भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत शुक्रवारी उझबेकिस्तानच्या शमसिद्दीन वोखिदोव्हला हरवून बुद्धिबळ विश्वचषकाच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तथापि, विश्वविजेता डी. गुकेशला जर्मनीच्या फ्रेडरिक स्वेनविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले.
एरिगेसी व्यतिरिक्त, अनुभवी ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण यांनीही दमदार कामगिरी करत बेल्जियमचा तरुण खेळाडू डॅनियल दर्धाला पराभूत करून आगेकूच केली.
राउंड ऑफ 64 सामन्यांमध्ये, काळ्या तुकड्यांसह खेळणाऱ्या प्रज्ञानंदाने आर्मेनियाच्या रॉबर्ट होव्हानिसियानशी बरोबरी साधली, तर विदित गुजरातीचा अमेरिकेच्या सॅम शँकलँडशी सामनाही बरोबरीत सुटला. या नॉकआउट स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवून एरिगेसीने आपली प्रभावी घोडदौड सुरू ठेवली.