भोपाळ: भारतीय महिला संघाने आपला विजयी धडाका कायम ठेवतान बेलारूसविरूद्ध तिसर्या कसोटी सामन्यात 3-1 असा दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, बेलारूसविरूद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय आहे.
दोन गोल नोंदवणारी राणी भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. पुढील महिन्यात कॅनडा येथे होणार्या विश्व हॉकी लीग स्पर्धेआधी बेलारूस संघ भारत दौर्यावर आला आहे. याआधी झालेल्या दोन्हीही सामन्यात भारताने बेलारूसला पराभूत केले होते.
तिसर्या सामन्यात बेलारूसची कँधार रायता बेटुराने पहिल्या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी घेवून दिली. मात्र, यानंतर भारताची कर्णधार राणीने 35 व 39 व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताला 2-1 असे आघाडीवर नेले. 42 व्या मिनिटाला देविकाने गोल करत भारताची आघाडी 3-1 ने वाढवली. बेलारूसने शेवटपर्यत गोल करण्यासाठी प्रयत्न केले, पण त्याला यश लाभले नाही. अखेरीस भारताने ही लढत 3-1 अशी जिंकत विजयी हॅट्ट्रिक साजरी केली.