महाराष्ट्राच्या बापू कोळेकरने आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावून चमकदार कामगिरी केली आहे. थायलंडमधील बॅंकॉक येथे जागतिक कुस्ती महासंघ आणि आशियाई कुस्ती संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेतील कॅडेट गटात (54 किलो) ही कामगिरी केली.
बापू कोळेकरला ग्रीको रोमन प्रकारातील उपान्त्य फेरीत पराभव पत्करावा लागला. बापू कोळेकर हा मूळ सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळजवळील आरेवाडी या गावचा रहिवासी असून सांगलीजवळील आटपाडी येथील वीर हनुमान कुस्ती केंद्र येथे सराव करतो. त्याला नामदेव बडरे व त्यांचे बंधू यांचे मार्गदर्शन लाभते.
बापू कोळेकरच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, काका पवार, मारुती आडकर व संपत साळुंखे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.