतापुढे असचे ३२५ धावांचे आव्हान असताना युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ या नवोदितांनी भारताचा विजय सार्थकी लावून नेटवेस्ट मालिका भारताच्या झोळीत टाकली होती. त्याची पुनरावृत्ती शनिवारी करण्याची संधी आहे. त्यावेळी मिळविलेल्या विजयानंतर सौरभ गांगुलीने अंगातील शर्ट काढून भिरकावलेला सर्वांना पाहिला. त्याविषयी चर्चाही खूप झाली. पण शेवटी विजयाचा तो जल्लोष होता. तसा जल्लोष करण्याची संधी पुन्हा एकदा आली आहे.
ही संधी साधण्यासाठी टीम इंडियाला मनःपूर्वक शुभेच्छा!