इंग्लंडविरूद्धचा सहावा एकदिवसीय सामना जिंकल्याचा सर्वांत जास्त आनंद कुणाला झाला असेल ? तुम्ही म्हणाल सर्वच भारतीयांना झालाय. त्यात काय एवढे. पण ते खरं नाहीये. भारतीयांना तर आनंद झालाच आहे. पण सर्वांत जास्त आनंद झालाय तो युवराजसिंगला. आश्चर्य वाटतंय ना. पण सामना जिंकल्यानंतर युवराजसिंगने मैदानात जाऊन रॉबिन उत्थप्पाला ज्या पद्धतीने अत्यानंदाने मिठी मारली आणि त्याला घेऊन तो नाचला त्यावरून त्याला झालेला आनंद दिसून आला. अर्थात या आनंदालाही कारण होतं. कारण तेव्हा त्याच्यासमोर मस्करहान्स दिसत होता.
भारत या सामन्यात पराभूत झाला असता तर सामन्याचा खलनायक अर्थातच युवराज ठरला असता. कारण द्रविडने त्याला गोलंदाजी देऊन पायावर धोंडा मारून घेतला आणि या महाशयांनी असे चेंडू टाकले की बिचार्या मस्करहान्सला एक चेंडू सोडून पुढील प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा मोहही आवरला नाही. सहाजिकच ४९ व्या षटकावेळी २८६ धावांवर असलेला धावफलक सहा चेंडूतच ३१६ धावांपर्यंत जाऊन थांबला. आधीच भारतीय संघाला तीनशेच्या आकड्याचे भय. त्यात संघाची सध्याची कामगिरी पहाता ते काय दिवे लावतील अशी शंका होती. त्यातच धावा आणि चेंडू यांच्यातील अंतर वाढत असताना दुसरीकडे विकेट पडायलाही सुरवात झाली होती. तरीही रॉबिन उत्थप्पाने संयम राखून हातातून निसटणारा विजय खेचून आणला.
पण भारत सामना हरला असता तर त्याचे खापर नक्कीच युवराजवर फुटले असते. कारण तीनशेपर्यंत आपण धडक मारलीच होती. याचा अर्थ तोपर्यंतचे लक्ष्य आपण आरामात पार करत होतो. महागात पडल्या असत्या त्या युवराजने दिलेल्या तीस धावा. सहाजिकच हरल्यानंतर युवराज नक्कीच खलनायक ठरला असता आणि हा कलंक धुवून काढायची संधी त्याला मिळाली असती की नाही देवजाणे. कारण असे ठरवले गेलेले खलनायक भारतात बरेच आहेत. त्यांच्या आठवणीही अशा अनेक वेळा उचंबळून येतात.
शारजात जावेद मियांदादने चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकल्याची आठवण आजही ह्रदयात ठसठस निर्माण करते. त्यामुळे त्यानंतर चेतन शर्माचे काय झाले ते सर्वांनाच ठाऊक आहे. आठवा भारतात भरलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेविरूद्धचा उपांत्य सामना जवळपास सर्व भारतीय संघ सव्वाशेत तंबूत परतला असताना संतापलेल्या लोकांची शिकार बनला तो मैदानावर असलेला विनोद कांबळी. त्यावेळी तळाच्या फलंदाजांना घेऊन कांबळीने लढवय्यी वृत्ती दाखवली असती तरी चालले असते. पण तसे झाले नाही. शेवटी संघातून कांबळीला डच्चू मिळाला तो कायमचाच.
थोडक्यात युवराजचा चेतन शर्मा किंवा विनोद कांबळी व्हायचा वाचला.