भारताचा दिग्गज नेमबाज मैराज अहमद खानने सोमवारी चांगवॉनमध्ये इतिहास रचला. त्याने ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. उत्तर प्रदेशच्या 46 वर्षीय मैराजने 40 शॉट्सच्या अंतिम स्पर्धेत कोरियाच्या मिन्सू किम आणि ब्रिटनच्या बेन लेलेवेलिन यांना नमवत 37 धावा केल्या.
मिन्सूने 36 गुणांसह रजत आणि बेनने 26 गुणांसह कांस्यपदक जिंकले. दोन वेळा ऑलिम्पियन राहिलेला मैराज हा यंदाच्या ISSF विश्वचषक स्पर्धेतील भारतीय दलातील सर्वात जुना सदस्य आहे. 2016 च्या रिओ दि जानेरो नेमबाजी विश्वचषकातही त्याने रौप्य पदक जिंकले आहे.
तत्पूर्वी सोमवारीच अंजुम मौदगिल, आशी चौकसे आणि सिफ्ट कौर सामरा या त्रिकुटाने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. या तिघांनी ऑस्ट्रियाच्या श्लेन वेईबेल, नॅडिन उंगेरँक आणि रेबेका कोक यांचा 16-6 ने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात पराभव केला.
अंजुमने रविवारी 50मीटर रायफल थ्री पोझिशन महिला एकेरीतही कांस्यपदक जिंकले होते. या पदकासह अंजुम 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये जगातील नंबर वन नेमबाजही ठरली. पदकतालिकेबद्दल बोलायचे झाले तर भारत अजूनही 13 पदकांसह अव्वल आहे. भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली आहेत.