Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिन, राहूल, सौरभने आता तरी निवृत्त व्हावे

सचिन, राहूल, सौरभने आता तरी निवृत्त व्हावे

वेबदुनिया

, शनिवार, 9 ऑगस्ट 2008 (17:01 IST)
श्रीलंकेविरूद्धच्या तिसर्‍या आणि अंतिम कसोटीत भारताची मानहानीकारक अवस्था झाली आहे. याला सगळ्यात जास्त कारणीभूत असलेल्या सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली व राहूल द्रविड यांच्यावर करावी तेवढी टीका कमीच आहे.

NDND
भारताकडे आज घडीला नव्या दमाचे तरूण रक्त उपलब्ध असताना या वय झालेल्या क्रिकेटपटूंना संघात का ठेवले जात आहे ते कळत नाही. अजून किती दिवस ते संघातली जागा ओलीस धरून ठेवणार आहेत? ब्रायन लाराचा आवाक्यात आलेला विक्रम मोडावा म्हणून सचिन तेंडुलकरला संघात ठेवले जाते आहे काय? मग पुढची दहा वर्षे हा विक्रम मोडायला लागली तरीही त्याचे संघातील स्थान तसेच राहिल काय? सचिनला वाटते तितके दिवस तो संघात राहिल, असे बीसीसीआयचे धोरण असावे असे एकूण परिस्थिती पाहता वाटते.

सचिन महान फलंदाज आहे, हे कुणी नाकारत नाही. पण आता त्याचंही वय झालं आहे. त्याच्या कामगिरीवर प्रचंड मर्यादा आल्या आहेत. त्याचा करीश्मा आता संपल्यात जमा आहे. सुरू असलेल्या या तीन कसोटींच्या या मालिकेचंच बघूया. यात पाच डावात त्याने १३.५ च्या सरासरीने अवघ्या ८१ (२७, १२, ५, ३१ व ६) अशा धावा केल्या आहेत. सचिनची झगमगती कारकिर्दी पहाताना हे आकडे त्याला आणि त्याच्या चाहत्यांनाही लाजवणारे आहेत. आपले वय झाले आहे, हे सचिनने आता मान्य करायला हवे. कुणी निवृत्त व्हा हे सांगायच्या आत निवृत्त होणे चांगले हे सचिनने आपला परात्पर गुरू सुनील गावस्करकडून शिकायला हवे. अन्यथा, त्याचाही आता कपिलदेव व्हायची वेळ आली आहे.

webdunia
NDND
आश्चर्य म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही सचिनचा समावेश करण्यात आला आहे. याचे कारण काय तर म्हणे सचिन संघात असल्याचा मानसिक दबाव समोरच्या संघावर येतो. मग आता श्रीलंकेच्या संघावर तसे का होत नाही. आणि सचिनचा दबाव पडतो, असे वाटते तर मग त्याला कोच किंवा व्यवस्थापक बनवा. त्याच्यामुळे नव्या रक्ताची संधी का हिरावून घेता? सचिनमुळे अनेक नव्या क्रिकेटपटूंना संधीच मिळणार नाही. त्यांची कारकिर्द कोमेजून जाईल. दिल्लीच्या शिखर धवनला किंवा गोव्याच्या वर्धमान असनोदकर या चमकत्या खेळाडूंना कधी संधी मिळणार?

बीसीसीआय जणू सचिनच्या दावणीला बांधले आहे, असे वाटते. पण सचिनच नव्हे तर त्याचे समकालीन सौरभ गांगुली व राहूल द्रविड यांच्या बाबतीतही बोर्डाची भूमिका हिच आहे. श्रीलंका दौर्‍यात या दोघांची कामगिरीही लौकिकाला साजेशी झालेली नाही. या दौर्‍यात राहूलने पाच डावात १४, १०, २, ४४ व १० अशा धावा केल्या आहेत. त्याचवेळी सौरभ गांगुलीच्या खात्यात २३, ४, ०, १६ व ३५ धावा जमा आहेत. गांगुलीने कसोटी क्रिकेटमध्ये ६८३५ धावा केल्या आहेत. त्याचवेळी द्रविडने १० हजाराचा टप्पा पार केला आहे. पण एवढ्या धावा करूनही हे बुजूर्ग खेळाडू श्रीलंकेच्या नवोदीत गोलंदाजासमोर गुडघे टेकत आहेत. मग यांचा अनुभव काय कामाचा?

webdunia
NDND
भारताचे सलामीवर बाद झाले की हे तिघेही एकामागोमाग एक तंबूची वाट धरत आहेत. जणू एकावर तीन फ्री अशी स्कीम असावी. एकीकडे श्रीलंका संघ नव्या खेळाडूंना संधी देतो आहे, त्याचवेळी भारतीय बोर्ड मात्र जुन्या खेळाडूंच्या भरवशावर नव्या गुणवत्तेचा गळा दाबत आहे. अजंता मेंडीसला या दौर्‍यात संधी दिली आणि त्याने त्याचे सोने केले. दोन कसोटीत १८ गड्यांना त्याने तंबूत पाठवले. तिसर्‍या कसोटीतही त्याने ५६ धावांत पाच गडी बाद केले. त्याचवेळी धमिका प्रसाद या पहिलीच कसोटी खेळणार्‍या गोलंदाजाने सेहवाग, द्रविड आणि सचिन तेंडुलकर या मातब्बर खेळाडूंना तंबूत पाठवले. बीसीससीआय यावरून तरी काही शिकेल काय?

आता तरी सचिनने निवृत्तीची निर्णय घ्यावा. सचिन हाय हाय च्या घोषणा मैदानात घुमू लागतील, मग एकेकाळी गौरवशाली कारकिर्द असलेल्या खेळाडूची ही मानहानी बघवली जाणार नाही. तीच कथा गांगुली व द्रविडचीही.

Share this Story:

Follow Webdunia marathi