Article Sports Marathi Articles %e0%a4%9b%e0%a4%82%e0%a4%a6 %e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8 %e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80 108111700013_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छंद जोपासून घेतलेली भरारी...

- डॉ. मिलिंद टिपणीस

छंद जोपासून घेतलेली भरारी
लाहोरमध्ये भेटलेली माणसे, दुकानदार, टॅक्सी- रिक्षाचालक, हॉटेलमालक आमच्याकडून पैसे घेत नव्हते. उलट आम्हालाच भेट वस्तू देत होते. रस्त्यात थांबवून चहा, कॉफी, फळांचे ज्यूस देत होते. त्यामुळे अनेकदा मन अगदी भरून येई.       
माझा जन्म दादरचा. मुंबई भारतीय क्रिकेटचे माहेरघर तर दादर मुंबईचे. माधव मंत्री, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर व फरूक इंजिनीयर सारखे कसोटी क्रिकेटपटू आणि अनेक नामवंत रणजीपटूंचे वास्तव्य असलेल्या दादरमध्ये क्रिकेटचे बाळकडू मिळाले नसते तर नवल. माझे शाळेतील मित्र गोट्या, पंतग, भवरे, कबड्डी, खो-खो आदी खेळत. मात्र, दादरमध्ये 365 दिवस फक्त क्रिकेट. उन्हाळा असो वा पावसाळा क्रिकेटला पर्याय नव्हता.

मर्यादित गुणवत्ता व वैद्यकीय शिक्षणामुळे क्रिकेटमध्ये करीयर करता येणार नाही, हे लवकरच कळले. क्रिकेटशी जवळचा संबंध असावा, ही दुर्दम्य इच्छा आणि इंग्रजी भाषेची अत्यंत आवड होती. गल्ली आणि मैदानी टेनिस बॉल, क्रिकेट कॉमेंट्रीची चांगली सवय होती. शाळेत वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेचा अनुभव गाठीशी असल्याने इंग्रजी समालोचक व्हावे, असा पर्याय उपलब्ध होता. 1990 साली आकाशवाणीची ऑडिशन टेस्ट उत्तीर्ण झाल्यावर रणजी, दुलीप, इराणी, एकदिवसीय व कसोटी सामन्यांचे समालोचन करण्याची संधी मिळाली. छंद जोपासण्याबरोबरच भारत आणि विदेश भ्रमण करण्याचा चांगला अनुभव मिळाला. 18 वर्षांच्या समालोचनाच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय प्रसंग पाहिले. त्यातील काही वेचक प्रसंग आणि आठवणी वाचकांपुढे मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न....

1999 साली केनियाची राजधानी नैरोबी येथे चार राष्ट्रांची मर्यादीत षटकांची मालिका खेळविण्यात आली. नैरोबी एअरपोर्ट बाहेर पडताच माझ्या सहकार्‍याचे दोन हजार यू. एस. डॉलर्स असलेले पाकीट मारले गेले. पुढे रस्त्यात गोळीबार झाल्याने वाहतूक विस्कळीत होऊन बराच खोळंबा झाला. नैरोबीतील असुरक्षिततेचे प्रत्यंतर पहिल्या अर्ध्या तासात आले. नैरोबीतील वन्यप्राणी जीवन तर थक्क करणारे होते. मसाईमारामध्ये डोळ्यासमोर अंदाजे पाच हजार झेब्रा, जिराफ, नीलगाय, शहामृग एकत्र फिरण्याचे दृश्‍य अविस्मरणीय होते.

  अबुधाबीत भारत- पाक सामना सुरू होण्यापूर्वी सैन्याने स्टेडियमचा ताबा घेऊन अनेकांना आत शिरण्यास मज्जाव केला. समालोचन कक्षात पोहचण्यासाठी केलेली तारेवरची कसरत आणि घालमेल मनात अजूनही ताजी आहे.      
नैरोबी येथील कायम स्मरणात राहणारा प्रसंग हॉटेल कार्निव्होअर मधला. आपल्या येथे तंदुरी चिकन किंवा इतर कोळशावर भाजलेले पदार्थ सर्रास खाल्ले जातात. कार्निव्होअरमध्ये पेटत्या लाकडांची एक खोल विहीर होती. बांबूसारख्या दिसणार्‍या लोखंडाच्या सळ्यांना जिराफ, मगर, झेब्रा, शहामृग, हरीण आदी प्राण्यांचे मोठ्या मासांचे तुकडे लावून भाजले जात होते. अनेक परदेशी या मासांहारावर ताव मारत होते. तर आफ्रिकन नृत्यांगना आपले कौशल्य संगीताच्या तालावर सादर करत होत्या.

2004 सालचा भारतीय क्रिकेट संघाचा ऐतिहासिक पाकिस्तान दौरा संस्मरणीय ठरला. पाकिस्तानला निघण्यापूर्वी आकाशवाणीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सुरक्षेबाबत अनेक महत्त्वाच्या सुचना केल्या होत्या. मात्र, तिथला अनुभव वेगळाच होता. लाहोरमध्ये भेटलेली माणसे, दुकानदार, टॅक्सी- रिक्षाचालक, हॉटेलमालक आमच्याकडून पैसे घेत नव्हते. उलट आम्हालाच भेट वस्तू देत होते. रस्त्यात थांबवून चहा, कॉफी, फळांचे ज्यूस देत होते. त्यामुळे अनेकदा मन अगदी भरून येई.

पाकिस्तानातील नागरिकांना भारताचे प्रचंड आकर्षण आहे. अनेक जण शाहरूख खान, ऐश्वर्या राय भेटतात काय, असे विचारत तर काही ताजमहल पाहण्याची इच्छा प्रकट करीत. बहुतेक जण भारतातील नातेवाईकांना भेटण्यासाठी व्हिसा मिळेल काय, याची चौकशी करीत. तेथील लोक भारतीय संगीताचे वेडे आहेत, हे पदोपदी जाणवत होते. दुकानं, हॉटेली कुठंही जा, हिंदी गाणी सर्रास ऐकायला मिळायची. एवढेच नाही तर मोबाइलच्या रिंगटोन्स देखील हिंदी गाण्याच्या असत. हे कमी म्हणून पाक टीव्हीवर दर तीन-चार दिवसांनी हिंदी चित्रपट दाखवण्यात येत.

मुलतानमध्ये एका संध्याकाळी चार पाकिस्तानी पत्रकार आम्हाला खोलीत येऊन भेटले. त्यांच्याशी क्रिकेट, चित्रपट आदी विषयांवर भरभरून गप्पा मारल्या. यावेळी आम्ही मागणी केल्यानंतर ही त्यांनी व्हिजिटींग कार्ड देण्याचे टाळले होते. दुसर्‍या दिवशी कळले की, ते चौघे पत्रकार नसून साध्या वेषातील उच्च पदावरील पोलिस अधिकारी होते.

श्रीलंकेतील निसर्ग सौंदर्य, बौध्द मंदिरे अप्रतिम तर यू.ए.ई. येथील दुबई, अबुधाबीमधील भव्यता मन भांबावणारी. अबुधाबीत भारत- पाक सामना सुरू होण्यापूर्वी सैन्याने स्टेडियमचा ताबा घेऊन अनेकांना आत शिरण्यास मज्जाव केला. समालोचन कक्षात पोहचण्यासाठी केलेली तारेवरची कसरत आणि घालमेल मनात अजूनही ताजी आहे. अबुधाबीतील सप्‍ततारांकीत एमिरेट पॅलेस हॉटेलचा अति भव्य विस्तार व झगमगाट पाहून सर्वच अचंबित झाले.

  पाकिस्तानातील नागरिकांना भारताचे प्रचंड आकर्षण आहे. अनेक जण शाहरूख खान, ऐश्वर्या राय भेटतात काय, असे विचारत तर काही ताजमहल पाहण्याची इच्छा प्रकट करीत. बहुतेक जण भारतातील नातेवाईकांना भेटण्यासाठी व्हिसा मिळेल काय, याची चौकशी करीत.      
फेब्रुबारी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळलेली तीन राष्ट्रांची एक दिवसीय क्रिकेट मालिका भारताने जिंकली. जगप्रसिध्द मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, त्यातील क्रिकेट म्युझियम, बाजुलाच असलेले रॉड लेव्हर टेनिस इरीना येथे वर्षातील पहिल्या ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा खेळली जाते. पेंग्विन परेड, मेलबर्न टॉवर सारं कसं अफलातूनच होतं.

सिडनीतील विश्वविख्यात हार्बट ब्रीज, ऑपेरा हाऊस व डार्लिंग दरबार बघण्याची संधी मिळाली. क्वीन्सलॅंड राज्यातील गोल्डकोस्ट हे सुप्रसिध्द पर्यटन स्थळ म्हणजे केवळ स्वर्गच. वॉटर स्पोर्टसची आवड असणार्‍यासाठी यापेक्षा चांगले ठिकाण नाही.

1970- 80 च्या दशकात पर्थची खेळपट्टी जगातील सर्वांत वेगवान म्हटली जायची. ह्या मैदानातून समालोचन करायला मिळलेली संधी तसेच मार्शल लिली यांच्यासोबत केलेले संभाषण ही आयुष्यांची पुंजी. बाळपणात आदर्श मानलेले क्रिकेटपटू गावस्कर, वाडेकर, विश्वनाथ, बेदी, प्रसन्ना, बेनॉ, चॅपेल बंधू, लॉईट, व्हिवियन रिचर्डस, झहीर अब्बास इम्रान खान, हॅडली, क्रो, बॅरी रिचर्डस, प्रॉक्टर अशा दिग्गजांबरोबर समालोचन करण्याची मिळालेली संधी केवळ संस्मरणीय. बालपणी जोपासलेला एक छोटा छंद भारतात व जगाच्या पाठीवर भ्रमणाची संधी देतो हे सर्व स्वप्नवत....

(लेखक हे फॅमिली फिजिशियन असून ऑल इंडिया रेडिओचे 'इंग्रजी क्रिकेट समालोचक' आहेत.)

Share this Story:

Follow Webdunia marathi