ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषकात भारतीय संघाला कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. स्पेनसाठी निकोलस अल्वारेझने (25वे आणि 51वे मिनिट) दोन गोल केले. दुसरा गोल पॅचमने (40व्या मिनिटाला) केला.
दोन वेळच्या चॅम्पियन भारतीय संघासाठी सुनील जोजोने 28व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून एकमेव गोल केला. यावेळी भारताचा स्पेनविरुद्धचा हा दुसरा पराभव ठरला. या युरोपियन संघाविरुद्ध भारताचा पूल टप्प्यात 1-4 असा पराभव झाला होता. मागील वेळी भुवनेश्वर येथे 2021 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारत चौथ्या स्थानावर होता.
दुसरीकडे, वरिष्ठ भारतीय पुरुष हॉकी संघाला स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे सुरू असलेल्या पाच देशांच्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात शनिवारी ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियमविरुद्ध 7-2 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून अभिषेक आणि जुगराज सिंग यांनी दोन गोल केले.
पहिल्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने सेड्रिक चार्लियर (पहिल्या मिनिटाला), अलेक्झांड्रे हेंड्रिक्स (10व्या मिनिटाला) आणि थिबॉट स्टॉकब्रोक्स (13व्या मिनिटाला) यांच्या गोलने भारताला बॅकफूटवर आणले. दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला थिबॉट स्टॉकब्रोक्सच्या (16व्या मिनिटाला) आणखी एका गोलने बेल्जियमने आघाडी मजबूत केली. अभिषेकने (18व्या मिनिटाला) भारतासाठी मैदानी गोल केला पण त्यानंतर टॉम बूनने (26व्या मिनिटाला) आणखी एक गोल केल्याने भारताची 5-1 अशी पिछाडी झाली.
दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस जुगराज सिंगने (27व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरवर गोल करून स्कोअर 5-2 असा केला. तिसर्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांवर सतत दबाव टाकूनही एकही गोल झाला नाही. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला पेनल्टी कॉर्नरवर बूनने (46 व्या मिनिटाला) गोल करून बेल्जियमला चार गोलने आघाडी दिली, पण त्यानंतर हेंड्रिक्सने (53व्या मिनिटाला) दुसरा गोल केला. भारतीय संघाला शेवटच्या क्वार्टरमध्ये दोन पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करण्यात अपयश आले आणि सामना 7-2 असा गमवावा लागला. भारताचा पुढील सामना 19 डिसेंबरला जर्मनीशी होणार आहे.