नवी दिल्ली- मी अभाविपला घाबरत नाही, असा संदेशफलक हाती घेतल्याने चर्चेत आलेली दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी गुरमेहर कौरला सेलिब्रिटींकडून होणारा विरोध आता वाढू लागला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने तिला सर्वप्रथम टोला लावल्यानंतर आता कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि गीता- बबिता फोगट यांनीही तिचा समाचार घेतला आहे.
गुरमेहर कौर ही करगिल युद्धातील शहीद कॅप्टन मनदीप सिंग यांची कन्या आहे. रामजस कॉलेजमधील हिंसाचारानंतर गुरमेहर हिनी मी अभापिवला घाबरत नाही, असा संदेशफलक हाती घेतलेला आपला फोटो फेसबुकवर टाकला होता. तिच्या या मोहिमेला वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला, परंतू ट्विटरवर जोरदार बॅटिंग करणार्या सेहवागने तिच्या भूमिकेची खिल्ली उडवली.
माझ्या वडिलांचा मृत्यू पाकिस्तानमुळे नाही तर युद्धात झाला, अशी भूमिका गुरमेहरने याआधी घेतली होती. त्याच वाक्याचा संदर्भ घेऊन विरूने तिला टोला हाणला. त्यावरून त्याच्यावर बरेच बाउन्सर आले पण तो मागे हटला नाही. याच्या पाठोपाठ, बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याने सेहवागचे ट्विट उचलून धरत तिला प्यादे बनवले जात आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावर मी सामना करत असलेल्या द्वेषाला तुम्ही उत्तेजन देत आहात... प्यादे? मी स्वत: विचार करू शकते असे प्रत्युत्तर गुरमेहरने दिले होते.
त्यानंतरही योगेश्वर दत्त, गीता फोगट आणि बबिता फोगट यांनी गुरमेहर चुकत असल्याचे जाहीरपणे म्हटले.