Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बजरंग पुनिया आणि दिल्लीच्या माजी पोलीस आयुक्तांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध, म्हणाले....

Webdunia
दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर इथे आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि समर्थकांवर दंगल घडवणं आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात बाधा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 
दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त एन.सी अस्थाना आणि कुस्तीगीर बजरंग पुनिया यांच्यात ट्विटरवर जोरदार शाब्दिक युद्ध पेटलं. वेळ पडली तर बंदुकीच्या गोळ्या सुद्धा खाऊ अशा आशयाचं ट्विट बजरंग पुनियाने केलं होतं. त्यावर "गरज पडली तर गोळ्यासुद्धा घालू पण तुमच्या सांगण्यावरून नाही. आता फक्त कचऱ्याच्या पोत्यासारखं फेकलं आहे. कलम 129 नुसार पोलिसांकडे गोळ्या घालण्याचा अधिकार सुद्धा आहे. योग्य वेळी ती इच्छा सुद्धा पूर्ण होईल. मात्र हे सगळं माहिती होण्यासाठी शिक्षित असणं आवश्यक आहे. भेटू मग पोस्ट मार्टम टेबलवर'
 
यावर बजरंग पुनियाने प्रत्युत्तर दिलं आहे. तो म्हणतो, "हा ऑफिसर आम्हाला गोळी मारण्याची भाषा करत आहे. आम्ही समोर उभे आहोत. कुठे यायचं आहे गोळी झेलायला ते सांग. शपथ सांगतो की छातीवर घेऊ गोळी." आमच्याबरोबर आता हेच करायचं राहिलं असेल तर हेही ठीक असं तो पुढे म्हणतो.
 
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय दंड संहितेच्या 147, 149, 186, 188, 332, 353 आणि पीडीपी अक्ट कलम 3 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
रविवारी रात्री काही कुस्तीपटू जंतरमंतर इथे आले होते. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारत परत पाठवलं.
 
रविवारी राजधानी दिल्लीत नव्या संसदेचं उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कुस्तीपटूंनी नव्या संसदेसमोर महिला सन्मान महापंचायत आयोजित केली होती. पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव या महापंचायतीला परवानगी नाकारली होती.
 
जंतरमंतरहून नव्या संसदेच्या दिशेने निघालेले कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात झटापट आणि धक्काबुक्की झाली. विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया या तिघांना तसंच समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
 
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी जंतरमंतरसह दिल्ली परिसरातून 700 लोकांना अटक केली आहे.
 
कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी जंतरमंतर इथलं आंदोलन गुंडाळलं. खाटा, गाद्या, कूलर, पंखे आणि अन्य गोष्टी हटवण्यात आल्या. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार सर्व कुस्तीपटूंना लवकरच सोडण्यात येईल.
 
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक छळाचे आरोप कुस्तीपटूंनी केले आहेत. त्यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. ब्रृजभूषण यांना अटक व्हावी अशी कुस्तीपटूंची मागणी आहे.
 
कुस्तीपटूंना दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक - शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. कुस्तीपटूंना दिलेली वागणूक वेदनादायी असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलंय. पवार महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेची माजी अध्यक्षही होते.
 
शरद पवार म्हणाले, "लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे."
 
"दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या क्रूरतेच्या कृत्याने आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली आहेत," असंही पवार म्हणाले.
 
दिल्लीच्या जंतरमंतरवरील कुस्तीगीरांचं आंदोलन हटवलं
विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्यासह कुस्तिगिरांचं जंतरमंतवर सुरू असलेला आंदोलन दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे हटवलं आहे. बीबीसीच्या वरील फोटोत रिकाम्या जागेत आधी हे आंदोलन आणि कुस्तिगिरांचे तंबू होते. गेले 36 दिवस हे आंदोलन सुरू होतं.
 
आंदोलक कुस्तिगिरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. आम्ही आंदोलन करूच असं कुस्तिगीर आणि आंदोलक साक्षी मलिक म्हणाली आहे.
 
विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलक कुस्तीपटू जंतरमंतरहून नव्या संसदेच्या दिशेने जाण्यासाठी जात असताना पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली.
 
नव्या संसदेसमोर महिला सन्मान महापंचायत आयोजित करण्याचा आंदोलक कुस्तीपटूंचा प्रयत्न होता.
 
"सर्व कुस्तीपटू तसंच ज्येष्ठ वयाच्या महिलांना अटक केल्यानंतर आता पोलिसांनी जंतरमंतर इथले आमचे तंबू काढून टाकायला सुरुवात केली आहे. तंबूमध्ये असलेल्या आमच्या वस्तूही घेतल्या जात आहेत. ही काय गुंडशाही आहे"? असं ट्वीट साक्षी मलिकने केलं आहे.
 
"खेळाडूंचा आदर करतो पण नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात आम्ही कोणत्याही स्वरुपाचा अडथळा येऊ देणार नाही", असं दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितलं.
 
राजधानी दिल्लीत एकीकडे नव्या संसदेच्या उद्घाटनाचा सोहळा सुरू आहे तर दुसरीकडे पोलीस आणि कुस्तीपटू यांच्यात धक्काबुक्की झाली. कुस्तीपटूंना अटक झाल्याचं साक्षी मलिकने म्हटलं आहे.
 
महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ जंतर मंतरला जाण्यापासून रोखल्यामुळे शेतकरी नेते राकेश टिकैत दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर निदर्शनाला बसले आहेत.
 
महिला कुस्तीपटूंनी रविवारी नवीन संसद भवनासमोर पहिल्या महिला सम्मान महापंचायतीची घोषणा केली होती. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे आणि दिल्लीकडे येणारे अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत.
 
'हे पाहून मला अतिशय वाईट वाटतंय'
ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा याने ट्विट करत मला या प्रकाराचं अतिशय वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे.
 
राकेश टिकैत गाझीपूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "पोलिसांनी सर्व शेतकऱ्यांना सीमेवर थांबवलं आहे. आम्ही सध्या इथेच निदर्शनला बसू आणि पुढची दिशा ठरवू. पैलवान मुलींना रस्त्यावर फरपटत नेणाऱ्या सरकारने मर्यांदाचा दाखला दिला आहे आणि त्याचा त्यांना फार अभिमान वाटतोय. त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गाझीपूर सीमेवरच असू."
 
दरम्यान टिकैत आणि पोलिसांमध्ये टोकाचा वाद झाला. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार गाझीपूर सीमा बंद करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून थांबवण्यात आलं आहे.
 
तसंच कुस्तीगीर महावीर फोगाट यांनी बीबीसीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "विनेश बरोबर दोन दिवसांपूर्वीच बोलणं झालं." सध्याची परिस्थिती हुकुमशाहीची आहे. ब्रजभूषण यांना सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं त्याचं नाव न घेता फोगट म्हणाले.
 
आतापर्यंत सगळं शांततेत सुरू होतं. आंदोलक त्यांचा आवाज उठवू शकत होत.
 
महेंद्र सिंग टिकैत यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, की टिकैत यांनी इंडिया गेटवर शांततेत आंदोलन केलं. त्यांना आज थांबवण्यात आलं आहे. ते काही आज दिल्लीत आलेले नाहीत असं फोगाट म्हणाले.
 
महावीर फोगाट हे बबिता, गीता, रितू आणि संगीता फोगाट यांचे वडील, बजरंग पुनिया यांचे सासरे आणि विनेश फोगाट यांचे काका आहेत.
 
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं, "खेळाडूंच्या छातीवरील मेडल देशाची शान आहे. त्या पदकांनी देशाची प्रतिष्ठा उंचावते. भाजपा सरकारचा अहंकार इतका वाढला आहे की सरकार आपल्या महिला खेळाडूंचा आवाज निर्दयीपणे दाबत आहे. हे अतिशय चुकीचं आहे. संपूर्ण देश सरकारचा हा अहंकार आणि अन्याय पाहत आहे."
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीसुद्धा ट्विट केलं आहे. त्या म्हणाल्या, "ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि अन्य पैलवानांबरोबर धक्काबुक्की केली आहे त्याचा मी तीव्र निषेध करत आहे. आमच्या चॅम्पिअन्स बरोबर दुर्व्यवहार झाला आहे. तो लाजिरवाणा आहे. लोकशाहीत सहनशीलता अपेक्षित आहे. मात्र आता हुकुमशाह लोक असहिष्णू झाले आहेत आणि असंतोष दाबण्याचं काम करत आहे. पैलवानांना सरकारने तातडीने सोडावं अशी मी मागणी करते. मी पैलवानांच्या पाठीशी आहे."
 
राहुल गांधी यांनीही ट्विट करून या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
नव्या संसदेबाहेर आंदोलक कुस्तीपटूंनी महिला सन्मान महापंचायतीचं आयोजन केलं होतं. यासाठी हरियाणा इथून मोठ्या प्रमाणावर समर्थक येण्याची शक्यता होती. मात्र नव्या संसदेच्या उद्घाटनच्या सुरक्षिततेचं कारण देत या सगळ्यांना सीमेवरच रोखण्यात आलं.
 
बजरंग पुनियानेदेखील ट्वीट करुन म्हटलं आहे की, "एखादं सरकार आपल्या खेळाडूंबरोबर असं वागतं का? आम्ही काय गुन्हा केला आहे"? असा सवाल बजरंगने केला आहे.
 
आंदोलक कुस्तीपटू काही दिवसांपूर्वीच जंतरमंतरहून इंडिया गेट इथे गेले होते. इंडिया गेट इथे त्यांनी कँडल मार्च आयोजित केला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप कुस्तीपटूंनी केले आहेत. त्यांच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ब्रृजभूषण यांना अटक होत नाही तोवर आंदोलन संपवणार नाही अशी भूमिका कुस्तीपटूंनी घेतली होती.
 
रविवारी नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यामुळे राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी नव्या संसदेबाहेर महिला सन्मान महापंचायत आयोजित केली होती. यासाठी ते जात असताना पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाली. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ तसंच आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदकविजेत्या साक्षी मलिक, विनेश फोगाट यांना ढकलत, खेचत बसमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी महिला पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
 
ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, आशियाई अजिंक्यपद यांच्यासह देशविदेशातील असंख्य स्पर्धांमध्ये पदक पटकावणारे कुस्तीपटू 23 एप्रिलपासून राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतर इथे आंदोलनाला बसले. आज या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे.
 
या कुस्तीपटूंनी यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यातही आंदोलन केलं होतं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. महिला कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण यांच्याविरोधात लैंगिक शोषणासारखे आरोप केले होते.
 
प्रकरण काय आहे?
18 जानेवारी 2023 रोजी विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीतल्या जंतरमंतर इथे आंदोलन सुरू केलं. तिघांनी ब्रृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. पायाभूत सुविधांची कमतरता, आर्थिक गफलती, खेळाडूंशी गैरवर्तन हे आरोप होते. मात्र सगळ्यात गंभीर आरोप होता तो म्हणजे लैंगिक शोषणाचा.
 
विनेश फोगाटने रडत रडत सांगितलं होतं, "राष्ट्रीय शिबिरात ब्रजभूषण आणि कोच महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करतात. आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात. आम्हाला त्रास देतात".
 
हे आरोप फेटाळताना ब्रृजभूषण यांनी म्हटलं की, "कोणत्याही खेळाडूचं लैंगिक शोषण झालेलं नाही. हे आरोप खरे ठरले तर मी फाशीवर लटकेन".
 
खेळाडूंच्या आरोपांचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यावेळी कुस्तीपटूंशी भेट घेतली. आरोपांसंदर्भात तपास करण्यासाठी 23 जानेवारीला त्यांनी 5 सदस्यीय समितीची स्थापना केली.
 
'ओव्हरसाईट कमिटी' असं या समितीचं नाव होतं. यामध्ये महान बॉक्सिंगपटू मेरी कोम यांच्यासह ऑलिम्पिक पदकविजेता योगेश्वर दत्त, माजी बॅडमिंटन खेळाडू तृप्ती मुरगुंडे, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अर्थात टॉप्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजगोपालन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात साईचे माजी कार्यकारी संचालक राधिका श्रीमन यांचा समावेश होता.
 
नंतर या समितीत भाजप नेता बबिता फोगाट यांचाही समावेश करण्यात आला.
 
ब्रृजभूषण यांच्यासह कोचवर झालेल्या लैंगिक छळाचे आरोप, आर्थिक गफलती आणि प्रशासकीय त्रुटी या आरोपांची छाननी करणं हे समितीचं काम होतं.
 
समितीने एक महिना भारतीय कुस्ती महासंघाचं काम पाहणंही अपेक्षित होतं.
 
चार आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला. नंतर आणखी दोन आठवड्यांसाठी कालावधी वाढवण्यात आला.
 
खेळाडूंनी सांगितलं की, समितीची स्थापना होऊन तीन महिने झाले पण समितीने आरोपांची काय शहानिशा केली, तपासाचा काय निष्कर्ष निघाला, हे अद्यापही समोर आलेलं नाही.
 
चौकशीच्या अहवालातील काही गोष्टी मीडियात लीक होत असल्याचा आरोप खेळाडूंनी केला. दरम्यान या समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
 
समितीच्या अहवालावर असंतुष्ट कुस्तीपटूंनी 23 एप्रिल रोज आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला. विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीचं जंतरमंतर गाठलं आणि आंदोलनाला बसले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

धारावीची जमीन आम्ही कोणाला दिली नाही, भाजपचा काँग्रेसवर जोरदार प्रहार

इंफाळमध्ये कर्फ्यू दरम्यान शाळा आणि महाविद्यालये 19 नोव्हेंबरपर्यंत बंद

Football:आज मलेशियाशी मैत्रीपूर्ण सामन्यात सामना होईल

गर्भवती महिलेची निर्घृण हत्या, सासूने मृतदेहाचे तुकडे करून फेकले

आर्गेनिक गाजर खाल्ल्याने एकाचा मृत्यू, डझनभर लोक आजारी

पुढील लेख
Show comments