Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पॅरिस पॅरालिंपिक : अवनी लेखराला सुवर्ण तर मोना अगरवालला कांस्य, भारताच्या खात्यात एकूण तीन पदकं

mona agarawal
, शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (17:19 IST)
mona agarawal facebook
रायफल नेमबाज अवनी लेखरा आणि मोना अगरवाल यांनी पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताचं पदकांचं खातं उघडलं. तर प्रीती पालनं 100 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावलं.
महिलांच्या 10 मीटर एयर रायफल स्टँडिंग SH1 नेमबाजीमध्ये अवनीनं सुवर्पणदकाची कमाई केली. तर मोना अगरवालनं याच स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं.

टोकियो पॅरालिंपिकमध्येही अवनीनं नेमबाजीच्या याच प्रकारात दोन सुवर्णकमाई केली होती. पॅरिसमध्येही तिनं आपलं पॅरालिंपिक विजेतेपद कायम राखलं आहे.
अवनीला याआधी 2022 साठीच्या बीबीसी इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द ईयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
 
अवनी लेखरा कोण आहे?
अवनी मूळची जयपूर शहरात राहणारी आहे. तिने कायद्याचे शिक्षण घेतलं आहे.
2012 मध्ये झालेल्या एका कार अपघातानंतर ती स्पायनल कॉर्डसंदर्भातील एका आजाराने ग्रस्त आहे.
या अपघातानंतर अवनी केवळ व्हिलचेअरनेच चालू शकते. पण ती थांबली नाही. शूटिंगसाठी तिने आपल्या प्रयत्नांत सातत्य राखलं.
 
साधारण 2015 पासून अवनीने शूटिंगचा सराव सुरू केला. जयपूरमधील जगतपूरा क्रीडा संकुलात अवनी सराव करत होती.
अवनीने क्रीडा क्षेत्रात जावं ही तिच्या वडिलांची इच्छा होती. सुरुवातीला अवनीने शूटींग आणि तिरंदाजी दोन्हीसाठी प्रयत्न केला. पण तिला शूटिंगमध्ये अधिक रस होता. अभिनव बिंद्रा यांच्या कामगिरीमुळे तिला प्रेरणा मिळाल्याचं ती सांगते.
अनेक अडचणींवर मात करत अवनी लेखरानं टोकियो पॅरालिंपिकमध्ये दोन पदकं मिळवली, ज्यात एका सुवर्णपदकाचा समावेश होता. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिलाही ठरली.
मोना अगरवाल कोण आहे?
तर मोना अगरवाल ही पॅरा शूटिंगमधली भारताची उगवती तारका आहे, पण भारतातल्या पॅरा-स्पोर्टसाठी मोनाचं नाव नवं नाही.
राजस्थानच्या सिकरमध्ये जन्मलेल्या मोनाला ती अवघ्या नऊ महिन्यांची असताना पोलियोनं ग्रासलं होतं. त्यामुळे मोनाचे दोन्ही पाय निकामी झाले.
पण या अडचणींनंतरही तिनं शिक्षण पूर्ण केलं आणि मानसशास्त्रात पदवी घेतली. 23 वर्षांची असताना ती स्वतंत्रपणे राहू लागली. HR आणि मार्केटिंगमध्ये नोकरीही करत होती.
2016 पासून तिनं पॅरा अॅथलेटिक्सकडे लक्ष वळवलं. तिनं अॅथलेटिक्स आणि पावरलिफ्टिंगमध्ये पदकं मिळवली तसंच ती पॅरा व्हॉलीबॉलही खेळायची.
 
डिसेंबर 2021 मध्ये मोनानं नेमबाजीची सुरुवात केली. गेल्या अडीच वर्षांत अवनीनं पॅरा नेमबाजीत विश्वचषकात आणि आशियाई पॅरा गेम्समध्येही पदकं मिळवली. आता पॅरिस पॅरालिंपिकमध्येही तिनं कांस्यपदक मिळवलं आहे.
 
प्रीती पालला कांस्यपदक
पॅरिस पॅरालिंपिकमध्ये अ‍ॅथलेटिक्स प्रकारात प्रीती पालनं भारताचं पदकांचं खातं उघडलं. प्रीतीनं महिलांच्या 100 मीटर - T35 शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली.
उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगरमध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या 24 वर्षीय प्रीतीला जन्मानंतर अनेक शारिरीक अडचणींचा सामना करावा लागला. जन्मानंतर सहा दिवस तिचे पाय प्लास्टरमध्ये होते. पायातली ताकद वाढवण्यासाठी तिला अनेक उपचार करावे लागले.
अनेकांना ती जगू शकेल की नाही अशी शंकाही वाटली होती. पण आपण हार मानणारी नसल्याचं प्रीतीनं दाखवून दिलं.
17 वर्षांची असताना सोशल मीडियावर पॅरालिंपिक विषयी माहिती मिळाल्यावर ती खेळांकडे वळली. आर्थिक अडचणींचा सामना करत प्रीतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली.
मागच्या आशियाई पॅरा गेम्समध्ये प्रीतीला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पण यंदा पॅरा वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिनं दोन 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतींमध्ये पदकं मिळवली. आता पॅरालिंपिकमध्येही तिनं पदकाची कमाई केली आहे.
 
शीतल देवीचा विक्रम (29 ऑगस्ट)
एशियन पॅरा गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या शीतल देवीनं पॅरिस पॅरालिंपिकमध्ये सुरुवातीलाच लक्षवेधक कामगिरी बजावली.
गुरुवारी झालेल्या कंपाऊंड तिरंदाजीच्या रँकिंग राऊंडमध्ये शीतलनं 697 गुणांचा वर्ल्ड रेकॉर्ड मागं टाकला.
शीतलनं 703 गुणांची कमाई केली, पण तुर्कियेच्या गिर्डीनं तिलाही मागे टाकत 704 गुणांचा नवा विक्रम रचला.
त्यामुळे शीतलला दुसरं स्थान मिळालं आणि पॅरालिंपिकमध्ये तिच्याकडून आता पदकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. रँकिंग राऊंडमधून केवळ 16 खेळाडू प्रत्यक्ष पदकाच्या लढतींमध्ये खेळू शकतात.
पॅरिस पॅरालिंपिकचं दिमाखात उदघाटन (28 ऑगस्ट)
पॅरिस 2024 पॅरालिम्पिक खेळांची सुरुवात एका नेत्रदीपक उद्घाटन समारंभाने झाली.
गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव आणि भालाफेकपटू सुमित अंतिल हे पॅरालिंपिकच्या उदघाटन सोहळ्यात हे भारतीय पथकाचे ध्वजवाहक होते.
या पॅरालिम्पिकमध्ये 180 हून अधिक देशांच्या टीम्स खेळणार असून भारत 12 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होईल.
त्यासाठी यंदा 84 खेळाडूंचं पथक भारताने पाठवलं असून, आजवरचं पॅरालिंपिकमधलं भारताचं हे सर्वात मोठं पथक आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाढवण : 'बंदरात भराव म्हणून आम्हालाच टाकून द्या, मासेमारी संपली तर जगायचं तरी का?'