Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत ७ हजार विद्यार्थी आणि २ हजार ५०० विद्यार्थिनींनी सहभाग

chandrakant patil
, सोमवार, 12 डिसेंबर 2022 (14:14 IST)
पुणे  – राज्यशासन खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडाकौशल्य विकसित करण्यावर लक्ष द्यावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
 
रामचंद्र अभियांत्रिकी व पदविका महाविद्यालय लोणीकंद येथे तंत्र शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटनाअंतर्गत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सचिव डॉ. महेंद्र चितलांगे, तंत्र शिक्षण संचालनालयाचे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटनेचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल बांदल, महाविद्यालयाचे अध्यक्ष मारुती भुमकर, प्राचार्य डॉ. अविनाश देसाई आदी उपस्थित होते.
 
पालकमंत्री म्हणाले, या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत ७ हजार विद्यार्थी आणि २ हजार ५०० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला असून विभागस्तरावरुन ३२२ विद्यार्थी आणि २३० विद्यार्थीनी या ठिकाणी सहभागी झाले आहे. जास्तीत जास्त क्रीडा उपक्रम घेण्याचा सूचना संचालनालयाला देण्यात आल्या आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
 
राज्य शासनाने राज्यस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग तीन च्या पदावर, राष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त खेळाडूला वर्ग दोन च्या तर आंतरराष्ट्रीयस्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग एक च्या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण न करता नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळ्या खात्यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा विविध पदावर नियुक्ती देण्यात आल्या आहे, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले.
 
डॉ. मोहितकर म्हणाले, तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक अशा सर्वांगीण विकासाला प्रोत्साहित करण्याच्या हेतूने आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटने स्थापना १९६६ या वर्षी करण्यात आली. राज्यात सांघिक आणि वैयक्तिक या दोन प्रकारात मुलांच्या १४ विभागीय आणि मुलींच्या ५ विभागीय स्तरावर स्पर्धा होतात. दर वर्षी या स्पर्धेत मोठ्यासंख्येने विद्यार्थी सहभागी होत असून यामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्यासह सांघिकवृत्ती, नेतृत्व गुण आदी गुण विकसित होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.
 
श्री. भूमकर म्हणाले, राज्यातील खेळाडूंच्या अंगी असलेल्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तम खेळ खेळा, त्यासाठी नियोजनबद्ध सराव करा, जीवनात कधीही हार मानू नका, जीवनात खूप मोठी प्रगती करा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. पालकमंत्री श्री. पाटील यांना संस्थेच्यावतीने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच संघटनेच्या सुधारित स्पर्धा नियमावलीचे अनावरणही करण्यात आले. यावेळी राजलक्ष्मी जेधे या विद्यार्थिनीने खेळाडूंना खेळाची शपथ दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मृत कुळांच्या वारसांसाठी गुडन्यूज; आता मिळणार हा मोलाचा हक्क