वेस्ट इंडिज या नयनरम्य बेटावर पहिल्यांदाच झालेली विश्वकरंडक स्पर्धा भारतासाठी फारशी चांगली गेली नसली, तरी या स्पर्धेचे परिणाम बरेच झाले. अनेक समीकरणे बदलली. अनेक विक्रम रचले गेले. क्रिकेटपटू मैदानात व मैदानाबाहेरही खूप गाजले. ४८ दिवस, ५१ सामन्यांच्या मंथनात १६ संघ सहगभागी झाले होते. या महाकुंभात अखेर ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला.
स्पर्धेची सुरवात यजमान वेस्ट इंडिज व पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याने झाली. या सामन्यात यजमानांनी चांगली खेळी करत पाकिस्तानचा ५७ धावांनी पराभव केला. ज्या देशांना कसोटी मान्यता नाही, त्यांना या स्पर्धेत सहभाग दिल्याबद्दल स्पधेपूर्वी बरेच वादंग झाले. पण याच संघांनी सगळी गणिते बदलून टाकली.
त्यातील पहिला संघ म्हणजे आयर्लंड या नवघ्या संघाने प्रथम झिंबाब्वेविरूद्धचा सामना बरोबरीत सोडविला. त्यानंतर क्रिकेटजगतात चौथ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानचा गटसाखळी सामन्यात धक्कादायक पराभव केला. यामुळे स्पर्धेतील गृहितके बदलली. हा बदल एवढा मोठा होता की १९९२ च्या विश्वविजेत्या पाकिस्तानला गट साखळीतच गारद होण्याची वेळ आली. या विजयामुळे आयर्लंड मात्र सुपर ८ सांठी पात्र ठरले.
आयर्लंडच्या पराभवातून सावरत नाही तोच पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वुल्मर यांचा हॉटेलमध्ये रहरस्यमयरित्या मृत्यू झाला. त्यामुळे पाकच्या खेळाडूंवर सर्वत्र शंका घेतली जाऊ लागली. हा खूनच असल्याचे अखेर निष्पन्न झाले आहे. मात्र, खुनी कोण हे स्पष्ट झालेले नाही. पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम उल हकने एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली.
दुसरा मोठा धक्का बांगलादेशने दिला. साखळी सामन्यात त्यांनी संभाव्य विजेता मानल्या जाणार्या भारताचा पराभव केला. हा पराभवाचा धक्का एवढा होता की पुढचा श्रीलंकेविरूद्धचा सामनाही भारताने गमावला आणि स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. भारत व पाकिस्तान हे दोन बलाढ्य संघ साखळीतच पराभूत झाले.
दुसरीकडे स्पर्धेआधी क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जने हॉलंडविरूध्द इतिहास रचला. त्याने दान वॅन बूजच्या एका षटकात ६ षटकार मारत विक्रम केला. त्या सामन्यत दक्षिण आफ्रिकेने एकूण १८ षटकार मारले. एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्यांनी केला. पुढे या विक्रमाची भारताने बर्म्युडाविरूध्दच्या सामन्यात बरोबरी केली.
या स्पर्धेत वेगवान शतक व अर्धेशतकाचे विक्रमही मोडले गेले. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनने ब्रायन लाराचा विश्वकरंडकातील सर्वाधिक वेगवान शतकाचा (६७ चेंडूत) विक्रम मोडला. हेडनने दक्षिण आफ्रिकाविरूध्दच्या सामन्यात त्याने ६६ चेंडूतच शतक झळकावले. तर न्यूझीलंडच्या ब्रेडॉन मॅकक्युलमने २० चेंडूतच अर्धेशतक ठोकून सहा दिवसांपूर्वीचाच मार्क बाऊचरचा वेगवान अर्धशतकाचा (२१ चेंडूत) विक्रम मोडला.
भारताने बर्म्युडाविरूध्दच्या साखळी सामन्यात ५ बाद ४१३ धावा फटकावत विश्वकरंडकात प्रथमच ४०० हून जास्त धावा करण्याचा विक्रम केला. त्यांनी बर्म्युडाला १५६ वर बाद करत २५७ धावांनी विक्रमी विजय मिळवला. एवढा मोठा विजय मिळवूनही भारत सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.
ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडीज, आयर्लंड, न्यूझीलंड व इंग्लंड हे संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरले. सुपर आठ फेरीच्या दुसर्याच सामन्यात श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने ४ चेंडूत ४ बळी मिळवत नवा विक्रम केला. विश्वकरंडकात हॅटट्रिक करणारा तो पाचवा गोलंदाज ठरला. मात्र, त्याची ही कामगिरी श्रीलंकेला सामना जिंकून देण्यात उपयोगी पडली नाही. सलग चार बळी मिळवणारा तो वन डेतला पहिलाच गोलंदाज ठरला.
त्यानंतर ऑस्ट्रेलिया व बांगलादेश यांच्यातील सामन्यात आणखी एका विक्रमाची नोंद झाली. मध्यमगती गोलंदाज ग्लेन मॅकग्राने पाकिस्तानचा माजी गोलंदाज वासीम अक्रमचा विश्वकरंडकातील सर्वांत जास्त बळींचा (५५ बळी) विक्रम मोडला. त्याने या विश्वकरंडकातही ११ सामन्यात एकूण २६ बळी मिळवले. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला.
गट सामन्यात पाकिस्तानला पराभूत करणार्या आर्यंलंडने सुपर आठ फेरीत बांगलादेशला पराभवाचा धक्का दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना आयसीसी क्रिकेट क्रमवारीत जागा मिळाली. ते आता या क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर आहेत.
गट साखळीत भारताचा पराभव करणार्या बांगलादेशने सुपर आठ फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणार्या दक्षिण आफ्रिकेचा केलेला पराभव हा स्पर्धेतील सर्वांत धक्कादायक पराभव म्हणावा लागेल.
सुपर आठ फेरीतून ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत दाखल झाले. येथे ऑस्टेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर न्यूझीलंडवर श्रीलंकेने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
१९९९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्टेलियाचा संघ पाकिस्तानकडून हरला होता. मात्र, त्यानंतर आतापर्यंत ते या स्पर्धेत एकदाही पराभूत झालेले नाहीत. त्यांनी विश्चकरंडकात सलग २९ सामन्यात विजयी राहून वेगळा विक्रम केला आहे. सलग चौथ्यांदा ऑस्टेलियाने विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. सलग तीन विश्वकरंडक जिंकण्याचा विक्रमही त्यांनी श्रीलंकेला हरवून केला. श्रीलंकेला १९९६ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. चामिंडा वास, मुरलीधरन, लसिथ मलिंगा हे त्यांचे हुकमी एक्के चालले नाहीत.
अनेक दिगजांची निवृत्ती :
या स्पर्धेत अनेक मोठ्या खेळाडूंनी निवृत्ती घोषित केली. त्यात ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मँकग्रा, श्रीलंकेचा रसेल अरनॉल्ड, पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम उल हक, वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा यांचा समावेश आहे. न्यूझीलंडचा कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याने न्यूझीलंडच्या संघाचे २१८ सामन्यात कर्णधारपद सांभाळले आहे .जमैकाचे पंच स्टीव्ह बकनर यांनी नवा विक्रम केला. सलग पाचव्या विश्वकरंडकात त्यांनी अंतिम सामन्यात पंचांची भूमिका बजावली.
विश्वकरंडक वादांचाही ः
या स्पर्धेच्या आयोजनावरही मोठ्या प्रमाणावर टीका झाली. प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद तसेच खेळाडूंच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. मात्र, सगळे सुरळीत पार पडत आहे असे वाटत असताना अंतिम सामन्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. पंचांना अंधाराचा अंदाज आला नाही व जेव्हा आला तेव्हा खुप उशीर झाला होता. त्यांनी तीन षटके उद्या खेळायची म्हणन सामना संपवला, मात्र ऑस्ट्रेलियाला वाटले की आपल्याला पंचांनी विजयी घोषित केले. त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरूवात केली होती. शेवटी मध्यस्थी करून तीन षटके अंधारातच खेळण्यात आली. अनौपचारिकता उरलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळविला. एकूणात अशा अनेक कारणांमुळे ही स्पर्दा लक्षात राहणारी ठरली.