बेंगळूर एफसीचा स्ट्रायकर सुनील छेत्री याला आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील हिरो ऑफ द लीग हा पुरस्कार मिळाला. सहभागी दहा संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधारांनी विविध पुरस्कारांचे मानकरी निवडले. या स्पर्धेत छेत्रीने 7 गोल केले. मोहन बागानच्या देबजीत मुजुमदार याने सर्वोत्तम गोलरक्षक हा किताब मिळविला.
आठ सामन्यांत त्याने एकही गोल पत्करला नाही. सर्वोत्तम बचावपटूचा जर्नेल सिंग पुरस्कार मोहन बागानच्याच अनास एडाथोडीका याने पटकावला. त्याने अलीकडेच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मध्य फळीतील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार एजॉल एफसीच्या अल्फ्रेड किमाह जर्यान याने पटकावला.
"सर्वोत्तम स्ट्रायकर' पुरस्कारासाठी फारशी चुरस नव्हती. लाजॉंग शिलॉंगच्या एसर पेरीक दिपांदा डीका याने हा मान मिळविला. 18 सामन्यांत त्याने 11 गोल नोंदविले.
नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने यंदा "सर्वोत्तम उदयोन्मुख फुटबॉलपटू' हा पुरस्कार सुरू केला. शिवाजीयन्सच्या जेरी लालरीनझुला याने हा पुरस्कार पटकावला. एजॉलला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललेले प्रशिक्षक खलीद जमिल यांना "सय्यद अब्दुल रहिम सर्वोत्तम प्रशिक्षक' हा पुरस्कार मिळाला.