ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सीबी तिरंगी क्रिकेट मालिकेत भारताला पराभूत करण्यासाठी सर्व प्रकारची हत्यारे वापरली, मैदानातील शिवीगाळ, शेरेबाजी, मैदानाबाहेरून शेरेबाजी, मीडीयाकरवी हनन हे सगळे सगळे प्रकार वापरून झाले. हरभजनला तर जणू टार्गेटच केले होते. मग इशांत शर्मावरही बालंट आणण्याचा प्रयत्न झाला.
या सगळ्या प्रकाराविषयी हरभजनने एक छान कमेंट केली होती. तो म्हणाला होता, ऑस्ट्रेलियाच्या जगज्जेतेपदाचा मुकूट भारताने हिरावून घ्यायला सुरवात केलीय. त्यांना आतापर्यंत कुणीच आव्हान दिले नव्हते. भारताने ते आव्हान निर्माण केले. त्यामुळे पायाखालची वाळू सरकत असल्याने ऑस्सी खेळाडू टीका करत आहेत.
हरभजनचे म्हणणे किती खरं आहे, ते आजच्या दिवसाने दाखवून दिले. सीबी तिरंगी क्रिकेट मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत चिरडून टाकत इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत जाऊन नमविणे केवळ अशक्य अशी स्थिती असताना भारताने हा पराक्रम घडविला आहे हे विशेष. भारताने कसोटीतही त्यांचा सोळा विजयांचा अश्वमेध रोखला होता. आता वनडेतही माती खायला लावली.
हा विजय भारतीय खेळाडूंमध्ये संचारलेल्या नव ऊर्जेचा, त्यांच्यातील विजीगीषू वृत्तीचा आहे. ऑस्ट्रेलियाला तोडीस तोड उत्तर द्यायचं तर ते मैदानात दिलं पाहिजे, हेच भारतीय खेळाडूंनी ओळखलं आणि त्याची अंमलबजावणीही केली. म्हणून तर ज्या हेडन आणि सायमंड्सने हरभजनवर आरोप केले, त्या दोघांना अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या अंतिम सामन्यात हरभजनने तंबूत पाठवले.
या मालिकेपर्यंत ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर वाघ मानला जात होता. पण तौ लौकीकही भारताने धुळीस मिळवला. आहे. त्याचबरोबर तुम्ही ट्वेंटी-२० चे जगज्जेते असलात तरी आम्ही वन डेचे जगज्जेते आहोत, हे विसरू नका या कांगारूंच्या वल्गनेलाही भारताने सणसणीत उत्तर दिले आहे.
या मालिकेत धोनीने कर्णधार म्हणून जबरदस्त कामगिरी केली. कर्णधार आक्रमक असायला हवा, विशेषतः ऑस्ट्रेलियाविरूद्ध तरी. ऑस्ट्रेलियाला पराभूत करायचं तर त्यांच्याच तंत्राने करता येईल. हे या पठ्ठ्याने ओळखलं. म्हणूनच या मालिकेच्या सुरवातीपासूनच त्याने ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला. मालिकेतील पहिला सामना फक्त सोडला तर उर्वरित सर्व सामन्यांत भारतीय प्रभावी ठरले. अंतिम सामन्यांतही ऑस्ट्रेलियाला दबावात आणलं की झालं विजय आपलाच हे धोनी ओळखून होता, त्याने तो दबाव निर्माण केला. म्हणूनच तर पहिल्या अंतिम सामन्यात जगज्जेते फक्त २३९ धावा करू शकले आणि दुसऱ्या सामन्यातही अडीचशेत बाद झाले.
मालिकेच्या सुरवातीच्या सामन्यात फारशी प्रभावी फलंदाजी न करणाऱ्या सचिनवर अवाजवी टीका होत होती. अंतिम दोन सामन्यातील खेळीने ही टीका अवाजवी होती हेच सिद्ध केले. या महान फलंदाजांवर काही वेळा टीका का केली जाते हेच समजत नाही. शिवाय सचिनने कधी मालिका जिंकून दिली नाही, अशी एक पुडी नेहमी सोडून दिली जाते. तिलाही सचिनने आपल्या बॅटीने उत्तर दिले आहे. अंतिम दोन्ही सामने केवळ सचिनच्या फलंदाजीच्या जोरावर जिंकले हे मान्य करायला त्याच्या टीकाकारांनी आता हरकत नाही.
या मालिकेने प्रवीण कुमार व इशांत शर्मा हे वेगवान गोलंदाजही भारतीय संघाला दिले. त्यामुळे वेगवान गोंलंदाजांचा दुष्काळ आता बऱ्यापैकी संपला आहे. हे नवे रक्त भारतीय क्रिकेटला नक्कीच संजीवनी देणार आहे. या मालिकेने एक महत्त्वाची बाब दिली ती म्हणजे आक्रमकपणा. आक्रमकपणाच समोरच्या संघाचे निम्मे मनोधैर्य खच्ची करतो. ऑस्ट्रेलियावरील विजयात हा आक्रमकपणा महत्त्वाचा ठरला. त्या जोरावरच जगज्जेत्यांना पाणी पाजू शकलो. आता आपल्याला कमी लेखण्याची चुक ऑस्ट्रेलिया यापुढे कधीही करणार नाही.