Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आशियाई ऍथलेटिक्‍समध्ये मनप्रीत व लक्ष्मणला सुवर्ण

आशियाई ऍथलेटिक्‍समध्ये मनप्रीत व लक्ष्मणला सुवर्ण
भुवनेश्‍वर , शुक्रवार, 7 जुलै 2017 (08:59 IST)
मनप्रीत कौरने महिलांच्या गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावताना येथे सुरू झालेल्या आशियाई ऍथलेटिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताचे खाते उघडले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. मात्र भारताच्या गतविजेत्या विकास गौडाची पुरुषांच्या थाळीफेकीत सुवर्णपदकाची हॅटट्रिक हुकली.
 
मनप्रीतने 18.28 मीटर गोळाफेक करताना आपला 27 वा वाढदिवस सुवर्णपदकाने साजरा केला. तिने चीनच्या गतविजेत्या गु तियानक्‍वियानला पराभूत केले. तियानक्‍वियानला (17.92 मी,) रौप्य आणि जपानच्या आया ओटाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच मनप्रीतने या विजयाबरोबरच लंडन जागतिक मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळविला.
 
विकास गौडाने याआधी वुहान आणि पुणे येथे सुवर्णपदक पटकावले होते. परंतु आज 60.81 मी. फेकीमुळे त्याला केवळ कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. इराणच्या एहसान हदादीने (64.54 मी.) सुवर्ण, तर मलेशियाच्या महंमद इरफानने (60.96 मी.) रौप्यपदकाची निश्‍चिती केली.
 
त्याआधी पदकासाठी पसंती देण्यात आलेल्या राजीव अरोकिया व महंमद अनास या भारतीय धावपटूंनी प्राथमिक फेरीत चमकदार कामगिरी बजावताना पुरुषांच्या 400 मी. शर्यतीतील उपान्त्य फेरीत धडक मारली. तसेच बहुतांश भारतीय ऍथलीट्‌सनी आपापल्या क्रीडाप्रकारात अंतिम फेरी गाठताना सकारात्मक प्रारंभ केला.
 
अरोकियाने 46.42 सेकंद अशी आपल्या हीटमधील सर्वोत्तम वेळ देत आगेकूच केली. तर राष्ट्रीय विक्रमवीर महंमद अनासला आपल्या हीटमध्ये 47.20 से. अशी दुसऱ्या क्रमांकाची वेळ नोंदविता आली. अमोज जेकबनेही 47.09 से. वेळेसह पुढच्या फेरीत धडक मारली. महंमद अनासने याआधीच लंडन जागतिक मैदानी स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळविला आहे.
 
पुरुषांच्या 1500 मी. शर्यतीतील प्राथमिक फेरीत भारताच्या अजयकुमार सरोजने तीन मि. 51.37 से. अशी सर्वोत्तम वेळ देत अंतिम फेरी गाठली. तर सिद्धांत अधिकारीने तीन मि. 57.46 से. वेळेसह आगेकूच केली. महिलांच्या 1500 मी. शर्यतीतील प्राथमिक फेरीत भारताची मोनिका चौधरी व पी. यू चित्रा यांनी अंतिम फेरी गाठली.
पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या बी. चाथन आणि अजय कुमार यांनी 2.10 मी. अशी सारखीच कामगिरी करताना अंतिम फेरीत धडक मारली. पुरुषांच्या डेकॅथलॉनमध्ये जपानच्या काझुया कावासाकीने 100 मी. स्प्रिंटमध्ये अग्रस्थान मिळविताना आघाडी घेतली. आशियाई रौप्यविजेता चीनचा गुओ क्‍वि याच्यासह भारताचा अभिषेक शेट्टीही डेकॅथलॉनमध्ये पदकासाठी झुंज देत आहे. तसेच पुरुषांच्या 100 मी. शर्यतीत गतविजेता व विक्रमवीर कतारचा फेमी ओगुनोडेला भारताचा राष्ट्रीय विजेता अमियाकुमार मल्लिक कडवी झुंज देईल अशी अपेक्षा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोहलीने लावला विनिंग सिक्स, भारताने मॅचसोबत मालिकेवर केला कब्जा