नोवाक जोकोविचकडे गोल्डन स्लॅम पूर्ण करण्याची चांगली संधी आहे. मात्र, हा स्टार टेनिस खेळाडू अद्यापही टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळण्याविषयीचा निर्णय घेऊ शकलेला नाही.
प्रेक्षकांची अनुपस्थिती व टोक्योमध्ये कोरोनाशी निगडित निर्बंधांना पाहता जोकोविच जपानचा प्रवास करण्याविषयी अद्यापही चर्चाच करत आहे. त्याने रविवारी रात्री विम्बल्डनचे विजेतेपद जिंकल्यानंतर सांगितले की, मला याविषयी विचार करावा लागेल. माझे नियोजन सुरुवातीपासूनच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे होते. मात्र, वर्तमानस्थिती पाहिल्यानंतर मी काही निश्चित करू शकत नाही. मागील दोन-तीन दिवसांमध्ये मी जे काही ऐकले आहे त्यातून ही परिस्थिती अद्यापही फिफ्टी-फिफ्टी अशीच आहे. जोकोविच प्रेक्षकांची अनुपस्थिती असल्याची बातमी ऐकून निराश झाला आहे. इतकेच नव्हे तर कठोर निर्बंधांचा अर्थ त्याच्या वैयक्तिक टीममधील काही मोजकेच सदस्य टोक्योचा प्रवास करू शकतील असा आहे.
दरम्यान, राफेल नदालने यापूर्वीच ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. तर रॉजर फेडररने अद्यापही आपला निर्णय घेतलेला नाही. अशातच आता जोकोविचच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एटीपीच्या अंतिम फेरीत दाखल
नोवाक जोकोविचने यंदाच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तुरीनमध्ये होणार्याव एटीपीच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. तो या टुर्नामेंटमध्ये क्वॉलिफाय करणारा पहिला खेळाडू बनला आहे.