Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फुटबॉल विश्वचषकाचे भविष्य दुबईचा उंट वर्तविणार

फुटबॉल विश्वचषकाचे भविष्य दुबईचा उंट वर्तविणार
दुबई , गुरूवार, 12 जून 2014 (14:03 IST)
‘स्वप्नात पाहिली राणीची बाग..’, या बालगीतला कुराण वाचणारा उंट आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु, दुबईतील एक उंट फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान भविष्य वर्तवण्याचे काम करणार आहे.

त्याचे नाव शाहीन असे असून तो पापण्यांची उघडझाप करून आपला कौल देणार आहे. 2010 च्या फुटबॉल विश्वचषकामध्ये सर्वच प्रमुख सामन्यांचे निकाल अचूक सांगण्याची किमया जर्मनीच्या पॉल ऑक्टोपसने केली होती. स्पेन विश्वचषक जिंकणार, हे त्याचे भाकीतही अचूक ठरले होते. त्याच्या या भविष्यवाणीने सगळ्यांना चक्रावून टाकले होते. आज तो जिवंत नसला, तरी आजपासून सुरू होणार्‍या फिफा विश्वचषकचे भविष्य वर्तवण्यासाठी वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे प्राणी सज्ज झाले आहेत. जर्मनीचा नेली हत्ती, चीनचा पांडा, ब्राझीलचे कासव, युक्रेनमधील डुक्कर आणि इंग्लंडमधील रो नावाचा कुत्रा सामन्याआधीच्या सामन्याचा निकाल सांगणार आहेत. त्यात आता संयुक्त अरब अमिरातीतील शाहीन या उंटाची भर पडली आहे.

नेली हत्तीने 2010 चा विश्वचषक, 2012चा युरो कप आणि 2013 च्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे निकाल अचूक सांगितले होते. रो कुत्रा फारसा अनुभवी नसला तरी समोरच्या ताटात ठेवलेल्या बिस्किटांमधून ज्या संघाचे बिस्कीट तो खाईल, तो विजेता ठरेल, असे मानले जाणार आहे. युक्रेनमधील डुकरावर तर सरकारचाही विश्वास आहे. कारण, स्थानिक वेळेनुसार रोज चार वाजता ते भविष्य सांगेल, असे तिथल्या सरकारनेच जाहीर केले आहे.

आता या शर्यतीत दुबईनेही उडी घेतली आहे. दुबईच्या वाळवंटात असलेला शाहीन उंट फुटबॉल सामन्यांचे भविष्य सांगणार आहे. गल्फ न्यूजने त्यादृष्टीने सगळी तयारी पूर्ण केली असून आज उद्घाटनाच्या सामन्यात यजमान ब्राझील जिंकणार, की क्रोएशिया याचे भविष्य तो अचूक सांगतो का, याबद्दल उत्सुकता आहे. अर्थात, सच्चे फुटबॉलप्रेमी या भविष्यवाणीपेक्षा प्रत्यक्ष सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी आतूर झाले आहेत. जो भन्नाट खेळेल तोच जिंकेल, अशी त्यांची ठाम धारणा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi