Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हाशिम आमला: आकर्षक फटक्यांचा जादूगार

मनोज पोलादे

हाशिम आमला: आकर्षक फटक्यांचा जादूगार
FILE
दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलदपणे ३,००० धावांचा टप्पा गाठत जागतिक क्रिकेटच्या पटलावर नव्या विक्रमाची नोंद केली. महान फलंदाज व्हिव्हिएन रिचर्ड्सला ज्यासाठी ६९ इनिंग खेळाव्या लागल्या तो पल्ला आमलाने ५८ च्या सरासरीने अवघ्या ५७ डावात गाठून क्रिकेट जगतास आवाक् केले.

तडाखेबंद फलंदाजांच्या मांदियाळीत आमलाच्या झपाट्याकडे लक्ष जाण्याअगोदरच त्याने हे लक्ष गाठले. अवघ्या ५७ डावात त्याने १० शतकं आणि १८ अर्धशतकं झळकवली. आमलाची फलंदाजी शैली ही कसोटी क्रिकेटची. तंत्रशुद्ध खेळण्याचा दंडक तो जपत आलाय. गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत त्याने निर्दयपणे फटकेबाजी केल्याचे आठवत नाही. त्याच्या फलंदाजीत एक सौम्यपणा, मवाळपणा जाणवतो, एक लय जाणवते. त्याचे आकर्षक फटके डोळ्याचे पारणे फेडते. यानंतरही त्याने इतक्या झपाट्याने टप्पा गाठत नवा इतिहास लिहिला, यातच त्याचे मोठेपण आहे.

आमला हा एक क्लास फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण भेदून सुरेख फटके खेळण्यात त्याचा हातखंडा आहे. शैलीदार फटके खेळून तो कुणाच्या नकळत झपाट्याने धावांचा रीघ रचत जातो. विरोधी संघास कळण्याअगोदर तो संघाच्या विजयाचा पाया रचून चुकलेला असतो. त्याच्या फलंदाजीत एक हीलिंग टच आहे. त्याने चेंडू सलग सीमारेषेबाहेर केल्यानंतरही गोलंदाजास विशेष वाईट वाटत नाही, इतके त्याचे फटके आकर्षक असतात.

एकदा त्याने खेळपट्टीवर नांगर रोवला की धावांचा पाऊस पडण्यास सुरूवात होते. संथपणे सारख्या कोसळणार्‍या या सरी हव्याहव्यास्या वाटतात. या पावसात रौद्रपणा नसतो, तर एक आपलेपणा असतो. आमलाचा धावांचा पाऊस विरोधी संघासही सुखद अनुभूती देऊन जातो. दैवी प्रतिभेचा धनी आमला तंत्राचा संयमाने सुरेख उपयोग करतो.
त्याचे फटके व्हायोलिनामधून निघालेल्या मधुर सुरावटीची अनुभूती देते. चित्रकाराने कॅनव्हासवर कुंचल्याच्या साहाय्याने रेखाटलेल्या सौदेर्यासारखी सुंदर त्याची फलंदाजी असते.
webdunia

त्याचे फटके व्हायोलिनामधून निघालेल्या मधुर सुरावटीची अनुभूती देते. चित्रकाराने कॅनव्हासवर कुंचल्याच्या साहाय्याने रेखाटलेल्या सौदेर्यासारखी सुंदर त्याची फलंदाजी असते. जगभरातले धडाकेबाज फलंदाज नोंदवू शकले नाही तो विक्रम त्याने ज्या सहजतेने रचला, त्यातच या फलंदाजाची महानता दडली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi