Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्रेंच ओपन टेनिस : शापोव्हालोव्हवर मार्टेररची सनसनाटी मात

फ्रेंच ओपन टेनिस : शापोव्हालोव्हवर मार्टेररची सनसनाटी मात
पॅरिस , शुक्रवार, 1 जून 2018 (10:35 IST)
जर्मनीच्या बिगरमानांकित मॅक्‍झिमिलियन मार्टेररने कॅनडाच्या 24व्या मानांकित डेनिस शापोव्हालोव्हचा चार सेटच्या झुंजीनंतर पराभव करताना येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. नदाल व जोकोविच यांसारख्या बड्या खेळाडूंसाठी धोका ठरू शकणारा शापोव्हालोव्ह आज मार्टेररविरुद्ध मात्र सपशेल निष्प्रभ ठरला. मार्टेररने पहिला सेट गमावल्यावर जोरदार पुनरागमन करताना 5-7, 7-6, 7-5, 6-4 असा सनसनाटी विजय नोंदविला.
 
याशिवाय क्रोएशियाचा तृतीय मानांकित मेरिन सिलिच, ऑस्ट्रियाचा सातवा मानांकित डॉमिनिक थिएम, इटलीचा अठरावा मानांकित फॅबिओ फॉगनिनी या मानांकितांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. मेरिन सिलिचने पोलंडच्या बिगरमानांकित हर्बर्ट हुरकाझचा प्रतिकार 6-2, 6-2, 6-7, 7-5 असा मोडून काढला. तर डॉमिनिक थिएमने ग्रीसच्या स्टेफानोस सिस्टिपासचे आव्हान 6-2, 2-6, 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले.
 
पुरुष एकेरीतील अन्य सामन्यात अठराव्या मानांकित फॅबिओ फॉगनिनीने स्वीडनच्या इलियास वायमेरला 6-4, 6-1, 6-2 असे पराभूत करीत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. तर अमेरिकेच्या बिगरमानांकित स्टीव्ह जॉन्सनने जर्मनीच्या यान लेनार्ड स्ट्रफची झुंज 6-4, 6-7, 6-2, 6-2 अशी मोडून काढताना तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. पाच सेटपर्यंत रंगलेल्या अत्यंत रंगतदार लढतीत इस्टोनियाच्या जर्गन झोपने बेल्जियमच्या रुबेल बेमेलमन्सवर दोन सेटच्या पिछाडीवरून 4-6, 4-6, 6-3, 6-4, 6-4 असा रोमांचकारी विजय मिळवीत तिसरी फेरी गाठली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इलेक्ट्रोपथी, अ‍ॅक्युपंक्चरला मान्यता