महाराष्ट्राच्या मधुरिका पाटकरने पहिल्यांदाच राष्ट्रीय टेबल टेनिसच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. महिला एकेरीमध्ये मधुरिकाने ही अभिमानास्पद कामगिरी बजावली.
हरियाणातल्या मानेसरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मधुरिका पाटकरने सहावेळा राष्ट्रीय विजेत्या ठरलेल्या पौलोमी घटकवर 4-0 अशी मात केली. तिने चार गेम्समध्ये 11-5, 11-9, 11-5, 12-10 असा विजय मिळवला. मधुरिकाने अंतिम सामन्यात पूर्ण एकाग्रतेने पौलोमीला टक्कर दिली. पहिल्या तीन गेम्समध्ये मधुरिकाने पौलोमीला चांगलीच टक्कर दिली. शेवटच्या गेममध्ये पौलोमीने कडवे आव्हान दिले, मात्र अखेर मधुरिकाने आपले पहिले जेतेपद पटकावले. सेमीफायनलमध्ये मधुरिकाने मनिका बत्रावर 4-2 ने मात केली होती.