भारतीय क्रिकेट संघाच्या ट्वेंटी-२० विश्वकरंडक जिंकण्यात आतापर्यंतच्या सर्वच खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. पण यातही काही हुकमाचे पत्ते आहेत. त्यांच्यामुळे विजय भारताच्या पदरात पडला आहे.
महेंद्रसिंह धोनी- २६ वर्षीय भारतीय कर्णधाराने आपल्याकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्याचा निर्णय किती योग्य आहे हे या स्पर्धेत दाखवून दिले आहे. तडाखेबंद फलंदाजी आणि कुशल नेतृत्व या जोरावर धोनीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. मोक्याच्या वेळी शरणागती पत्करणाऱ्या भारतीय संघात धोनीने जान फुंकली. एकता निर्माण केली. त्यामुळेच या स्पर्धेतील सर्व सामने बऱ्यापैकी अंतर राखून भारताने जिंकले आहेत. पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यातही धोनीने चमकदार खेळ केला होता.
युवराज सिंह- या डावखुऱ्या फलंदाजाने तर सर्वांवरच आपल्या तडाखेबाज फलंदाजीने मोहिनी घातली आहे. त्याची बॅट धावा काढत नाही, ओतते. तो चेंडू फटकावत नाही, टोलवतो. त्यामुळे चौकार, षटकारांच्या राशी त्याच्या बॅटीशी लोळण घेतात. स्पर्धेत १२ षटकार हाणले आहेत. त्यात सर्वाधिक दूर गेलेला षटकारही त्याच्याच नावे आहे. सहाजिकच युवराज प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरला नसता तरच नवल.
रॉबिन उत्थप्पा- या २१ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने इंग्लंड दौऱ्यापासूनच लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेतही त्याने चमकदार खेळ केला आहे. आक्रमक फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्य. त्यामुळे सहा सामन्यातील पाच डावात त्याने ११७.९७ च्या स्ट्राईक रेटने १०५ धावा केल्या आहेत. त्यात त्याचे सहा षटकार व पाच चौकार आहेत. त्याने पाकविरूद्धच्या मागच्या सामन्यातही अर्धशतक ठोकले होते.
हरभजनसिंग- भज्जी या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या हरभजनने आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांची फिरकी घेतली आहे. गरज असताना विकेट मिळवून देणे हे त्याचे वैशिष्ट्य. त्यामुळे सामना फिरवण्यात तो वाकबगर आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना त्याने मायकेल क्लार्कचा बळी घेतल्यामुळेच फिरला असे म्हटले तर वावगे ठऱणार नाही. सहा सामन्यात त्याला सात बळी मिळाले आहेत.
रूद्रप्रताप सिंह- २१ वर्षीय रूद्रप्रताप लंबी रेस का घोडा आहे. स्पर्धेतील सहा सामन्यात त्याला नऊ बळी मिळाले आहेत. त्याच्या गोलंदाजीला धार आहे. वेगाबरोबरच योग्य दिशा हे त्याच्या गोलंदाजीचे वैशिष्ट. त्याच्यासमोर खेळताना भले भले फलंदाज गडबडले. फलंदाजांना तो बांधून ठेवतो. त्यामुळेच त्याच्या गोलंदाजीवर फारशा धावा निघालेल्या नाहीत.
जोगिंदर सिंह- जोगिंदर सिंहच्या चेहऱ्याकडे पाहून याला काय बळी मिळणार असे वाटते. पण तो डॉक हॉर्स ठरला. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरूदधच्या शेवटच्या सामन्यात शेवटचे अतिशय जोखमीचे ठरणारे षटक टाकण्याचा आणि भारताला जिंकून देण्याचा मान याच्याकडे जातो. या दोन्ही षटकात त्याने बळी मिळवून भारताची नौका विजयाच्या किनाऱ्याला लावली.
इरफान पठाण- पठाण स्पर्धेत चांगलाच यशस्वी ठरला. पाकिस्तानविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात सोळा धावा देऊन त्याने तीन बळी घेतले. सहाजिकच शेवटच्या सामन्यात तो सामनावीर ठरला. याच खेळाडूला कामगिरीअभावी संघाबाहेर ठेवले होते.
गौतम गंभीर- या नवोदीत खेळाडूत गुणवत्ता ठासून भरली आहे. शेवटच्या सामन्यात अतिशय चांगली फलंदाजी करताना त्याने ५४ चेंडूत ७५ धावा फटकावल्या. एकीकडे ब़डे फलंदाज तंबूत परतत असताना या पठ्ठ्याने बाजू लावून धरली होती.
श्रीशांत- अतिशय आक्रमक स्वरूपाचा हा खेळाडू. शेवटच्या तीनही सामन्यात त्याची कामगिरी चांगली झाली. त्याचा आक्रमकपणा कधी कधी अनावश्यक वाटतो. त्याचा फटकाही त्याला बसतो. पण जिंकायचे असेल तर आक्रमकता हवीच. त्याची खुन्नस हेच त्याचे उत्तेजक आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा