Article Sports Marathi Articles %e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%87 %e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87 %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0 107092600011_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवे तारे संधीअभावी मावळणार?

- अभिनय कुलकर्णी

नवे तारे संधीअभावी मावळणार?
ट्वेंटी ट्वेंटीतील विश्वविजयाने सगळी समीकरणेच बदलून टाकली आहेत. पारंपरिक समजूतींनाही सुरूंग लावला आहे. कुठलाही स्टार खेळाडू नसतानाही किंबहूना त्याचमुळे विजेतेपद जिंकता येते, हे या संघाने दाखवून दिले आहे. पण आता प्रश्न हा आहे की भारतीय क्रिकेटच्या नभात चमकणारे हे तारे यापुढेही चमकत रहाणार की संधीअभावी मावळणार?

ट्वेंटी ट्वेंटी विश्वकरंडकातून सचिन तेंडूलकर, सौरभ गांगुली आणि राहूल द्रविड यांनी माघार घेतली होती. पण त्यांच्या माघारीमुळे नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. पण या खेळाडूंच्या करीयरची गाडी पुढे धावणार की तेथेच थांबणार असा प्रश्न आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठीच्या भारतीय संघात यातील काही खेळाडूंना स्थानच नाही. ज्यांना स्थान मिळाले त्यांना अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी तरी मिळेल का अशी स्थिती आहे.

या स्पर्धेतही महेंद्रसिंह धोनी कर्णधार आणि युवराजसिंह उपकर्णधार आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, इरफान पठाण, हरभजनसिंग, पियूष चावला, झहीर खान, श्रीशांत, आर. पी. सिंह, दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, रमेश पोवार, गौतम गंभीर यांचा समावेश आहे.

ट्वेंटी ट्वेंटीत दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला वगळले आहे. बिचाऱ्या शर्माला स्वतःला सिद्ध करण्याचीही संधी एकदिवसीय सामन्यात देण्यात आली नव्हती. आता तर ट्वेंटी ट्वेंटीत चमकूनही तो आगामी संघात नाहीये. तीच कथा जोगिंदर सिंगची. रोहतकचा हा तरूण संघात आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून हा काही करू शकेल असे वाटत नव्हते. पण दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याला शेवटचे षटक देण्यात आले आणि त्याने विजय भारताच्या पदरात पाडला. आता या गुणी जोगिंदरचे पुढे काय होणार? संघ जाहीर झाला तेव्हा यांची कामगिरी निवड समितीच्या डोळ्यासमोर नव्हती. पण समितीने आता तरी यांचा विचार केला पाहिजे.

ज्यांना स्थान मिळाले त्यांचे तरी काय होणार? सचिन तेंडूलकर, राहूल द्रविड, सौरव गांगुली यांना वगळण्याचा निर्णय निवड समिती घेऊ शकत नाही. पण मग नव्या रक्ताला वाव तरी कसा मिळणार? आता फलंदाजीच्या बाबतीत जरी बोलायचे झाले तरी वरील तिघांना संघात घेतले तर धोनी व युवराज मिळून पाच फलंदाज होतात. म्हणजे आणखी एक किंवा फारतर दोन फलंदाज घेऊ शकतो. यात गौतम गंभीर, रॉबिन उत्थप्पा, दिनेश कार्तिक यांच्यातून कोणाला निवडणार? चमकदार कामगिरी करणारा रोहित शर्मा बाहेरच रहाणार काय? याशिवाय शेवटच्या सामन्यात एका षटकारासह पंधरा धावा करणारा इरफानचा भाऊ युसूफ पठाणचे पुढे काय होईल? त्याला तर सिद्ध होण्यासाठी केवळ एकच संधी मिळाली. त्याच्यातील गुणवत्तेला पुरेसा वावही मिळालेला नाही. कदाचित. त्यातूनही एखादा चांगला फलंदाज मिळू शकेल.

गौतम गंभीरच्या बाबतीतही असेच झाले आहे. यापूर्वी कायम त्याला आता बाहेर करण्यात आले. पण सलग खेळविले तर काय याचे गंभीर चांगले उदाहरण आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडननंतर त्याच्या धावा सर्वाधिक आहेत. रॉबिन उत्थप्पाने आक्रमक व गरज पडली तर तडाखेबाज फलंदाजी कशी करायची ते दाखवून दिले आहे. दिनेश कार्तिक या स्पर्धेत फारसा यशस्वी ठरला नसला तरी यापूर्वी त्याने चांगली फलंदाजी केली आहे.

गोलंदाजांच्या बाबतीत तर आणखी कठीण स्थिती आहे. चार किंवा प्रसंगी पाच गोलंदाज खेळविले जातात. यात झहीर खानची जागा जवळपास पक्की असते. म्हणजे या व्यतिरिक्त इरफान पठाण, हरभजनसिंग, श्रीशांत, आर. पी. सिंह, रमेश पोवार यापैकी कुणाकुणाला स्थान मिळणार? ट्वेंटी ट्वेंटीत यशस्वी ठरलेला जोगिंदर शर्मा संघाबाहेरच रहाणार काय? हरभजन आणि इरफानला आपण बाहेर ठेवले. आर. पी. सिंहलाही आत बाहेर केले. आता यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. पण यांना पुढे संधी देण्याची गरज आहे.

भारतीय संघाला आता तरूण रक्ताची गरज आहे. ट्वेंटी ट्वेंटी नव्या दमाच्या धोनी सेनेनेच दिग्गज संघांना चीतपट करून विजेतेपदावर भारताचे नाव कोरले आहे. स्टार खेळाडूंनीही आता हे नवे वारे स्वीकारायला हवे. याचा अर्थ सचिन, सौरभ, राहूलला संघातून वगळावे असे नाही. पण असेही व्हायला नको, की आगामी काळात खूप काही करण्याची क्षमता असलेल्या खेळाडूला तो चांगली कामगिरी करत असतानाच संधी मिळाली नाही, तर त्याची प्रतिभा कोमेजून जाईल. शिवाय कामगिरीची निकष खेळाडूनिहायही वेगळे नको. केवळ एक दोन सामन्यात चांगली कामगिरी झाली नाही, म्हणून नवोदिताला बाहेरचा रस्ता आणि बराच काळ फारसे चांगले न खेळूनही ज्येष्ठांना मात्र, संघात स्थान असे व्हायला नको. विश्वकरंडक जिंकल्यानंतर सचिन तेंडूलकरने दिलेली प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. सचिन म्हणाला होता, `आता भारतीय क्रिकेटचे भवितव्य सुरक्षित हातांत आले आहे.` आता हा विचार करूनच ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाण्याची गरज आहे.

(सचिन, सौरभ, राहूल यांनी निवृत्त व्हावे काय? आपले मत लिहा. त्यासाठी विचार मांडा वर क्लिक करा.)

Share this Story:

Follow Webdunia marathi