Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालिका जिंकली, पण...

राकेश रासकर

मालिका जिंकली, पण...
इंग्लंडला त्यांच्याच धरतीवर पराभूत करण्याच्या 21 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची राहूल द्रविडच्या संघाने पुनरावृत्ती केली. तीन कसोटी सामन्यांची ही मालिका भारताने 1-0 ने जिंकली, पण जिंकण्याच्या स्थितीत असूनही शेवटचा कसोटी सामना काही भारताला आपल्या नावे करता आला नाही. राहूल द्रविडच्या कर्णधारपदाच्या क्षमतेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असे यामुळे म्हणता येईल काय?

पहिली कसोटी हरता हरता वाचल्यानंतर त्यातून बोध घेत भारताने दुसरी कसोटी सफाईदारपणे जिंकली. गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या कसोटीत झहीर खान मॅचविनर ठरला असे म्हटले तर वावगे ठऱणार नाही. त्याचबरोबर संघातील ज्येष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंनी साधलेला समन्वय भारताला विजय मिळवून गेला हेही तितकेच खरे आहे. तिसर्‍या कसोटीत हेच समीकरण आणखी दृढ करण्याची गरज होती. तसे ते झालेही पण द्रविडच्या कर्णधारपदाच्या मर्यादांनी भारताला विजयापासून दूर ठेवले.

फलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व गाजवलेल्या या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीयांनी 664 धावा केल्या. विशेष म्हणजे खेळपट्टीची अवस्था अशी झाली की आठव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या अनिल कुंबळेनेही शतक झळकावले. (प्लीज नोट- मालिकेत भारतातर्फे शतक करणारा एकमेव फलंदाज) याचा अर्थ खेळपट्टी किती पाटा झाली असावी याची कल्पना यावी. नंतर गोलंदाजांनीही भूमिका चोख पार पाडत इंग्लंडला 345 धावांमध्ये गारद केले होते. भारताने त्यावेळी 319 धावांची आघाडी घेतली होती. या आघाडीचा फायदा उठवत द्रविडने खरे तर फॉलोऑन देणे गरजेचे होते पण तसे न करता त्याने दुसर्‍यांदा फलंदाजी करणे पसंत केले. त्याने असे का केले याचे कारणच कळत नाही.

ठीक आहे फॉलोऑन न देता खेळायला उतरले तरी वेगाने धावा करून मोठे लक्ष्य तरी समोर ठेवायचे पण तेही जमले नाही. बचावात्मक पवित्रा घेण्याच्या नादात विकेट मात्र फेकल्या. स्वत: द्रविड 140 मिनिटे खेळपट्टीवर टिकला आणि 96 चेंडूंचा सामना करताना धावा फटकावल्या फक्त 12.

दुसर्‍यांदा फलंदाजीला येऊन द्रविडला नेमके काय करायचे होते तेच कळत नाही. सामन्यानंतरही त्याला याचे कारण विचारले तेव्हा आमचे गोलंदाज थकले होते त्यांना विश्रांतीची गरज होती, असे (न पटणारे) उत्तर दिले. त्यावर झहीरने आपण थकलो नव्हतो असे सांगून द्रविडच्या स्पष्टिकरणातील हवाच काढली आहे. तिसर्‍या दिवशी भारताच्या दोघांनीच गोलंदाजी केली. झहिर व श्रीशांतने यांनी गोलंदाजी केलीच नाही, तरी ते थकले कसे? तुलनाच करायची झाल्यास भारतीय गोलंदाजांपेक्षा इंग्लंडच्या गोलंदाजांनी जास्त षटके टाकली होती. मग तेही थकले का नाहीत. उलट त्यांनी भारताच्या दुसर्‍या डावात पटापट विकेट काढत चांगली कामगिरी केली. मग भारतीय गोलंदाज थकले हे द्रविडचे समर्थनच पटत नाही.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोलंदाज इतक्या लवकर थकत असतील तर त्यांना आंतरराष्ट्रीय म्हणायचे का असा प्रश्न पडतो. आणखी एक मुद्दा म्हणजे ज्या खेळपट्टीवर भारताने धावांचा डोंगर रचला. इंग्लंडनेही पावणेचारशेचा टप्पा गाठला. ती खेळपट्टी तिसर्‍या दिवसानंतर कशी झाली असेल याची कल्पना यायला ब्रह्मदेवाची गरज नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांना बाद करणे अवघड जात असेल तर तेच आपल्याबाबतीतही घडणार नाही, असा विचार का केला गेला नाही? मायकेल वॉनचा सोपा झेलही द्रविडने सोडला व त्याच वॉनने पीटरसनला चांगली साथ दिली व भारताचा विजय हिसकावून घेतला. एवढे होऊनही द्रविड चुक मान्य करायला तयार नाही. शंभराहून अधिक कसोटी खेळलेला द्रविड अशा चुका करत असेल तर काय म्हणायचे?

द्रविडच्या निर्णयावर ज्येष्ठ खेळाडूंनीही ताशेरे ओढले आहेत. निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनीही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. तर कृष्माम्माचारी श्रीकांतने या निर्णय चुकीचा ठरवला आहे. फक्त अजित वाडेकर यांनी प्राप्त परिस्थितीत द्रविडने योग्य निर्णय घेतला असे समर्थन केले. पण तेही बापुडवाणे वाटते.

ही मालिका 2-0 ने जिंकली असती तर भारत व इंग्लंड या दोन्ही संघाचे कसोटी क्रमवारीचे गुणही (107) झाले असते. भारताला दुसर्‍या क्रमांकावर येण्याची संधी मिळाली असती. त्यामुळे कसोटी मालिका जिंकली तरीही जिंकल्याचे पूर्ण समाधान काही मिळाले नाही. उलट शेवटचा सामना जिंकण्याची संधी असतानाही अनिर्णित राहिला याचेच दुःख झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi